हवामान अंदाज : वादळीवाऱ्यासह पावसाची अपेक्षा; उष्णतेची लाट ओसरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update maharashtra heat wave weather department Expect rain with thunderstorms
हवामान अंदाज : वादळीवाऱ्यासह पावसाची अपेक्षा; उष्णतेची लाट ओसरणार

हवामान अंदाज : वादळीवाऱ्यासह पावसाची अपेक्षा; उष्णतेची लाट ओसरणार

नवी दिल्ली : उत्तर भारतातील राजस्थानसह महाराष्ट्रातील विदर्भ आणि दिल्लीतील काही भागांतील उष्णतेची लाट ही उद्यापासून (ता.३) ओसरायला सुरूवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून आज देण्यात आली. वायव्य भारतातील कमाल तापमानामध्ये तीन ते चार अंश सेल्सिअसची घट अपेक्षित असून तोच कल शुक्रवारपर्यंत कायम राहणे अपेक्षित आहे. सध्या राजस्थान आणि विदर्भातील अनेक ठिकाणांवरील पारा हा ४५ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे.

उत्तर आणि मध्यभारतातील अनेक ठिकाणांवरील तापमान हे कमी होऊ लागणार असून जम्मू- काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, पूर्व मध्यप्रदेश, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि अन्य काही दक्षिण भारतीय राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे ही परिस्थिती बदलू लागली असून दक्षिण भागामध्ये यामुळे जोराचा पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मध्यभारतातही दिवसाच्या तापमानामध्ये घट होणार असून येत्या तीन दिवसांमध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होऊ शकते असेही सांगण्यात आले.

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मात्र आठवडाभर उष्णता राहू शकते असेही सांगण्यात आले. बंगालच्या महासागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून त्याच्या तीव्रतेबाबत मात्र हवामान विभाग साशंक आहे. याच कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र वादळामध्ये रूपांतर होण्याची चिन्हे अधिक आहे असे हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.

वेगाने वारे वाहणार

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ओडिशा आणि बंगालमधील उष्णतेची लाट ३० एप्रिल रोजीच संपुष्टात आली असून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये वेगाने वारे वाहू लागतील. वायव्य भारतासाठी ‘यलो वॉर्निंग’ जारी करण्यात आली आहे. येत्या ३ मे रोजी दिल्लीत पावसाची शक्यता असून राजस्थान, दिल्ली, हरियाना, पंजाबमध्ये वाऱ्याचा वेग अधिक असू शकतो.

Web Title: Weather Update Maharashtra Heat Wave Weather Department Expect Rain With Thunderstorms

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top