कोण आहेत कुलभूषण जाधव?

टीम ई सकाळ
सोमवार, 10 एप्रिल 2017

'रॉ'च्या कठोर नियमांनुसार, कुलभूषण जाधव नेमके कोण, कुठले, पाकिस्तानमध्ये ते कसे पोहोचले ही माहिती कदाचित कधीच उघड होणार नाही. मात्र, त्यांची फाशीची शिक्षा रोखली जावी, यासाठी भारत सरकारला मोठा दबाव पाकिस्तानवर आणावा लागणार आहे, हे निश्चित.

गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये कुलभूषण जाधव या भारतीय कथित गुप्तहेराला पाकिस्तानने अटक केली आणि तब्बल तीन आठवडे ही बातमी गोपनीय ठेवली. 3 मार्च 2016 च्या अटकेनंतर 26 मार्च 2016 रोजी पहिल्यांदा पाकिस्तानी माध्यमात या अटकेला वाचा फुटली, ती पाकिस्तानी चौकशी अधिकाऱयांनी जाहीर केलेल्या एका व्हिडिओमुळे. भारताची रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW - रॉ) आणि पाकिस्तानची इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI - आयएसआय) यांच्यामार्फत परस्परांच्या देशामध्ये सुरू असलेल्या गोपनिय कारवायांची चर्चा जाधव यांच्या अटकेनंतर आणि व्हिडिओमुळे जगभर झाली. 

'आयएसआय'च्या प्रसिद्धी विभागाच्या दाव्यानुसार, बलुचिस्तानातील मश्केल येथे जाधव यांना अटक करण्यात आली. 'पाकिस्तानात गोपनिय कारवाया करणे आणि घातपात घडवून आणणे,' या आरोपांखाली जाधव यांच्यावर अटकेची कारवाई झाली. 26 मार्च 2016 रोजी पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याने जाधव यांचा पासपोर्टही प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचवला. त्या पासपोर्टवर हुसेन मुबारक पटेल असे नाव आहे. पासपोर्टवरील फोटो कुलभूषण जाधव यांचा होता. ठाणे विभागीय पासपोर्ट कार्यालयाने 12 मे 2014 रोजी हा पासपोर्ट जारी केल्याचा उल्लेख आहे. पासपोर्टवरील माहितीनुसार, पटेल यांचे मुळ गाव सांगली होते. 

पाकिस्तानने 'रॉ' एजंट पकडल्याची माहिती टीव्ही चॅनेल्सवर सुरू झाल्यावर जाधव यांचे काका सुभाष जाधव यांनी पासपोर्टवरील फोटो ओळखला आणि हा फोटो कुलभूषण जाधव यांचा असल्याची माहिती भारतीय प्रसार माध्यमांना दिली. सुभाष जाधव मुंबईचे निवृत्त पोलीस उपायुक्त आहेत. कुलभूषण जाधव यांच्या वडिलांचे नाव सुधीर आहे आणि जाधव कुटुंब मुंबईत पोवईजवळील सिल्व्हर ओक सोसायटीत राहते, अशी माहितीही वर्षभरापूर्वी समोर आली. कुलभूषण जाधव भारतीय नौदलात कमांडर होते आणि त्यांनी सेवानिवृत्ती घेतली असल्याचेही याच काळात प्रसिद्ध झाले. भारतीय गुप्तचर खात्यातील ज्येष्ठ अधिकाऱयांच्या माहितीनुसार, जाधव 2003 पासून पाकिस्तानात काम करत होते. अधिकाऱयांच्या मते, जाधव कुटुंबियांशी फोनवर मराठीत बोलत असत आणि त्यामुळेच त्यांच्याकडे पाकिस्तानी गुप्तचर खात्याचे लक्ष वेधले गेले असावे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2015 मध्ये अफगाणिस्तानच्या दौऱयावरून परतताना अचानक लाहोरमध्ये उतरून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. त्या नंतर भारत-पाकिस्तान संबंधातील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण होत असतानाच पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने कुलभूषण जाधव यांच्या अटकेची कारवाई केली होती. 

जाधव यांना इराणमधून पळवून नेले होते, असा दावा भारताने सातत्याने केला. जुलै 2016 मधील पत्रकार परिषदेत भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले, की जाधव यांना इराणमधून कोणत्या परिस्थितीत पळवून नेले, याबद्दल संभ्रम आहे. भारताने जाधव यांच्याशी संपर्क साधू देण्याची विनंती पाकिस्तानला केली होती. तथापि, ती विनंती मान्य झाली नाही. लोकसभेत डिसेंबर 2016 रोजी जाधव यांच्या अटकेचा विषय उपस्थित झाला, तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाने जाधव यांच्यावर पाकिस्तानने केलेले सर्व आरोप फेटाळले होते. जानेवारी 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तानने परस्परांच्या देशातील काही कैद्यांना मुक्त करण्याच्यादृष्टीने पावले उचलली. त्यासाठी कैद्यांच्या याद्यांची देवाण-घेवाणही झाली. मात्र, त्या यादीमध्ये कुलभूषण जाधव यांचे नाव नव्हते. 

'रॉ'च्या कठोर नियमांनुसार, कुलभूषण जाधव नेमके कोण, कुठले, पाकिस्तानमध्ये ते कसे पोहोचले ही माहिती कदाचित कधीच उघड होणार नाही. मात्र, त्यांची फाशीची शिक्षा रोखली जावी, यासाठी भारत सरकारला मोठा दबाव पाकिस्तानवर आणावा लागणार आहे, हे निश्चित.

Web Title: Who is Kulbhushan Jadhav