Video : राहुल गांधींच्या ‘त्या’ एका वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय खळबळ!

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 मे 2020

महाराष्ट्र हे महत्वाचं राज्य आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे इथे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. मुंबईमधील स्थिती गंभीर बनली असून केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यावे, असं गांधी म्हणाले होते.

दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल यांनी माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील स्थितीबाबत भाष्य केलं होतं. महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे, मात्र राज्यात मोठे निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेसला नाहीत, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधीच्या वत्तव्याला महत्व प्राप्त झालं आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे, पण मोठे निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार नाही. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान आणि पुदुचेरीमध्ये निर्णय घेऊ शकतो. सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे यात फरक आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना महामारीविषयी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गांधी असे म्हणाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महाराष्ट्र हे महत्वाचं राज्य आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे इथे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. मुंबईमधील स्थिती गंभीर बनली असून केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यावे, असं गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या वरील वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये धुसफुस दिसून येत होती. मात्र, राहुल गांधी यांचे वक्तव्य चुकीच्या अर्थाने घेतले गेले असं म्हणत काँग्रेसने सारवासारव केली आहे. 

शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यावेळी काँग्रेसकडून कोणीही उपस्थिती नव्हतं. त्यानंतर एका तासात पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यामुळे राज्यातील आघाडी संकटात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच राहुल गांधी यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं जाणवू लागलं होतं. मात्र, शरद पवार यांनी माध्यमांसमोर येत या सर्व अफवांचं खंडन केलं आहे.  तीन्ही पक्ष एकत्र असून सरकारला कोणताही धोका नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. 

कोरोना प्रभाव! उबरने तब्बल इतक्या कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी जे म्हणाले ते खरं आहे. हे तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे सर्वजण एकत्र निर्णय घेतात. तसेच उद्धव ठाकरे सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतात, असं त्या म्हणाल्या आहेत. भाजपनेही राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांचे आघाडीच्या भागिदारांमधील अविश्वासाचे विधान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेसोबत वाईट विनोद आहे, अशी टीका भाजपने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we are not key decision maker in maharashtra said rahul gandhi