काँग्रेसमध्ये फुटलेला 'लेटर बॉम्ब' काय आहे? वाचा राहुल, प्रियंका गांधींपुढील आव्हानं

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 23 August 2020

अनेक राज्यांमध्ये बंडखोरीचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसमध्ये एक लेटर बॉम्ब फुटला आहे.

नवी दिल्ली- अनेक राज्यांमध्ये बंडखोरीचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसमध्ये एक लेटर बॉम्ब फुटला आहे. २० पेक्षा अधिक नेत्यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. या पत्रामध्ये सोनिया गांधी यांच्याविरोधात काही लिहिण्यात आलं नाही, असं पत्र लिहिणाऱ्या नेत्यांपैकी एकाने सांगितलं.

काँग्रेसमधील एक गट राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाचा अध्यक्ष करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं होतं की, पक्षातील कार्यकर्ते आणि नेते राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवू पाहात आहेत. मात्र, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनी यापूर्वीच ही जबाबदारी घेण्यासाठी नकार दिला आहे. विशेष म्हणजे पक्षातील कोणताही मोठा निर्णय राहुल आणि प्रियंका यांच्या सल्ल्याशिवाय घेतला जात नाही. सचिन पायलट यांच्या प्रकरणात हा प्रत्यय आला आहे.

पोलिसांच्या कामातील बदल, का आणि कोणते?
 

काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पक्ष बंडखोरीच्या दिशेने जात आहे का, असे सवाल विचारले जाऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांच्या युवा टीममधील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली आहे. दुसरेकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा पक्ष नेतृत्वासाठी अडचणीचे ठरणारी वक्तव्यं केली आहेत.

काँग्रेसमध्ये गांधी परिवाराला विरोध सुरु झाला आहे का?

नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षातील संकटांचा उल्लेख केला आहे. तसेच त्यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. यामुळे पक्षातील नेते अंतरिम अध्यक्षा आणि पक्ष चालवण्याच्या पद्धतीबाबत नाराज असल्याची शंका घेण्यास वाव आहे. पक्षातील कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी नेत्यांना गांधी परिवाराकडे जावे लागते.

काँग्रेसमध्ये गटबाजी सुरु झाली का? 

ही पहिली वेळ आहे, जेव्हा काँग्रेस नेत्यांनी थेट पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे सोनिया गांधी अध्यक्षपदावर असताना असं होत आहे. पक्षातील एक मोठा वर्ग राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये आपला नेता शोधत नाही. दुसरीकडे पक्षाचे अनेक नेते संपूर्ण बदलाची मागणी करत आहेत.

सुशांतच्या मृत्यूच्या आधी एक आठवडा काय घडलं? कामगाराने सांगितला घटनाक्रम

काँग्रेसमध्ये वाढला अंतर्गत वाद

काँग्रेसमधील अनेक मोठे नेते पक्ष सोडण्याचा विचार करत आहेत का? काँग्रेसमधील नेत्यांमध्ये अंसतोष वाढला आहे. काँग्रेस नेत्यांनी पाठवलेल्या लेटर बॉम्बमुळे पक्षात अंतर्गत वाद असल्याचं समोर येत आहे.

सध्या 'कामचलाऊ' व्यवस्था!

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडले. त्यानंतर सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षा बनल्या. पुढच्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया गांधी अध्यक्षा असणार आहेत. त्यामुळे सध्या 'कामचलाऊ' व्यवस्था सुरु आहे. सोनिया गांधी आरोग्याच्या कारणास्तव सक्रिय नाहीत. दुसरीकडे कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी वेळ लागत आहे.
 
लेटर बॉम्बला निष्क्रिय करण्यासाठी CWC ची बैठक? 

लेटर बॉम्बनंतर काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. नेत्यांच्या पत्राला नाराजीच्या स्वरुपात पाहिलं जात आहे. त्यामुळे लेटर बॉम्बला निष्क्रिय करण्यासाठी काँग्रेस कार्यकारणीची बैठक  CWC बोलावले जाण्याची शक्यता आहे. सध्या गांधी परिवारासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

(edited by-kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the letter bomb in Congress Rahul gandhi Priyanka Gandhi soniya gandhi