esakal | मी घराबाहेर निघू नये, म्हणून भाजपचा डाव; ममतादीदींचा गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

mamta banarjee

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.

मी घराबाहेर निघू नये, म्हणून भाजपचा डाव; ममतादीदींचा गंभीर आरोप

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुखापत होऊनही प्रचारसभा सुरुच ठेवल्या आहेत. एका प्रचारसभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांना आयुष्यात अनेकवेळा मारहाण करण्यात आली. याआधी सीपीएमचे लोक मारहाण करायचे, आता भाजपचे लोक मला मारहाण करत आहेत. काही दिवसांपूर्वी नंदीग्राम प्रचारसभा घेताना ममता जखमी झाल्या होत्या. यामागे भाजप असल्याचा आरोप त्यांनी केला होता. भाजपने हा आरोप फेटाळून लावला. शिवाय निवडणूक आयोगाने हा केवळ अपघात असल्याचं स्पष्ट केलं होतं. 

झारग्राममध्ये एका सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आयुष्यात मला अनेकदा मारहाण करण्यात आली. याआधी सीपीएमचे लोक असं करायचे, आता भाजपने तसं करणं सुरु केलं आहे. सीपीएमचे अनेक लोक भाजपमध्ये गेले आहेत. काही गद्दार आणि लोभी लोक भाजपमध्ये सामिल झाले आहेत, अशी बोचरी टीका ममतादीदींनी केली. निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलचे अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत. या पार्श्वभूमीवर ममतांनी अशा लोकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. 

भाजप पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मला घराच्या आत ठेवू पाहात होती, त्यामुळे मला ही दुखापत झाली. भाजपला वाटतं की मी घरीच रहावं, निवडणुकीच्या रिंगणात उतरु नये. म्हणूनच त्यांनी मला दुखापत केली. पण, कितीही प्रयत्न झाला तरी माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. आपण भाजपला हरवू . तुम्ही तृणमूलच्या उमेदवाराला दिलेलं प्रत्येक मत, मला मिळणार आहे, असं ममता बॅनर्जी सभेला संबोधित करताना म्हणाल्या.

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रचार अभियानाची जोरदार तयारी सुरु आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रचारसभांचा सपाटा लावला आहे. 10 मार्चला नंदीग्राम जागेवरुन त्यांनी नामांकन भरले आहे. एका दुर्घटनेत त्या जखमी झाल्या. त्यांना एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे त्यांच्या पायावर प्लास्टर लावण्यात आले. यासंबंधीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ममता यांनी दुखापत होऊनही प्रचार थांबवलेला नाही.
 

loading image