बिहार निवडणुकीत विरोधकांची कसोटी; 'रालोआ' जागा वाटपाचं गणित कसं सोडवणार?

बिहार निवडणुकीत विरोधकांची कसोटी; 'रालोआ' जागा वाटपाचं गणित कसं सोडवणार?

कोरोनाच्या काळात देशात विधानसभेच्या पहिल्या निवडणुका होत आहेत, त्या बिहारमध्ये. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या 243 जागांसाठी होत आहेत. 10 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. योगायोग म्हणजे, ज्या बिहारमधून पोटापाण्यासाठी लाखो लोक मुंबई गाठतात, त्याच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारच्या निवडणूक प्रमुखाची जबाबदारी सोपविली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जनता दल (युनायटेड) चे अध्यक्ष व मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी व देवेंद्र फडणवीस या तीन नेत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची मदार आहे. राज्यातील रालोआ सरकारला पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची किमया करून दाखवायची आहे. गेल्याच आठवड्यात केंद्राने सम्मत केलेली कृषिविषयक तीन विधेयके व त्याविरूद्ध बिहारसह देशात विरोधक व शेतकऱ्यांचे सुरू झालेले आंदोलन, याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीत भाजपच्या कृतीला कौल मिळतो काय, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नितीश कुमार यांचे राष्ट्रीय लोकाशाही आघाडीचे सरकार गेले पाच वर्ष स्थिर असले, तरी त्यांच्या व भाजपच्या दरम्यान अनेक मुद्द्यांवरून मतभेद आहेत. परंतु, त्यांचेच नाव भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी घोषित केल्याने मतभेदाचा प्रमुख मुद्दा दूर झाला आहे. केंद्रीय मंत्री राम विलास पासवान व त्यांचे चिरंजीव व लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केलेल्या 42 जागांच्या मागणीचे व भाजप व जद (यु) च्या जागावाटपाचे गणित ते कसे सोडवितात, यावर राज्यातील रालोआचे भवितव्य अवलंबून राहाणार आहे. 

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भाजपने पासवान यांना 27 जागा देऊ केल्या आहेत. त्याबाबत समझोता झाला, तरी लोकजनशक्ती पक्ष 143 जागा लढण्याची तयारी करीत आहे. त्याचा भाजप व जद(यू) यांना काही प्रमाणात फटका बसेल, हे निश्चित. रामविलास पासवान यांची तब्येत बरी नसल्याने निवडणुकीतील प्रचारात ते कितपत भाग घेऊ शकतील, याबाबत शंका आहे. चिराग पासवान यांनी सातत्यानं नितीश कुमार यांच्या कारभाराबाबत टीका केल्यामुळे त्यांच्या पक्षाला जागा देऊ नये, असे कुमार यांचे मत आहे. तथापि, पासवान समाज व दलितांच्या मतांवर रामविलास पासवान आजवर निवडून येत असल्याने बहुमत गाठता आले नाही, तर पासवान यांच्या पक्षाची मदत मिळविता येईल, असे भाजपला वाटते. 

बिहार विधानसभेतील संख्याबल पाहाता दिसते, की रालोआमध्ये 130 पैकी जनता दल (यू) 69, भाजप 54, लोकजनशक्ती पक्ष 2, हिंदुस्तान आवाम मोर्चा 1 व अपक्ष 4 व विरोधकाच्या महागठबंधन व संयुक्त पुरोगामी आघाडीतील 97 पैकी राजद 73, काँग्रेस 23, अपक्ष 1, असे विभाजन असून या व्यतिरिक्त अऩ्य सदस्यात सीपीआय (एमएल) चे 3, एआयआयएमचे 1 आहेत. सरकार बनविण्यास 122 जणांचे संख्याबल आवश्यक आहे. नितीश कुमार सरकारमध्ये त्यापेक्षा सात सदस्य अधिक होते. निवडणुकातील प्रचारात मोदींसह अन्य केंद्रीय मंत्री, तसेच नितीश कुमार व त्यांचे ज्येष्ठ सहकारी भाग घेतील. काँग्रेसतर्फे राहुल गांधी व प्रियांका मोहिमेत उतरतील. तथापि, सोनिया गांधी उतरतील की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. नितीश कुमार यांच्या कारकीर्दीत सर्वसामान्य कायदा व सुरक्षेचे चित्र समाधानकारक राहिले आहे.

