कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द;काँग्रेस म्हणते सरकारचा निर्णय चर्चेविना 

parliment
parliment

नवी दिल्ली - कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन केंद्र सरकारने औपचारिकरीत्या रद्द केले आहे. याबाबत सरकारने विरोधी पक्षांशी कोणत्याही प्रकारे सल्लामसलत केली नसल्याचा हल्लाबोल काँग्रेसने आज केला. दरम्यान हा निर्णय सर्व पक्षांच्या सहमतीनंतर झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. 

काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी शेतकरी आंदोलन, कोरोना संकट या ज्वलंत मुद्द्यांवर चर्चेसाठी अल्प कालावधीसाठी का होईना, परंतु सरकारने हिवाळी अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी लोकसभाध्यक्षांना पत्रही पाठविले होते. या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधीररंजन चौधरी यांना काल पत्र पाठवून संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नसल्याचे कळविले. सरकारने संपर्क साधल्यानंतर विविध पक्षांच्या गटनेत्यांनीही कोरोना संकटामुळे हिवाळी अधिवेशन टाळण्यासाठी सहमती व्यक्त केली होती, असेही या पत्रात प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लवकर अधिवेशनाची तयारी 
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या कार्यालयाकडे विचारणा केली असता सरकारकडून काहीही कळविण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही ट्विटद्वारे स्पष्ट केले, की राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांशी (हिवाळी अधिवेशन रद्द करण्याबाबत) सल्लामसलत झालेली नाही. दरम्यान, लवकरात लवकर अधिवेशन घेण्याची तयारी सरकारने दर्शविली असली तरी यासाठी जानेवारीमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे संकेत सरकारतर्फे देण्यात आले आहेत. मागील वर्षी ३१ जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ झाला होता आणि १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेसची टीका 
संसद अधिवेशन रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने संसदेत जनहिताचे मुद्दे उपस्थित होणार नसतील तर लोकशाहीला अर्थ काय, असा सवाल केला. कोरोना काळात नीट, जेईई, आयएएसच्या परीक्षा होऊ शकतात, शाळा चालतात, विद्यापीठांच्या परीक्षा होतात. बिहार, प. बंगालमध्ये निवडणूक प्रचारही शक्य आहे तर संसदेचे अधिवेशन का नाही, असे खोचक ट्विट काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले. तर, माजी संसदीय कार्यमंत्री व काँग्रेसचे खजिनदार पवनकुमार बन्सल यांनी मोदी सरकारसाठी सत्ता हेच सत्य बनल्याचा टोला लगावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com