नरेंद्र मोदींची काय चर्चा होणार आज अर्थतज्ज्ञांशी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 जानेवारी 2020

आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. ९) देशभरातील प्रमुख अर्थतज्ज्ञांशी चर्चा करतील. निती आयोगात होणाऱ्या संवाद बैठकीत आर्थिक सुधारणांबाबतच्या तज्ज्ञांच्या सूचना जाणून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

नवी दिल्ली - आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. ९) देशभरातील प्रमुख अर्थतज्ज्ञांशी चर्चा करतील. निती आयोगात होणाऱ्या संवाद बैठकीत आर्थिक सुधारणांबाबतच्या तज्ज्ञांच्या सूचना जाणून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ढासळती अर्थव्यवस्था सावरण्याची चिंता सरकारपुढे आहे. अमेरिका-इराणमधील संघर्षामुळे तेलाचे दर कडाडल्याने या चिंतेत आणखी भर पडली आहे. याशिवाय, २०१९-२० या आर्थिक वर्षातील विकासदर आधीच्या वर्षातील ६.८ टक्‍क्‍यांच्या तुलनेत पाच टक्‍क्‍यांवर येण्याच्या शक्‍यतेने सरकारची तारांबळ उडाली असून, उपाययोजनांसाठी आता धावपळ सुरू झाली आहे.

सरकारच्या धोरणांबद्दल उद्योग क्षेत्राला वाटणारा संशय आणि या क्षेत्राचा निरुत्साह दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सोमवारी (ता. ६) उद्योजकांशी चर्चा केली होती. उद्योजकांच्या गुंतवणुकीच्या योजना जाणून घेताना उद्योग विस्तारासाठी हवे ते सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. तेल, ऊर्जा तसेच पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले असून, नव्या गुंतवणुकीसोबत वेगवेगळ्या भागांत उद्योगाचा विस्तार करण्याचे आवाहनही मोदींनी केले होते. याच प्रक्रियेचा भाग म्हणून सरकारने आज कोळसा खाणींच्या नियंत्रित उपयोगाच्या निकषात सुधारणा करण्यासाठी कायदाबदलाची घोषणा केली. शिवाय, तातडीच्या अंमलबजावणीसाठी वटहुकमाद्वारे उद्योग क्षेत्राला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. याच प्रक्रियेचा पुढचा टप्पा म्हणून आता अर्थतज्ज्ञांशी संवाद साधला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What will Narendra Modi discuss with economists today