esakal | प्रचार रणधुमाळीत ममता दीदींनी घेतला मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

प्रचार रणधुमाळीत ममता दीदींनी घेतला मोठा निर्णय

प्रचार रणधुमाळीत ममता दीदींनी घेतला मोठा निर्णय

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

कोलकाता - देशात कोरोनाचा संसर्ग दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. यातच देशातील पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुका, कुंभमेळा याठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरनाच्या वाढत्या संसर्गामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचार न कऱण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार करणार नाही असं ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे. खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. ममता बॅनर्जी आता कोलकात्यात प्रचार करणार नाहीत.

डेरेक ओ ब्रायन यांनी ट्विटरवरून म्हटलं की, बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी आता कोलकात्यात प्रचार करणार नाहीत. त्यांनी प्रतिकात्मक पद्धतीने शहरात निवडणूक प्रचाराच्या आदल्या दिवशी फक्त एक बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतर सर्व जिल्ह्यात त्यांच्या निवडणूक प्रचार सभा आणि दौऱ्यांचा वेळ कमी केला आहे. फक्त 30 मिनिटेच प्रचार सभा करणार आहेत अशी माहिती डेरेक यांनी दिली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याआधी अशी मागणी केली होती की, पश्चिम बंगालमधील उर्वरीत टप्प्यांचे मतदान हे एकाच वेळी घेण्यात यावं.

हेही वाचा: 'मोदी पंतप्रधान नव्हे पक्षपाती प्रचारक'

राहुल गांधींच्या उर्वरित सभा रद्द

पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार भरात असताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी तेथील त्यांच्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन इतर राजकीय नेत्यांनी याचे अनुकरण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. बंगालमध्ये अद्याप तीन टप्प्यांतील मतदान अद्याप व्हायचे आहे. त्यामुळे प्रचारसभा, प्रचारफेऱ्या जोरात सुरू आहेत. त्यामुळे मतदारांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यात राज्यातील रुग्णसंख्या देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल यांनी हा निर्णय घेतल्याचे ट्विटद्वारे जाहीर केले. ‘‘सध्याच्या काळात मोठ्या प्रचारसभा घेतल्याने त्याचे दुष्परिणाम काय होतील, याचा सर्वच राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे,’’ असे त्यांनी नमूद केले आहे.