esakal | ...म्हणून मिथुन चक्रवर्ती यांना मिळणार Y+ सुरक्षा, गृह मंत्रलयानं दिले आदेश 
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून मिथुन चक्रवर्ती यांना मिळणार Y+ सुरक्षा, गृह मंत्रलयानं दिले आदेश 

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेल्या सात जणांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे

...म्हणून मिथुन चक्रवर्ती यांना मिळणार Y+ सुरक्षा, गृह मंत्रलयानं दिले आदेश 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

West Bengal Assembly Election 2021 : बॉलिवूडील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या गोटात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी मी कोबरा असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे मिथुन चक्रवर्ती सोशल मीडियावर चर्चेत होते. आता मिथुन चक्रवर्ती यांना केंद्र सरकारनं वाय प्लस दर्जाची  सुरक्षा पुरवण्यात आली आहे. गृह मंत्रालयाकडून बुधवारी यासंबंधी एक आदेश जारी करण्यात आला.

वाय प्लस दर्जाची सुरक्षा मिळाल्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांना आता केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) सुरक्षा पुरवणार आहे.  बंगालमध्ये भाजप नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. पुढच्या आदेशापर्यंत ही सुरक्षा मिथुन चक्रवर्ती यांना कायम राहील. वाय प्लस दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत मिथुन चक्रवर्ती यांना ११ कमांडोचं एक पथक सुरक्षा देणार आहे. याशिवाय ५५ सुरक्षारक्षकांची एक टीम त्यांच्या निवासस्थानाजवळ तसंच ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत असेल.

मिथुन चक्रवर्तीसोबतच पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेल्या सात जणांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. यामध्ये खासदार निशिकांत दुबे यांचाही समावेश आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती नुकतेच भाजपच्या गोटात दाखल झाले होते. 'मी असली कोब्रा आहे. चावलो तर तुम्ही फोटोमध्ये जाल. मी जोलधरा साप नाही, बेलेबोरा सापही नाही... मी एक कोब्रा आहे. एका चाव्यात सगळं संपून जाईल', अशी वक्तव्य यावी मिथुन चक्रवर्ती यांनी केली होती.
 

मिथुन यांची राजकारणात एन्ट्री

मिथुन यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकारणात येण्याची ऑफर दिली. २०१४ साली मिथुन तृणमूलच्या तिकीटावर राज्यसभेत गेले. पण, २०१६ मधील शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मिथुन अडीच वर्षात केवळ तीनवेळा संसदेत गेले होते. मिथुन यांनी राजकीय सन्यास घेतला होता. पण, ते आता पुन्हा भाजपसोबत आपली राजकीय कारकीर्द सुरु करताहेत. कधीकाळी भाजप आणि संघाच्या नेत्यांनी मिथुन यांना अरबन नक्षल ठरवलं होतं. त्याच भाजपसोबत मिथुन यांनी हातमिळवणी केलीये. मिथुन यांचा पश्चिम बंगालमध्ये आजही एक मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे विधानसभा निकालावर याचा काय परिणाम पडतो हे पाहावं लागणार आहे.

loading image