नोटाबंदी झाल्यावर व अलीकडे करोनामुळे लक्षावधी कामगारांवर जी संकटे कोसळली, त्यामुळे शहरांकडे होणारे स्थलांतर व पुन्हा घरवापसी हा सर्वात महत्वाचा मुद्दा बनलाय. मोदी सरकारवर नाराज झालेल्या कामगार मतदारांचा रोख विरोधकांच्या बाजूने असेल, असे बोलले जाते. करोनाच्या काळात अंदाजे 30 लाख कामगार बिहारमध्ये परतले. बेरोगारीचे प्रमाण 3 टक्क्यांवरून 2019 अखेर 10.2 टक्क्यांवर गेले. त्यामुळे, मोदी व नितीश कुमार यांच्यावरील जनतेच्या नाराजीत अधिक भर पडली. 

कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थापन करण्यात बिहार सरकार अपयशी ठरले, अशी टीका विरोधक करीत आहेत. करोनाबाधितांचा आकडा 1 लाख 82 हजार 906 वर पोहोचला असून आजवर 904 लोकांचा मृत्यू झाला आहे. इंडिया टुडे ने दिलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये आलेल्या पुरांत 27 जणांचा मृत्यू झाला. सोळा जिह्ल्यातील 83.62 लाख लोकांना त्याचा फटका बसला. त्यामुऴे राज्य सरकारने सुरू केलेल्या 1420 सामाजिक स्वयंपाकघरातून तब्बल 10 लाख लोकांना भोजन पुरविण्यात येते. छावण्यातून 11,793 लोकांची व्यवस्था राज्यसरकारला करावी लागली आहे. निवडणुकीत मतदान होईल, तोपर्यंत या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता नाही. किंबहुना, त्यात भर पडेल. 

तथापि, आज राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची जी अवस्था आहे, तशीच स्थिती बिहारमध्ये असल्याने जद (यू) व भाजपचे पारडे जड होईल, असे मत राजकीय गोटातून व्यक्त केले जाते. याचे आणखी एक कारण म्हणजे, हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री जितन राम माझी यांनी महिन्याभरापूर्वी रालोआत पुन्हा केलेला प्रवेश. अतिमागासवर्गीयांची मते त्यामुळे भाजपकडे वळण्याची शक्यता दिसते. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारमधून बाहेर पडलेले मंत्री उपेंद्र कुशवाहा (राष्ट्रीय लोक समाता पक्ष) यांनी बहुजन समाज पक्ष व संजय सिंग चौहान यांच्या जनवादी पक्ष (समाजवादी) यांच्याबरोबर हातमिळवणी केली. या मोर्चाने सर्व 243 जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. 

या परिस्थितीत, काँग्रेसला गेल्या निवडणुकीतील आपल्या 23 जागा टिकविण्यासाठी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर समझोता करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. राजदचे नेते लालू प्रसाद यादव हे तुरूंगात आहेत. ते प्रचारात उतरू शकत नाही. त्यांचे चिरंजीव व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव याच्याक़डे पक्षाचे नेतृत्व आले आहे. त्याच्याशी राहुल गांधी यांना जमवून घ्यावे लागेल. तेजस्वी यादव हे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते असून, नितीश कुमार यांच्या मंत्रिंमडळात दीड वर्ष उपमुख्यमंत्री होते. मुलाला उपमुख्यमंत्री पद मिळवून देऊन लालू प्रसाद यादव मागच्या दाराने सरकारचे सूत्रचालन करीत होते, असा आरोप त्यांच्यावर होत होता. त्याच्या नेतृत्वाला प्रामुख्याने उपेंद्र कुशवाह, जितन राम मांझी व रघुवंश प्रसाद सिंग यांचा जोरदार विरोध होता. त्यापैकी रघुवंश प्रसाद सिंग यांचे अलीकडे निधन झाले. मांझी व कुशवाह यांना तेजस्वी प्रसाद याने राजकीयदृष्ट्या आव्हान दिले आहे. विरोधी पक्ष एकमेकाविरूद्ध लढल्यास त्याचा लाभ निश्चितच जद (यू) व भाजपला मिळेल. त्याचप्रमाणे, अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या घटनेने केंद्र सरकार व नितीश कुमार विरूद्ध महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जी जुंपली आहे, त्याचा कितपत लाभ नितीश कुमार यांना मिळणार, हे पाहावे लागेल. यासाठी देवेंद्र फडणवीस प्रचारादरम्यान नितीश कुमार यांना उपयोगी पडतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com