राज्यसभेच्या निम्म्या बैठका ‘पाण्या’त -वेंकय्या नायडू

नायडू यांचा पाच वर्षांचा कालावधी; आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला
venkaiah naidu urges rajya sabha members to work together to take india to new heights delhi
venkaiah naidu urges rajya sabha members to work together to take india to new heights delhi sakal

नवी दिल्ली : राज्यसभेत गेल्या ५ वर्षांतील २४८ बैठकांपैकी ५७ टक्के बैठकांवर गदारोळामुळे पूर्ण किंवा अंशतः पाणी पडले. ही माहिती राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी आज दिली. यापुढे तरी आपल्या वर्तनाबद्दल आत्मपरीक्षण करावे असा त्यांनी सदस्यांना सल्ला दिला. नायडू यांचे सभापती म्हणून हे अखेरचे अधिवेशन आहे. त्याचा उल्लेख करताना त्यांनी, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील हे अंतिम अधिवेशन तरी गदारोळ न होता चर्चा व विधेयके मंजूर करून शांततेत साजरे करावे असे आवाहन केले. मात्र त्यांचे हे आवाहनही पाण्यातच गेल्याचे पुढच्या काही क्षणांतच दिसले जेव्हा महागाईचे काय असा सवाल करत कॉंग्रेस सदस्यांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे नायडू यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. तसे करताना त्यांनी, कामकाज चालू न देण्याचे ठरवूनच काही लोक सदनात आले आहेत, अशी तीव्र टिप्पणी केली.

कामकाज सुरू झाल्यावरही काही खासदार जागेवर नसल्याचे पाहून नायडूंनी आल्याआल्याच, ‘‘वेळेपूर्वी सभागृहात येऊन आपापल्या जागेवर बसणे हा उत्तम संस्कार आहे,‘‘ अशा कानपिचक्या दिल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, इम्रान प्रतापगढी यांच्यासह राजीव शुक्ला, पी चिदंबरम, कपिल सिब्बल, मिसा भारती, हरभजन सिंग, विजय साई रेड्डी आदी २८ सदस्यांचा शपथविधी झाला. शपथेमध्ये दिलेल्या मजकुराव्यतिरिक्त इतर काहीही वाचू नका, अशी समज त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली. यावेळी दिवंगत झालेल्या जागतिक नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. याच दरम्यान अमरनाथ यात्रेवरील नैसर्गिक संकटाचा दुखवट्याच्या संदेशात उल्लेख नसल्याचे कॉंग्रेसच्या रजनी पाटील व इतरांनी लक्षात आणून दिले.

नायडू यांनी, हा उल्लेख सचिवालयाच्या लक्षात कसा आलेला नाही हे मला समजले नाही. मात्र तो उल्लेख उद्याच्या कामाकजात घ्यावा, अशी सूचना केली. आपल्या ५ वर्षांच्या काळात ५७ टक्के वेळात गोंधळ झाला असे सांगताना नायडू यांनी, याच काळात संसदीय समित्यांमध्ये उल्लेखनीय कामकाज झाले याकडे लक्ष वेधले. विशेषतः शिक्षण समितीने आपल्या बैठकांमध्ये सर्वाधिक सरासरी ३ तास २२ मिनिटे प्रत्येकी इतके कामकाज केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com