जातीमुळं महिला सरपंचला खाली बसवलं; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल 

टीम ई-सकाळ
Saturday, 10 October 2020

संबंधित महिला सरपंचला कोणत्याही समारंभात मान दिला जात नाही. उपसरपंच त्यांच्या मर्जीप्रमाणे वागतात आणि महिला सरपंचला अपमानास्पद वागणूक देत असल्याचं स्पष्ट झालंय. 

चेन्नई : देशातली जाती व्यवस्था अजूनही इतकी खोलवर रुतलेली आहे, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण पहायला मिळालं आहे. एका महिला सरपंचाला केवळ मागास जातीची आहे म्हणून, ग्रामपंचायतीच्या बैठकीत खाली बसायला लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार समोर आला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित महिला सरपंचला कोणत्याही समारंभात मान दिला जात नाही. उपसरपंच त्यांच्या मर्जीप्रमाणे वागतात आणि महिला सरपंचला अपमानास्पद वागणूक देत असल्याचं स्पष्ट झालंय. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

तमीळनाडूच्या चुद्दलोर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. याप्रकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला वाचा फुटली. फोटोमध्ये दिसणारी माहिला थेरकू थित्ताई गावाची सरपंच आहे. संबंधित महिला ही आदी द्रविड समाजाची असून, या समाजाचा समावेश अनुसूजित जातीमध्ये केला जातो. गेल्या वर्षी सरपंचपद राखीव आल्यानं तिला सरपंच होण्याची संधी मिळाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतील असून, या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनाही हा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कानावर आला आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

माझ्या जातीमुळं उपसरपंच मला ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेऊ देत नाहीत. झेंडा वंदनाचाही मान मला देण्यात येत नाही. ते त्यांच्या वडिलांना हा मान देतात. निवडून आल्यानंतर मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांशी सहकार्याच्या भावनेने काम करत आहे. पण, माझ्याबाबतीत अशी वागणूक दिली जात आहे. आता डोक्यावरून पाणी जात आहे. 
-सरपंच, थेरकू थित्ताई 

आम्ही घटनेची चौकशी सुरू केली आहे. लवकरच आपल्याला नेमकं काय घडलंय, याची माहिती मिळेल. प्राथमिक चौकशीनंतर आम्ही ग्रामसेवकाला निलंबित केले आहे. 
- चंद्र शेखर सखामुरी, जिल्हाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman sarpanch made to sit on floor because of cast