प. बंगालमध्ये अष्टमीला मुस्लिम कुमारिकेचे पूजन

पीटीआय
Tuesday, 8 October 2019

विवेकानंद यांनीही केले होते पूजन
कुमारी पूजानिमित्त मुस्लिम मुलीचे पूजन करणे ही बाब नवी नाही. स्वामी विवेकानंद यांनी कुमारी पूजनादिनी १८ ऑगस्ट १८९८ रोजी खीर भवानी मंदिरात चार वर्षांच्या काश्‍मिरी मुलीची दुर्गेच्या रूपात पूजा केली होती. समाजाला महिलांचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी बेलूर मठात १९०१ मध्ये कुमारी पूजेस प्रारंभ केला.

कोलकता - पश्‍चिम बंगालमध्ये दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. कुमारी पूजा विधीत येथील एका कुटुंबाने चार वर्षांच्या मुस्लिम मुलीची पूजा केली.

महाअष्टमीला कुमारिकांचे पूजन करण्याचा प्रथा आहे. या प्रथेनुसार ‘कुमारी’ म्हणून केवळ ब्राह्मण मुलींची पूजा केली जाते. उत्तर २४ परगाणा जिल्ह्यातील दत्त कुटुंबात २०१३ पासून दुर्गापूजेचा उत्सव साजरा केला जात आहे. यंदा सर्वसमावेशकता आणि जातीय सलोख्याचा संदेश देण्यासाठी पारंपरिक प्रथेला छेद देत या कुटुंबाने रविवारी (ता. ६) फातिमा नावाच्या मुस्लिम मुलीचे पूजन केले. फातिमा ही मूळची उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील आहे. ‘‘पूर्वी आम्ही फक्त ब्राह्मण मुलींनाच कुमारी म्हणून पूजत होतो; पण दुर्गामाता ही पृथ्वीवरील सर्व मानवांची आई आहे. म्हणून आम्ही परंपरेला छेद देत यंदा मुस्लिम मुलीचे पूजन केले,’’ असे या कुटुंबातीतील एक सदस्य तमल दत्त यांनी सांगितले. स्थानिक नगरपालिकेत ते अभियंता म्हणून काम करतात. 

मुस्लिम कुटुंबातील मुलीच्या पूजेचा निर्णय घेतल्यानंतर अशा मुलीचा शोध घेण्याचे आव्हान दत्त कुटुंबासमोर होते. सहकारी मोहंमद इब्राहिम यांच्याकडे विचारणा केल्यावर आग्र्याला राहणारी त्यांची भाची फातिमा हिचे नाव त्यांनी दत्त यांना सुचविले. इब्राहिम यांनी तेथे त्यांची बहीण व मेहुण्यांकडे परवानगी मागितली. त्यानंतर ती आईसोबत दत्त यांच्या घरी आल्यानंतर महाअष्टमीला तिची पूजा केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Bengal Ashtami Muslim Girl Pujan