भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण?

पीटीआय
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

मग काँग्रेसला मत का दिले नाही
मुलाखतीत केजरीवाल यांनी काँग्रेसवरही टीका केली. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शीला दीक्षित सरकारच्या कामाचे श्रेय केजरीवाल घेत असल्याचा आरोप केला होता. याचा संदर्भ घेत केजरीवाल म्हणाले, की देशातील जुन्या पक्षाने दिल्लीतील लोकांसाठी काम केले असते, तर त्यांनी काँग्रेस पक्षाला मतदान केले असते. त्यांना मत का दिले नाही, मतदारांनी आम आदमी पक्षाला मतदान का केले, असा सवालही त्यांनी केला.

नवी दिल्ली - भाजपकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी कोण असा सवाल करत, एकही पात्र व्यक्ती नाही, अशी टीका आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा आल्यास मोफत योजना कायम राहतील, असे आश्‍वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीत ७० जागांसाठी येत्या शनिवारी (ता. ८) मतदान होत असून, ११ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. केजरीवाल यांनी मुलाखतीत म्हटले, की मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता दिल्लीकरांना आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. निकालातून ते ध्रुवीकरण यशस्वी झाले की नाही हे समजेल. ते म्हणाले, ‘आप’च्या मतदारांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, अत्याधुनिक रस्ते, चोवीस तास वीज हवी आहे. विधानसभा निवडणुकीमुळे भाजपने शाहिनबागच्या आंदोलकांना अद्याप हटविले नसल्याचाही आरोप केजरीवाल यांनी केला. गृहमंत्र्यांकडून आंदोलकांना हटवण्याबाबत अडवणूक का केली जात आहे, अमित शहांचे कोणते हित दडले आहे, असा सवाल केजरीवाल यांनी केला. दिल्लीत आंदोलनावरूत ते घाणेरडे राजकारण करत आहेत. भाजपचे नेते दिल्लीतील बेकायदा कॉलनीला संपूर्णपणे विसरून गले आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. आप पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोफत योजना सुरूच राहतील आणि गरज भासल्यास आणखी योजना आणल्या जातील, असेही केजरीवाल म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is BJPs Delhi Chief Minister