आता दारू मिळणार घरपोच!

वृत्तसंस्था
Thursday, 7 May 2020

ऑनलाईन करता येणार ऑर्डर

- नियमांचे उल्लंघन केल्याने निर्णय

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी मोदी सरकारने देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. मात्र, आता काही व्यवहार सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. पण ही विक्री होत असताना अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले गेले नाही. त्यामुळे आता दारू घरपोच देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंजाब सरकारने राज्यामध्ये आजपासून दारू विक्री सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे वृत्त वृत्तसंस्थने दिले आहे. पंजाबमध्ये संचारबंदी लागू असली तरी दररोज चार तासांसाठी हे नियम शिथिल करण्यात येतात. या वेळेत दारू विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत दारुची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

तसेच घरपोच दारू देण्याचीही व्यवस्था केली आहे. पण दारू विक्री होत असताना सरकारकडून काही नियमही घालून देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोणत्याही ग्राहकाला दोन लिटरपेक्षा जास्त दारुची विक्री करु नये, दारू विक्रेत्यांना घरपोच दारू पोहोचवण्याची परवानगी दिली असली तरी त्यामध्ये काही अटी आहेत. दारुची डिलिव्हरी करणाऱ्या मुलांकडे कर्फ्यू पास, ओळखपत्र आणि डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी जे वाहन वापरणार त्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी आवश्यक असणार आहे.

ऑनलाईन करता येणार ऑर्डर

पंजाब सरकारने दारू विक्रीला परवानगी दिल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्येही दारुच्या होम डिलिव्हरीची परवानगी देण्यात आली आहे. 'बीईव्हीसीओ'ने वेबसाईट लाँच केली असून, त्यावर 21 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती दारुची ऑनलाईन ऑर्डर देऊ शकते. 

नियमांचे उल्लंघन केल्याने निर्णय

दारू विक्रीला परवानगी दिल्यानंतर अनेक राज्यांमध्ये वाईन शॉप, दारूच्या दुकानांबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले. त्यामुळे आता घरपोच दारू देण्याचा निर्णय झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Bengal govt allows home delivery of liquor