स्वावलंबनाचा कानमंत्र 

स्वावलंबनाचा कानमंत्र 

कोरोना चौथ्या टप्प्यात देश प्रवेश करीत असताना व येत्या 17 मे रोजी टाळेबंदी बऱ्याच प्रमाणात शिथील होण्याची शक्य ता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात देशाला स्वावलंबनाचा कानमंत्र दिला. आत्मनिर्भता हा शब्द त्यांनी वारंवार वापरला. अर्थव्यवस्थेची (क्वांटम जम्प) भरारी, आधुनिक भारतासाठी पायाभूत रचना निर्मिती, 21 व्या शतकाला साजेशी तंत्रज्ञानावर आधारित (शासन) प्रणाली, ध्येयाने भारावलेली जनता व मागणी (व पुरवठा) प्रणाली मजबूत करून त्यात समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेणे, हे स्वावलबनाचे पाच स्तंभ असून, त्याचा पाठपुरावा करावयाचा आहे, असे ते म्हणाले. मोदी यांनी त्यासाठी 20 लाख कोटी रूपयाचे पॅकेज देण्याची घोषणा केली. 

महात्मा गांधींचा विचार
मोदींचा कानमंत्र नवा नाही. त्याची महती शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी सांगितली होती. गांधीजींच्या मते, प्रत्येक प्रदेशाचे एक वैशिष्ठ्य असते. त्याकडे तशी साधनसामग्री असते. तिचा उपयोग व्हावयास हवा. प्रत्येक गाव स्वावलंबी व्हावयास हवे, असे त्यांना वाटत होते, तरीही शेजारच्या गावांवरही अवलंबून राहाणे गरजेचे असते. कारण, प्रत्येक गावात सर्व गोष्टी उपलब्ध असणे कठीण. परस्परावलंबनाला पर्याय नाही, तरीही स्वावलंबनाचे महत्व त्यांनी विशद केले. गाव स्वावलंबी नसेल,तर तेथून (सधन शहरांकडे) मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर होईल, असे ते म्हणत. गेल्या सत्तर वर्षात ग्रामीण भारताची वाटचाल स्वावलंबनाकडे झाली नाही. परिणामतः पोटापाण्यासाठी ग्रामीण भागातून लाखो लोकांचे लोंढे शहरांकडे वळले. पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकता, बंगलोर, चेन्नई आदी मोठ्या शहरात येऊन त्यांनी वस्ती केल्याने झोपडपट्टयांचे प्रमाण वाढले. कोरोनाच्या भयाने आज लाखो लोक पुन्हा गावांकडे वळले आहेत. गेले महिनाभर त्यांना गावाकडे जाण्याची सोय सरकारने केली नाही. त्यामुळे, शेकडो मैलांची पायपीट करीत गावाकडे चाललेल्या शेकडो लोकापैकी शीण येऊन आजवर बावन्न लोकांचा रस्त्यात मृत्यू झाला. हे चित्र विदारक होय. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरांना धडा शिकवला
दरम्यान, कोरोनाने शहरांना एक चांगला धडा शिकविला. शहरातील लोकांचे घरकाम गडी अथवा मोलकरणींशिवाय व्हायचे नाही. परंतु, टाळेबंदीमुळे घरकाम करणाऱ्यांनाही दिड महिना त्यांच्या घराबाहेर जाणे अशक्यण झाल्याने शहरातील प्रत्येकाला काही ना काही घरकाम काम वाटून घ्यावे लागले. स्वावलंबी व्हावे लागले. शहरात सर्वसाधारणतः प्रत्येक घरात भांडी घासणे, झाडलोट करणं, कपडे धुणे, व स्वयंपाक करणे अथवा स्वयंपाकात मदत करणे, या कामांसाठी किमान तीन ते चार माणसे नोकर लागत. लोकसंख्या जास्त, म्हणून नोकरांची संख्या जास्त. परंतु, अमेरिका वा युरोपात घरकाम हे नवे नाही. सामान्यांपासून ते अगदी उच्चभ्रू अमेरिकन वा युरोपीय कुटुंबात सारे घरकाम कुटुंबीय करतात. घरांपुढील प्रशस्त लॉन्स मशीनने (ग्रास कटर) एकसारख्या करणे, त्यांची निगा राखणे, नवे फर्निचर घेतल्यास त्याची जुळवणी करणे, एका शहरातून दुसऱ्या शहरात राहाण्यासाठी जायचे असल्यास भाड्याने ट्रक घेऊन त्यात सामान भरून स्वतःच ट्रक चालवित त्या शहरात जाणे, अशी अनेक कामं हे लोक करतात. अमेरिका, युरोपात राहाणाऱ्या भारतीयांच्याही हे आता अंगवळणी पडले आहे. तेथे कामासाठी माणसं मिळत नाहीत. मिळाली, तर त्यांच्यासाठी शेकडो डॉलर्स वा युरो मोजावे लागतात. श्रीमंत घरातून अपवादात्मक मनॅनीफ (घरकाम करणारी स्त्री अथवा पुरूष) काम करतात. पण,त्याचे नियम व पगार ते सांगतात, तसे द्यावे लागतात. सारांश, कोरोनाच्या दिवसात भारतीय माणूसही अमेरिका, युरोपात न राहाता तेथील वैयक्तिक शिस्त बऱ्याच प्रमाणात शिकला, हे ही नसे थोडके. 

