ममतांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट? राज्यपालांनी दिले संकेत

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 11 December 2020

गुरुवारी कोलकाताच्या डायमंड हार्बर येथे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता.

कोलकाता- गुरुवारी कोलकाताच्या डायमंड हार्बर येथे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर आज शुक्रवारी राज्यपाल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. जर तुम्ही संविधानाच्या मार्गापासून भटकत असाल तर तेथून माझ्या कर्तव्याची सुरुवात होते. मी तुम्हाला विनंती करतो की, संविधानाच्या विरोधात काम करु नका, असं आवाहन राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांना केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यपाल पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतील, अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. 

भारताच्या संविधानाची सुरक्षा करण्याची जबाबदारी माझी आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत वाईट आहे. बंगालमध्ये संविधानाची मर्यादा तुटत आहे. डायमंड हार्बरमध्ये नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. ममता बँनर्जी यांनी यासाठी माफी मागायला हवी. ममता यांना संविधानाचे पालन करावे लागेल, असं राज्यपाल पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. 

जे झालं ते दुर्दैवी, लोकशाहीवर डाग

जे काही गुरुवारी झालं, ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे लोकशाहीवर डाग लागला आहे. सर्वांना आपले मत ठेवण्याचा अधिकार आहे. पण गुरुवारी असं झालं नाही. सिलीगुडीमध्येही असं झालं. निदर्शने करणाऱ्यांना धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे मानवाधिकार दिवशीच असे झाले, असंही ते म्हणाले. सरकारी अधिकारी पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत आहेत. अशा 21 लोकांची माझ्याकडे यादी आहे, मी ममतांना याबाबत कळवलं आहे, असं राज्यपाल म्हणाले.

भाजपच्या अनेक नेत्यांवर हल्ला झाला आहे. भाजप नेते कैशाश विजयवर्गीय तेथे उपस्थित होते. जेपी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची अधिकाऱ्यांनी मला कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे राज्यात संवैधानिक मशीनरी फेल झाल्याचे संकेत मिळत आहेत, असंही राज्यपाल म्हणाले. राज्यापालांनी राज्यातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केल्याने ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Bengal Governor Jagdeep Dhankhar Chief Minister mamta banarjee