हिंदुत्वाला टक्कर प्रादेशिक अस्मितेची

बांकुरा: पश्‍चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा मंगळवारी रोड शो झाला.
बांकुरा: पश्‍चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा मंगळवारी रोड शो झाला.

कोलकता - पश्चिम बंगालमधील राजकीय रणधुमाळीमध्ये यंदा प्रथमच प्रादेशिक अस्मिता वरचढ ठरताना दिसून येते. भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाच्या प्रचाराला रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसने प्रादेशिक अस्मितेचे शस्त्र उपसले आहे. भाजपला बाहेरचा पक्ष ठरवितानाच ममतांनी बंगाली अस्मितेला हात घातला आहे. यासाठीच त्यांनी ‘बंगालला हवी स्वतःचीच मुलगी ’ ही घोषणा दिल्याचे दिसते. आतापर्यंत वंगभूमीतील बहुतांश निवडणुका या विचारधारेवर लढण्यात आल्या. या खेपेस मात्र प्रथमच बंगाली अस्मिता टोकदार बनलेली दिसून येते. फसवणुकीच्या आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणाला केवळ प्रादेशिक अस्मितेच्या माध्यमातून रोखता येऊ शकते, असे तृणमूलच्या एका नेत्याने सांगितले. राजकीय विश्‍लेषकांनी देखील याचा लाभ ममतांना होऊ शकतो असा अंदाज वर्तविला आहे.

यंदा आम्ही प्रथमच बंगाली अस्मितेचा मुद्दा लावून धरला आहे. येथील भूमिपूत्राला महत्त्व मिळायला हवे.
- सौगत रॉय, तृणमूलचे नेते

भाजप अनेक राज्यांमध्ये सत्तेवर आहे पण आम्ही कोठेही भाषा अथवा संस्कृतीची सक्ती केलेली नाही. आताही तृणमूलकडून केले जाणारे आरोप निराधार असून केवळ मतांसाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे.
- दिलीप घोष, प्रदेशाध्यक्ष भाजप

बड्या नेत्यांचा प्रभाव
बंगालमध्ये प्रादेशिक अस्मितेचा प्रभाव याआधीही पन्नासच्या दशकात पाहायला मिळाला होता. तेव्हा काँग्रेसचे सरकार राज्यामध्ये होते. तत्कालीन मुख्यमंत्री विधानचंद्र रॉय यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नऊ महापालिका आणि एका पोटनिवडणुकीत पानिपत झाले होते. पुढे नव्वदच्या दशकापर्यंत ही अस्मिता सुप्तावस्थेत होती. याचे  महत्त्वाचे कारण म्हणजे त्याकाळी काँग्रेस आणि माकपचे अनेक बडे नेते मैदानात होते. यामध्ये डाव्यांचे ज्योती बसू, भुपेश गुप्ता, इंद्रजित गुप्ता काँग्रेसकडून सिद्धार्थ शंकर रे, प्रणव मुखर्जी, ए.बी.ए घनी खान चौधरी यांचा समावेश होता.

भाजपकडून प्रचार
तृणमूलचा प्रचार लक्षात घेऊनच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही त्यांच्या सभांमध्ये केवळ भाजपच बंगाली अस्मितेला परत मिळवू शकतो असा दावा करायला सुरुवात केली आहे. भाजपकडून जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांचे मूळ हे बंगाली असल्याचा प्रचार जाणीवपूर्वक केला जात आहे. रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली महानायक पुढे करून भाजपकडून प्रचार केला जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एनआरसीचा वाद
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांचा झालेल्या कथित अवमानाचा मुद्दा तृणमूलने लावून धरला होता. त्यानंतर आसाममधील एनआरसीच्या यादीच्या प्रकाशनामुळे तृणमूलला भाजपवर टीका करण्याची संधी मिळाली.आसाममधील एनआरसीच्या यादीतून १९ लाख लोकांना वगळले असून त्यात बंगाली नागरिकांचा समावेश असल्याचा आरोप तृणमूलने केला होता. 

डाव्यांना ममतांचा शह
आतापर्यंत बंगालची मूळ प्रवृत्ती ही बंडखोरीची राहिलेली आहे. केंद्रामध्ये जो पक्ष सत्तेवर असतो त्याला विरोध करणारा पक्षच राज्यामध्ये येतो. तृणमूलचा १ जानेवारी १९९८ रोजी जन्म झाल्यानंतर ममतांनी मा, माटी आणि मानुषचा नारा देत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेचा संगम साधत डाव्यांना यशस्वी शह दिला होता. भाजपच्या आगमनानंतर तृणमूलने प्रादेशिक अस्मितेला जवळ केले आहे. त्यामुळे बाहेरचे आणि आतले हा वाद अधिक तीव्र झाला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com