आपले अंतराळवीर यानामध्ये काय खाणार?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

पुणेः अवकाश संशोधन क्षेत्रात मोठमोठे भीमपराक्रम करणाऱ्या आपल्या इस्त्रोने आता गगनयान मिशन २०२१ हाती घेतले आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. वायुदलाच्या चार जवानांना स्पेशल ट्रेनिंगसाठी रशियाला पाठवले जाणार आहे. हे अंतराळवीर पृथ्वीपासून 400 किलोमीटरवर सात दिवस फिरत अभ्यास करत राहतील, अशी माहिती इस्त्रोचे डॉक्टर के. व्ही सेवन यांनी दिली आहे. या मोहिमेविषयी सर्वांना उत्सुकता आहेच. पण सामान्य माणसांना उत्सुकता आहे, ती हे अंतराळवीर आठवडाभर अंतराळयानात काय खाणार वा पिणार? कारण अवकाशात वजनविरहीत अवस्थेत तरंगत असताना खाण्यापिण्याचीही विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणजे त्याचेही एक शास्त्रे असते.

पुणेः अवकाश संशोधन क्षेत्रात मोठमोठे भीमपराक्रम करणाऱ्या आपल्या इस्त्रोने आता गगनयान मिशन २०२१ हाती घेतले आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. वायुदलाच्या चार जवानांना स्पेशल ट्रेनिंगसाठी रशियाला पाठवले जाणार आहे. हे अंतराळवीर पृथ्वीपासून 400 किलोमीटरवर सात दिवस फिरत अभ्यास करत राहतील, अशी माहिती इस्त्रोचे डॉक्टर के. व्ही सेवन यांनी दिली आहे. या मोहिमेविषयी सर्वांना उत्सुकता आहेच. पण सामान्य माणसांना उत्सुकता आहे, ती हे अंतराळवीर आठवडाभर अंतराळयानात काय खाणार वा पिणार? कारण अवकाशात वजनविरहीत अवस्थेत तरंगत असताना खाण्यापिण्याचीही विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणजे त्याचेही एक शास्त्रे असते. आता त्या शास्त्रानुसार तयार केलेले तब्बल 22 पदार्थ हे अंतराळवीर सोबत नेणार आहेत.

डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी बनवते खाण्याचे पदार्थ
गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांचे हे खाद्यपदार्थ बनविले आहेत, म्हैसूर येथील डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीने. प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवान तग धरू शकतील आणि त्यांना त्यातून जगण्यासाठी पुरेसे अन्नघटक मिळतील, असे पदार्थ या संस्थेद्वारे शोधले जातात. हीच संस्था अंतराळवीरांसाठीही अन्नपदार्थ बनवते. गगनयान मोहिमेत जाणाऱ्या अंतराळवीरांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्हीही प्रकारचे तब्बल 22 पदार्थ बनविण्यात आले आहेत. त्यात व्हेज रोल, अंडा रोल, पुलाव, हलवा, इडली, सांबार, चिकनकरी, बिर्याणी या पदार्थांसोबतच फणसाचे गरे, अननस या फळांचाही समावेश असेल. हे पदार्थ गरम करण्यासाठी अंतराळवीरांना सोबत हिटरही देण्यात येणार आहे.

अन्नाची हवाबंद पॅकेट एकदा उघडल्यावर ती त्यांना 24 तासांत संपवावी लागणार आहेत. इडली मिक्स, मसाला गरम पाण्यात मिसळून अंतराळवीर इडली-सांबार बनवू शकतील. अर्थात हे पदार्थ खाण्यासाठी त्यांना सोबत काटे, चमचे अथवा प्लेटस नेता येणार नाहीत. यानामध्ये पाणी पिण्यासाठी खास प्रकारचे पॅकेट बनविली जाणार आहेत. ही पॅकेटस् गुरुत्वाकर्षण विरहीत वातावरणात वापरता येतील. ती एवढी भक्कम असतील, की अवकाशातील वातावरणात ती फाटणार नाही किंवा सडणारही नाहीत. 
  
काय आहे गगन यान मिशन?
अंतराळात स्पेस स्टेशन उभे करण्याचा भारताचा मानस आहे. गगनयान मिशन ही त्याची अगोदरची पायरी म्हणता येईल. अर्थात याही अगोदर डिसेंबर 2020 पाठवले होते आणि आता जुलै 2021मध्ये इस्त्रो अवकाशात मानवविरहीत यान पाठवेल. गगनयान मिशनच्या माध्यमातून पाठविलेले अंतराळवीर पृथ्वीपासून ४०० किलोमीटर उंचीवर सात दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत राहतील आणि वातावरणाच्या तसेच अवकाश संशोधनासंबंधी इतर बाबी नोंदवत राहतील.
  
25 जणांमधून 4 जणांची निवड
या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी सुरुवातीला वायुसेनेचे २५ जवान निवडण्यात आले. त्यातून नंतर १२ जणांची निवड करण्यात आली. त्यातूनही शेवटी चारच जणांची अंतिम निवड झाली. अवकाश संशोधन क्षेत्रातील झालेल्या करारानुसार या अंतराळवीरांना प्रशिक्षणासाठी रशियाला पाठविण्यात येणार आहे. याआधी भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा २ एप्रिल १९८४ रोजी रशियाच्या सोयूज -११ मधून अवकाशात गेले होते. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासी बोलताना अवकाशातून आपला भारत 'सारे जहाँ से अच्छा' दिसत असल्याचे उद्गार त्यांनी काढले होते.  
२०२१ च्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या या मिशनचा खर्च तब्बल १० हजार करोड असणार आहे. अर्थात हे गगनयान मिशन भारताचा अंतराळ क्षेत्रातील दबदबा वाढविणारे ठरेल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what will astronaut eat in spacecraft