
India Nepal : नेपाळबरोबरील संबंध शिखरावर नेणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : भारत आणि नेपाळ देशांमधील ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंधांना एक वारसा असून या संबंधांना हिमालयाच्या शिखरावर नेण्यास भारत कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकलम दहल प्रचंड चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी व प्रचंड यांची आज हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी भारत-नेपाळ संबंध अधिक दृढ करणे व नेपाळ व भारतामध्ये सात द्विपक्षीय करार करण्यात आले.
दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर ऊर्जा क्षेत्रासाठीचा दीर्घकालिन करार झाला. भारत पुढील दहा वर्षांसाठी नेपाळला १० हजार मेगावॉट वीजेचा पुरवठा करणार आहे. तसेच, नेपाळकडून बांगलादेशला ६० मेगावॉट वीज भारताच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
याशिवाय, भारतातर्फे नेपाळमध्ये ९०० मेगावॉट क्षमतेचे तीन जलविद्युत प्रकल्प उभारले जाणार आहेत. ४९० मेगावॉट क्षमतेचा चौथा प्रकल्पही भारत नेपाळमध्ये उभारणार आहे. या संदर्भातही आज करारावर सहमती झाली आहे. याशिवाय व्यापार, पायाभूत सुविधा, शिक्षण, खते, रेल्वेची सुविधा सुरू करण्याबाबतही करार झाले.
सीमावादावर चर्चा
द्विपक्षीय चर्चेदरम्यान नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी नेपाळ-भारत सीमावादाचा मुद्या उपस्थित केला. हा वाद मैत्रीपूर्ण वातावरणातच सोडविण्यास दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. नोव्हेंबर २०१९ मध्ये भारताने प्रसिद्ध केलेल्या नकाशावर नेपाळने आक्षेप घेतला होता.
‘रामायण परिक्रमे’ला वेग आणणार
सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध दृढ करण्यावरही नरेंद्र मोदी आणि प्रचंड यांनी भर दिला. रामायणाशी संबंधित यात्रा ठिकाणे जोडणाऱ्या ‘रामायण परिक्रमा’ मार्ग प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यास दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली आहे. प्रचंड यांच्याबरोबरील चर्चेत मोदी यांनी नेपाळमधील संबंध भविष्यात ‘सुपरहिट’ बनविण्यासाठी ‘हिट’ फॉम्युला सुचविला. ‘हाय-वे, इन्फॉर्मेशन आणि ट्रान्स-वे’ हे सूत्रे डोळ्यांसमोर ठेवून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.