Bihar Election 2020: अनाजने फिरवलेली निवडणूक...

विजया रहाटकर : भाजपच्या राष्ट्रीय सचिव
Wednesday, 11 November 2020

भाजपने माझ्याकडे गोपालगंज, छपरा, सिवान या जिल्ह्यांची जबाबदारी सोपविली होती. पंधरा दिवस मी या तीन जिल्ह्यांत भिंगरीसारखे फिरले. खरं तर मलाही या योजनेच्या महतीची नीट कल्पना नव्हती.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना... हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं नसेल किंवा असेल. पण विश्वास ठेवा, याच योजनेने बिहारमध्ये सर्वांनाच धक्का दिलाय. बिहार म्हटलं की फक्त जात पात धर्म, मनी, मसल यांच्यावरच निकाल ठरतात, असे वाटते. पण ही निवडणूक कदाचित त्यास अपवाद ठरावी. 

अनाज... एकाही माध्यमांत हा शब्द तुम्ही ऐकला नसेल. पण हाच तो शब्द..जो भाजप, नीतिशकुमार यांच्यासाठी मंतरलेला ठरावा! काय त्याचे एवढे महत्त्व? टोकाची अँटी इनकम्बन्सी, कोरोनाचे संकट, वेदनादायी प्रवास करून घरी परतलेले लाखो मजदूर, महापूर, घटलेले रोजगार एवढी प्रचंड आव्हाने असताना नितीशकुमारांच्या नेतृत्वाखालील भाजप व जेडीयूच्या सरकारने इतकी चांगली कामगिरी केली कशी? पारंपरिक राजकीय विश्‍लेषणापलीकडे गेल्याशिवाय याचे उत्तर सापडणार नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कदाचित त्याचे उत्तर ‘अनाज’ या तीन अक्षरांत दडलंय. काय आहे? कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एप्रिलच्या सुरवातीला आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले. त्याची काहींनी टिंगल केली. पण याच पॅकेजमध्ये होती ही गरीब कल्याण अन्न योजना. रेशनवर मिळणारया नेहमीच्या धान्यावर अतिरिक्त प्रति व्यक्ती प्रति महिना पाच किलो तांदूळ, गहू आणि प्रति कुटुंब एक किलो डाळ मोफत दिली गेली. बिहारमध्ये याचे मोल अक्षरशः अदभूत. कोरोनाने जिवंत राहण्याचे संकट ओढविले असताना दोन वेळेच्या पोटाची भ्रांत या योजनेने भागविली. त्यातही एक किलो चना डाळ मिळाल्याने लाखो कुटुंबांच्या पोटाला आधार मिळाला. चना डाळ हे बिहारी आहारातील महत्त्वाचे प्रथिन. 

भाजपने माझ्याकडे गोपालगंज, छपरा, सिवान या जिल्ह्यांची जबाबदारी सोपविली होती. पंधरा दिवस मी या तीन जिल्ह्यांत भिंगरीसारखे फिरले. खरं तर मलाही या योजनेच्या महतीची नीट कल्पना नव्हती. एका छोट्या गावात ‘चौपाल पे चर्चा’ करत असताना एक जख्खड गरीब म्हातारी मला एकदम म्हणाली, मोदी जी ने हमें बचाया है.. मला क्षणभर समजलेच नाही. जेव्हा नीट चौकशी केली तर बहुतेक बायकांची अशीच प्रतिक्रिया होती. हे धान्य वेळीच दिले नसते तर आम्ही भुकेने तडफडून मेलो असतो, असे त्या सांगत होत्या. मोदींनी तर आणखी काही दिले होते. जनधन खात्यांत दरमहा पाचशे रुपये भरले होते, तीन सिलिंडर मोफत दिले होते. हा लाभ घेणाऱ्यांची संख्या काही लाखांत आहे. गरीब बिहारींसाठी याचे मोल अनमोल होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दुर्दैवाने, सभेतील गर्दीच्या निकषांवर, कृत्रिम हवेवर आडाखे मांडले गेले. पण एक गोष्ट नक्की.. गरीब आणि महिला ही एकेकाळची कॉंग्रेसची मतपेढी मोदींनी कधीच पळविलीय. मोदी आपल्याला मरू देणार नसल्याची खात्री गरिबांना वाटतेय आणि मोदींच्या सर्व योजनांच्या केंद्रस्थानी आपणच असल्याची भावना महिलांची झालीय. त्यामुळेच, ‘नीतिशकुमार कधीचेच संपलेत’, ‘मोदींचे जहाज बुडतयं’ अशी दवंडी पेटविणारे गप्पगार झालेत, एक्‍झिट पोल्स तोंडावर आपटलेत. ही किमया फक्त गरीब व महिला मतदारांची. ही वस्तुस्थिती आहे. त्याकडे डोळेझाक करून तुम्ही पठडीतील विश्‍लेषण करणार असाल तर ती स्वतःचीच फसवणूक ठरेल. आत्मवंचना नको, आत्मचिंतन करा... 

यशाचे मानकरी... मोदी अन्‌ महिला! 
बिहारमध्ये एक कोटी महिलांच्या बॅंक खात्यात दरमहा पाचशे रुपये. कोरोनामध्ये ही रक्कम लाखमोलाची 
75 लाख महिलांना तीन सिलिंडर मोफत. 
पंतप्रधान आवास योजनेतून दहा लाखांहून अधिक घरे आणि एक कोटी शौचालये. 
मुद्रा योजनेचा लाभ एक कोटींहून अधिक महिलांना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijaya Rahatkar write article Prime Minister Poor Welfare Food Scheme