उपसभापतींविरुद्ध ‘अविश्‍वास’ आणणार; पक्षपातीपणा केल्याचा विरोधकांचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 20 September 2020

गोंधळात विधेयके मंजूर न करण्याच्या लोकशाही परंपरेचे हरिवंश यांनी पालन केले नाही, असा ठपका काँग्रेसने ठेवला आहे.

नवी दिल्ली- कृषी विधेयकांना मंजुरी घेतेवेळी राज्यसभेत आज झालेल्या अभूतपूर्व गदारोळानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह ऊर्फ हरिवंश यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव आणण्याचे ठरविले आहे. गोंधळात विधेयके मंजूर न करण्याच्या लोकशाही परंपरेचे हरिवंश यांनी पालन केले नाही, असा ठपका काँग्रेसने ठेवला आहे. राज्यसभेत संख्याबळाबाबत भाजप आघाडी अजूनही बहुमतात नाही. त्यामुळे विरोधकांच्या संतापाचे सारे लक्ष्य हरिवंश ठरले आहेत.

राज्यसभेत आज दोन कृषी विधेयके सरकारने अभूतपूर्व गदारोळातच मंजूर करवून घेतली. या संपूर्ण कामकाजावेळी पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनावर असलेले हरिवंश यांनीच सारे कामकाज हाताळले. गोंधळामुळे कामकाज दुपारी एकनंतरही चालले व एकदा बैठक १० मिनिटांसाठी तहकूबही करावी लागली. सभापती वेंकय्या नायडू यांनी यापूर्वीच गोंधळात विधेयके मंजूर न करण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली होती. प्रत्यक्षात आज दोन्ही कृषी विधेयके आजच्या आजच मंजूर करून घ्यायची, असा हट्ट भाजपने धरला व तो तडीसही नेला.

ही तर लोकशाहीची हत्या! राज्यसभेत कृषी विधेयकाच्या मंजुरीनंतर विरोधकांची...
 

या साऱ्यात हरिवंश यांनी पक्षपाती भूमिका केल्याचे काँग्रेससह विरोधकांचे म्हणणे आहे. खुद्द त्यांच्याही अंगावर पुस्तके फेकण्यात आली व गोंधळात तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी हरिवंश यांच्याशी झोंबाझोंबीही केली. या गोंधळामुळे सभापती वेंकय्या नायडू संतप्त असल्याचे सांगितले जाते. भाजपने गोंधळी सदस्यांवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. ओब्रायन यांच्यासह राजीव सातव, आपचे संजय सिंह, माकपचे एल्लमारम करीम व द्रमुकचे काही खासदार यांच्यावर कारवाई करावी यासाठी सत्तारूढ पक्ष आग्रहयुक्त दबाव वाढवत असल्याचे लक्षात येताच विरोधकांनी हरिवंश यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव आणण्याचे प्रतिअस्त्र उगारले आहे.

हरिवंश यांच्याविरुद्धच्या अविश्‍वास प्रस्तावाबद्दल काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सांगितले, ‘‘त्यांनी गदारोळात संसदीय लोकशाहीच्या परंपरांचे रक्षण करणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी त्यांनी आपल्या वर्तनाने या परंपरांना धक्का व नुकसान पोचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष हरिवंश यांच्याविरुद्ध उद्याच (ता. २१) एकत्रितपणे अविश्‍वास प्रस्ताव दाखल करतील.’’

विरोधकांच्या गोंधळातच राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर

रेड्डींचे ताशेरे हटविले

वायएसआर काँग्रेसचे जी. विजय साई रेड्डी यांनी आज कृषी विधेयकांवर बोलताना कॉँग्रेसवर तुफान आरोप केले होते. त्यावर काँग्रेसचे सदस्य खवळून त्यांच्याशी भांडू लागले. रेड्डींनीही त्यांना प्रत्युत्तर देणे सुरू ठेवल्याने चर्चा सुरू असतानाच सभागृहात तणाव निर्माण झाला होता. रेड्डी यांचे भाषण तपासून ते उद्‍गार कामकाजात ठेवायचे की गाळायचे, याबाबत सभापती निर्णय घेतील असे पीठासीन अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर कॉँग्रेसने संयमाची भूमिका घेतली. अखेर सभापती वेंकय्या नायडू यांनी रेड्डी यांचे ते उद्‍गार कामकाजातून हटविण्याचा निर्णय सायंकाळी जाहीर केला.

नायडूंच्या निवासस्थानी बैठक

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या निवसस्थानी संध्याकाळी बैठक झाली. त्याला हरिवंश, प्रल्हाद जोशी, मुरलीधरन, पीयूष गोयल हे उपस्थित होते. सभागृहातील गोंधळाबाबत तीत चर्चा झाल्याचे समजते. सभागृहामध्ये गोंधळ घालणाऱ्यांना उद्या समज दिली जाऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will bring Motion of no confidence against the Deputy Speakers Opponents allege bias