महिलेने विमानात दिला बाळाला जन्म; आता आयुष्यभर मोफत प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

हे विमान दिल्ली ते बेंगलोर असा प्रवास करत होते.

प्रवास करण्यासाठी सर्वांत सुलभ साधन कोणते असेल तर ते विमान आहे. आपल्याला इच्छित असलेल्या ठिकाणी आपण अगदी सहजतेने विनात्रास पोहचू शकता. इतर प्रवासांहून हा प्रवास निश्चितच महाग असतो. महाग असला तरी हा प्रवास सुखकारक मानला जातो. मात्र, या विमान प्रवासात अनेक चित्रविचित्र घटना घडताना दिसून येतात. काही घटना या अभूतपुर्व अशा असतात. अशीच एक अभूतपुर्व घटना इंडीगो एअरलाईन्सच्या विमानात घडली आहे. हे विमान दिल्ली ते बेंगलोर असा प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान एका महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे. 

इंडिगो एअरलाईन्सकडून जाहीर केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की, आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. फ्लाईट संध्याकाळी 7:40 वाजता बेंगलोर एअरपोर्टवर उतरली. आम्हाला हे सांगायला आनंद होतोय की या प्रवासादरम्यान एका प्रवासी महिलेने बाळाला जन्म दिला आहे. दिल्ली ते बेंगलोर दरम्यान प्रवास करणाऱ्या 6E122 या फ्लाईटमध्ये या बाळाचा जन्म झाला आहे. 

या बाळाला आता आजन्म मोफत विमान प्रवास करता येणार आहे. कारण, त्याच्या जन्मानंतर इंडिगोने त्याला आयुष्यभर प्रवासासाठी मोफत विमान तिकीट देण्याची घोषणा केली आहे. विमानात अशाप्रकारे जन्म होण्याची घटना ही अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे या आनंदाप्रित्यर्थ बाळाला आता आयुष्यभर मोफत विमानप्रवास करता येणार आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman gives birth to baby boy in indigo flight