स्वावलंबी जॉर्ज फर्नांडिस
या ठिकाणी मला आठवण येते, ती माजी संरक्षण मंत्री कै जॉर्ज फर्नांडिस यांची. त्यांची राहाणी अत्यंत साधी होती. साधा शर्ट व पायजमा हा त्यांचा नेहमीचा पोषाख. स्वतःचे काम ते स्वतः करीत. त्यांना भेटण्यास त्यांच्या कृष्णमेनन मार्गावरील घरी गेलो असता काही वेळ त्यांची प्रतीक्षा करावी लागली. तेवढ्यात जॉर्ज आले. म्हणाले, कपडे धुण्यास वेळ लागला. हे ऐकून मी हबकलोच. तुमचे कपडे तुम्ही स्वतः धुता? अशी पृच्छा करता, जॉर्ज म्हणाले, का, त्यात काय झालं? कपडे माझेच आहेत ना? कपडे धुण्याची मला सवयं आहे. देशाचा संरक्षण मंत्री किती साधा आहे, याची खात्री तर पटलीच.परंतु, झुंझार जॉर्ज हे काही वेगळच रसायन होत, हेही समजलं. त्यांना हवे तेवढे हाकेसरशी घरकामासाठी नोकरचाकर मिळाले असते. परंतु, आपली राहाणी कशी असावी,याबाबत त्यांचे नियम होते.  

मोदींपुढे पर्यायच नाही
स्वावलंबनाचे उदाहरण देताना मोदी म्हणाले, की कोरोनाची लागण सुरू झाली, तेव्हा औषधोपचारासाठी (डॉक्टोर्स व नर्सेससाठी) लागणाऱ्या एन 95 मुखपट्या व वैयक्तिक संरक्षक पोषाख (पीपीई) यापैकी काही एक उत्पादन आपण करीत नव्हतो. परंतु, काही आठवड्यातच रोज तब्बल 2 लाख पीपीई व 2 लाख एन 95 मुखपट्ट्यांचे उत्पादन करू लागलो. मोदी असेही म्हणाले, की स्वावंलबनाचा अर्थ भारताला कोशबंद करायचे, असा नाही, परंतु, वसुधैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे जगाचे साह्य करायचे आहे. मोदी यांच्या पाठोपाठ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 20 लाख कोटी रू. च्या पॅकेजचे तपशील देण्यास सुरूवात केली आहे. स्वावलंबनाचे उद्दीष्ट साकार करण्यासाठी इलेक्ट्रॉ निक वस्तू, औषधनिर्मिती, भांडवली वस्तू, कापड उद्योग, मोटार उद्योगाला लागणारे सुट्या भागांचे उत्पादन, खाद्यान्न प्रक्रिया, कातडे, अलंकार उद्योग, खाणकाम, रासायने या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे भांडवल, जमीन व मजूर क्षेत्रातील सुधारणा, परकीय भांडवली गुंतवणूक आदींना चालना देण्यात येणार आहे. नोटाबंदीच्या काळात सर्वाधिक पेकाट मोडले होते, ते छोट्या व मध्यम उद्योगांचे. आजही ते दुरवस्थेत आहेत. कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याने तिचे पुनरुज्जीवन करण्याशिवाय तरूणोपाय नाही, याची जाणीव मोदी यांच्या भाषणातून प्रतीत होत होती. 

