दिल्ली, यूपीत  पुन्हा हिंसाचार

Violence again in Delhi and UP
Violence again in Delhi and UP

नवी दिल्ली - नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ देशभर भडकलेला आंदोलनाचा वणवा अद्याप शमलेला नसून, राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशातील सतरा शहरांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. या राज्यांतील काही भागांत इंटरनेट सेवा थांबविण्यात आली असून, अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

प. बंगालमध्येही इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये आज अनेक ठिकाणांवर जोरदार आंदोलने झाली. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला शांततेचे आवाहन केले आहे. देशभरातील या जन उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राने नमती भूमिका घेत नागरिकत्व कायद्यामध्ये सुधारणा करण्याची तयारी दर्शविली असून, यासाठी आंदोलकांकडून सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. 

लोकशाहीमध्ये असहमती आवश्‍यकच असते, लोकांनीही त्यांच्या कृतीच्या केंद्रस्थानी देशहितच ठेवायला हवे. त्यांनी हिंसेच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केले आहे. लोकांनी लोकशाहीच्या मार्गाने शांततेने आंदोलन करावे, राज्यघटनेचा मूळ संदेश त्यांनी लक्षात घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. देशाच्या दृष्टीने एकता, सुरक्षितता, सर्वसमावेशकता आणि सार्वभौमत्व या बाबींना अधिक महत्त्व असून, लोकांनी अधिक सकारात्मक आणि रचनात्मक काम करावे. देशाच्या प्रतिमेला तडा जाईल असे कोणतेही कृत्य लोकांच्या हातून होता कामा नये, असेही नायडू यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले. 

राजधानी दिल्लीतील दर्यागंज परिसरामध्ये सायंकाळी आंदोलनास हिंसक वळण लागले. या वेळी काही आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ केली, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला. तत्पूर्वी दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशीद आज या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरली. शुक्रवारचा दिवस हा प्रार्थनेचा असल्याने सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. या वेळी पोलिसांनी आझाद यांना जामा मशिद आणि नंतर दर्यागंज येथून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलकांनीच मोठ्या शिताफीने त्यांची सुटका करविली. या वेळी आंदोलकांनी नागरिकत्व कायद्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जामियाप्रमाणेच दिल्लीतील अनेक शैक्षणिक संस्थांमध्येही आज आंदोलन झाले. विद्यार्थ्यांनी जामियाबाहेर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली. अनेक भागांमध्ये सुरक्षा दलांनी ध्वजसंचलनदेखील केले. या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर केरळमध्येही वायनाड, कोझीकोड, कासारगोड आणि कन्नूरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान कर्नाटकमध्येही स्थानिक पोलिसांनी आज काही केरळी नागरिकांची धरपकड केली. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. ईशान्येकडील बहुतांश राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असून, आसाममधील इंटरनेट सेवा आज पूर्ववत झाली. मेघालयातील तणावही कमी होऊ लागला आहे.

राजधानी दिल्लीत आज दुसऱ्या दिवशीही नागरिकत्व कायद्याविरुद्ध शांततेत होणाऱ्या निदर्शनांना हिंसेचे गालबोट लागले. दिल्ली गेट परिसरात जमावाने दगडफेक करून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. खबरदारीचा उपाय म्हणून राजीव चौकसारख्या गजबजलेल्या मेट्रो स्थानकात मर्यादित निर्बंध घालण्यात आले होते. तसेच चावडीबाजार, चांदनी चौक, दिल्ली गेट, लाल किल्ला, जामा मशीद, खान मार्केट, जनपथ, प्रगती मैदान, मंडी हाउस, जामिया मिलिया, जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, शिवविहार, जोहरी एनक्‍लेव्ह ही मेट्रो स्थानके बंद करण्यात आली होती. तसेच दिलशाद गार्डन, काश्‍मिरी गेट ही मेट्रो स्थानके सुरक्षेच्या कारणास्तवर काही काळासाठी बंद करण्यात आली होती. त्याचप्रमाणे जमावबंदी आदेशही लागू करण्यात आला होता. 

उत्तर प्रदेशात आंदोलनाचा वणवा
उत्तर प्रदेशात सतरा जिल्ह्यांमध्ये आज तीव्र आंदोलन झाले, मोरादाबाद, सीतापूर, बहराईच, बिजनौर, गोरखपूर आणि फिरोजाबादमध्ये आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ करत पोलिसांवर तुफान दगडफेक केली. वीस जिल्ह्यांमध्ये इंटरनेटसेवा बंद करण्यात आली असून, काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गाझियाबाद, मेरठ, सुलतानपूर, गोरखपूर, कानपूर, उन्नाव, बुलंदशहर, हाथरस, हापूड, अमरोहा, मुझफ्फरनगर आदी ठिकाणांवर आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या आंदोलनप्रकरणी उत्तर प्रदेशात दीडशे जणांना अटक करण्यात आली आहे. दक्षिणेत कर्नाटकमध्ये कोडागू येथे संचारबंदी लागू करण्यात आली होती.

‘काँग्रेसशासित राज्यांत अंमलबजावणी नाही’
कोची : केंद्राचा नागरिकत्व कायदा काँग्रेसशासित राज्यांमध्ये लागू करण्याचा प्रश्‍नच नाही; कारण हा कायदाच मुळात घटनाविरोधी आहे, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मांडले. अलप्पुझा काँग्रेस समितीकडून आज नागरिकत्व कायद्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त मत मांडले.

यूपीत हिंसाचारात पाच जण मृत्युमखी
लखनौ - सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. या वेळी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत पाच आंदोलक मृत्युमुखी पडले. बिजनौरमध्ये दोन, संभल, कानपूर व फिरोजाबादमध्ये प्रत्येकी एक जण मृत्युमुखी पडला आहे. आंदोलन वाढू नये यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनीही कडक धोरण अवलंबिले आहे. कानपूरमध्येही सहा जण पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत.
 

दिवसभरात
यूपीत बिजनौरमध्ये एका आंदोलकाचा मृत्यू
मेरठमध्ये आंदोलकांनी पोलिस चौकी जाळली
फिरोझाबादमध्ये दगडफेकीत चार पोलिस जखमी
लखनौ शहरावर पोलिसांची ड्रोनमधून नजर
भोपालमध्ये आंदोलकांकडून पोलिसांना पुष्पगुच्छ
राजधानी दिल्लीतील तेरा मेट्रो स्थानके बंद
गाझियाबादमध्ये आंदोलकांकडून वाहनांची तोडफोड
हैदराबादेत चारमिनार परिसरामध्येही आंदोलन
कर्नाटक, ‘यूपी’त इंटरनेट, मोबाईल सेवा बंद
केरळमध्येही राज्य सरकारकडून हायअलर्ट
कोझीकोडमध्ये गृहमंत्री शहांच्या पुतळ्याचे दहन
आसाममध्ये दहा दिवसांनंतर इंटरनेट पूर्ववत
मुख्यमंत्री सोनोवाल नेत्यांशी चर्चा करणार
अलिगड विद्यापीठात कडेकोट बंदोबस्त तैनात
पश्‍चिम बंगालमध्ये सर्वत्र तणावपूर्ण शांतता
अमेरिकेत शिकागो, बोस्टनमध्येही आंदोलन
गुजरातेत बडोद्यात हिंसाचार, पोलिसांकडून गोळीबार
शिलाँगमधील संचारबंदी पुन्हा काहीकाळ शिथिल
अमित शहांच्या घराबाहेर शर्मिष्ठा मुखर्जींचे आंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com