esakal | ‘फोर्ड इंडिया’च्या माघारीने कर्मचारी वाऱ्यावर!
sakal

बोलून बातमी शोधा

delhi

‘फोर्ड इंडिया’च्या माघारीने कर्मचारी वाऱ्यावर!

sakal_logo
By
वॉल्टर स्कॉट : सकाळ न्यूज नेटवर्क

चेन्नई : फोर्ड इंडियाचा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला तेव्हा चेन्नईतील कारखान्यातील काही जण सुटीवर होते, तर अनेक जण गणेशोत्सवाच्या तयारी करीत होतो. ही बातमी समजली तो ९ सप्टेंबर हा दिवस त्यांच्यासाठी काळा दिवस ठरला. ‘फोर्ड इंडिया भारतातून माघार घेणार,’ ही त्यादिवशी वृत्तपत्रातील मुख्य बातमी वाचली तरी त्यावर विश्‍वास बसत नव्हता. गुजरातमधील सानंद आणि तमिळनाडूतील चेन्नईजवळील मरायमलाई येथील मोटार निर्मिती कारखाना बंद करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले अन हजारो कर्मचाऱ्यांचा पायाखालील वाळू सरकली. कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यांतील डिलरसाठीही हा मोठा धक्का आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्‍य

तमिळनाडू सरकार कंपनीचे मन वळविण्याचे प्रयत्न करीत आहे, मात्र तोटा सहन करून भारतातील उत्पादन प्रकल्प सुरू ठेवण्यात काहीही अर्थ नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. तमिळनाडूतील प्रकल्पात दोन हजार ६०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. अनेक कर्मचारी हे तिशी व चाळिशीतील आहेत. गेल्या दोन दशकांपासून ते ‘फोर्ड’मध्‍ये काम करीत आहेत. ६० हजारपेक्षा जास्त वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांची झोपच उडाली आहे. ‘फोर्ड’ने हा निर्णय कायम ठेवल्यास त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. कंपनीच्या निर्णयानंतर ते असहाय झाले आहे. आता काही चमत्कार होऊन ‘फोर्ड’ने निर्णय बदलावा, या आशेवर ते आहेत. यापैकी काही जणांना नैराश्याने ग्रासले असून मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची वेळ आली आहे.

निर्णय बदलण्याचा विश्‍वास

चेन्नईतील प्रकल्पातील ‘फोर्ड आयकॉन’, ‘फोर्ड फियेस्टा’, ‘फोर्ड फिगो’, ‘फोर्ड इकोस्पोर्ट’ अशा प्रसिद्ध श्रेणीतील गाड्यांच्या निर्मितीत या कामगारांचा हातभार लागलेला आहे. कंपनीतील एक कर्मचारी सर्वानन (नाव बदलले आहे) हे सध्‍या तिशीत आहेत. दोन मुलांसह वृद्ध पालकांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. कंपनीने निर्णयाची अंमलबजावणी केल्यास त्यांच्या कुटुंबाची घडीच विस्कटणार आहे. अन्य कर्मचाऱ्यांची स्थितीही सर्वानन यांच्याप्रमाणेच आहे. ‘‘नोकरीसाठी दुसऱ्या पर्यायाचा विचार करण्याचे सध्या घाईचे ठरेल होईल. ‘फोर्ड’ त्यांचा निर्णय बदलेल, असा आम्हाला अद्याप विश्‍वास वाटतो. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तमिळनाडू सरकारची मदत मिळेल,’’ असा आशावाद मोहन कुमार (नाव बदलले आहे) या कर्मचाऱ्याने व्यक्त केला.

चर्चा निष्फळ

कंपनीने त्यांचा पवित्रा बदलावा यासाठी कर्मचाऱ्यांनी मनुष्यबळ विभागाशी दोन वेळा चर्चा केली आहे, मात्र ती निष्फळ ठरली. चेन्नई फोर्ड कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनीही बोलणी केली आहे, पण कंपनी उत्पादन प्रकल्प बंद करण्यावर ठाम आहे, असे मोहन कुमार यांनी सांगितले. यातून काही तोडगा काढण्यासाठी कर्मचारी व संघटनेचे नेते राज्य सरकारलाही भेटले. त्यातूनही काही ठोस निष्पन्न झाले नाही. फोर्ड’च्या निर्णयाचा धक्का कर्मचारी, डिलरसह लघू व मध्यम व्यावसायिकांनाही बसला आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर भिस्त

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावरच आता त्यांच्या आशा असून काही तरी जादू घडण्याची अपेक्षाही त्यांना वाटत आहे. यात लक्ष घालून मदत करावी, अशी विनंती कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री स्टॅलिन व उद्योगमंत्री थंगम तेन्नारासू यांची बैठक झाली असली तरी या प्रकरणात सरकारची भूमिका स्पष्ट झालेली नाही.

loading image
go to top