तरच मजूर परतणार!
कोरोनापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग 5.6 टक्के होता, आता तो 1 टक्यातरू पेक्षाही खाली आला आहे. प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यातील कारखान्यांचे उत्पादन गेल्या 39 वर्षांत घसरले नव्हते एवढे खाली घसरले आहे. एप्रिलमध्ये 20 वयोगटातील तब्बल 2.7 कोटी लोकांना रोजगारास मुकावे लागले. बॅंकांची स्थिती आधीच डबघाईला आलेली. त्यामुळे, सरकारने छोट्या व मध्यम उद्योगांसाठी साह्य जाहीर केले, तरी त्यांना माफक दरात कर्ज देण्यासाठी बॅंका सढळ हात ठेवणार काय? आजही देशाचे विभाजन रेड, ऑरेन्ज व ग्रीन या तीन कोरोनाग्रस्त गटात करण्यात आले आहे. शिथिलता अस्तेअस्ते येत असल्याने वाहतूक, विमान, व रेल्वे व बस प्रवास यावर बंधने आहेत. मॉल्स, सिनेमागृहे, हॉटेल्स व रेस्टॉरन्ट्‌स बंद असल्याने तेथे तत्काळ रोजगार निर्मिती होणार नाही. सर्वात मोठे आव्हान आहे, ते शहरातून गावाकडे गेलेल्या लक्षावधी मजूरांना पुन्हा शहराकडे वळविण्याचे. जोवर शहरातील उद्योगधंदे पूर्णपणे चालू होणार नाही, तोवर ते परतण्याची शक्यता नाही. लघु व मध्यम प्रतीच्या उद्योगांवर किमान मजूर (33 टक्के) कामावर ठेवण्याचे बंधन आहे. परिणामतः उत्पादानाला खीळ बसणार, हे निश्चि त. सेन्टर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी या संस्थेनुसार ,6 मे अखेर बेरोजगारीचे प्रमाण 27.11 टक्के इतके वाढले आहे.

पाच लाख कोटींचा फटका
जगातील प्रवासी व पर्यटन क्षेत्रातील 50 दशलक्ष रोजगार संपुष्टात येतील. कोरोनापूर्वी. युरोप व अमेरिका दरम्यान दरमहा 8 लाख 50 हजार लोक प्रवास करायचे. ते ठप्प झाले. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला 8.5 अब्ज डॉलर्सचा तोटा झाला. पर्यटन तज्ञ फरहात जमाल यांच्या मते, भारतीय पर्यटन व प्रवास क्षेत्राला 5 लाख कोटी रूपयांचा फटका बसणार आहे. या स्थितीतही अन्नधान्याबाबत भारत स्वयंपूर्ण आहे, ही समाधानाची बाब होय. स्वावलंबनाचा कानमंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी टाळेबंदीच्या काळात जनतेवर, राज्यांवर लादलेली बंधने सैल करावी लागतील. जनतेचे हित ध्यानात ठेवून नोकरशाहीला मिळालेल्या स्वातंत्र्यालाही लगाम लावावा लागेल. अन्यथा, वेगवेगळ्या बंधनांच्या व नियमांच्या साखळ्यात अडकलेली अर्थव्यवस्था स्वावलंबनाकडे वाटचाल करू शकणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com