राज्यातील कौटुंबिक हिंसाचार वाढला

Family-violence
Family-violence

नवी दिल्ली - महाराष्ट्रात महिलांच्या साक्षरतेचे, इंटरनेट वापराचे, कुटुंबातील आर्थिक, सामाजिक निर्णय क्षमतेचे प्रमाण वाढले आहे. परंतु कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जाणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय वाढल्याचे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातून आढळून आले आहे. १८ ते ४९ वयोगटातील २५ टक्के महिलांना कौटुंबिक हिंसेला तोंड द्यावे लागते.  यातही शहरी महिलांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे विकारही महिलांमध्ये वाढले असून कुटुंबनियोजनासाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांवरच शस्त्रक्रियेसाठी अधिक दबाव असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा पाचवा अहवाल काल प्रसिद्ध झाला. देशभरात २०१९-२० या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले. कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण असल्याने यात प्रामुख्याने पुरुष आणि महिलांचे आरोग्य, शिक्षण, आर्थिक तसेच निर्णयाची क्षमता या मुद्द्यांचा विचार करण्यात आला आहे. मुंबईच्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलर सायन्स’ या संस्थेने हा अहवाल तयार केला असून महाराष्ट्रात १९ जून २०१९ ते ३० डिसेंबर २०१९ या कालावधीत कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण झाले. यासाठी नमुना पद्धतीने ३१६४३ कुटुंबांमधील ३३७५५ महिलांचे तर ५४९७ पुरुषांची पाहणी करण्यात आली. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वेक्षण झाले होते, उर्वरित भागातील सर्वेक्षण कोरोनाच्या संसर्गामुळे रखडले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अल्पवयीन विवाह घटले
सज्ञान होण्याआधीच म्हणजे वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच विवाह झालेल्या आणि मातृत्व लादले गेलेल्या (२० ते २४ वर्षे वयोगटातील) महिलांचे प्रमाण चिंताजनक आहे. अल्पवयात विवाह झालेल्या महिलांची टक्केवारी २०१६ मध्ये २६.३ टक्के होती. ती २१.९ टक्क्यांवर आली असली तरी ग्रामीण भागात अजूनही अशा विवाहित महिलांचे प्रमाण २७.६ टक्के आहे. तर १५ ते १९ वयोगटातील मातांचे प्रमाणही ५९ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांपर्यंत खाली आले. परंतु ग्रामीण भागात या महिलांची टक्केवारी तब्बल ६३ टक्क्यांपर्यंत आहे. 

तुलनेत २१ वर्षांपेक्षा कमी वय असताना विवाह झालेल्या पुरुषांचे (२५ ते २९ वर्षे वयोगटातील)  प्रमाण ११.४ टक्क्यांवरून १०.५ टक्के असे कमी झाले. मात्र ग्रामीण भागात हे प्रमाण ११.३ टक्के आहे. याचाच अर्थ ग्रामीण भागात अल्पवयात महिला आणि पुरुषांचे विवाह उरकण्याच्या प्रथेबाबत जागरूकता वाढवावी लागणार आहे.   

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुटुंब नियोजनात महिलांनाच शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते आहे. तर नसबंदी शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण अत्यल्प आहे. तब्बल ४९ टक्के महिलांना कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करावी लागते. २०१६ मध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत होते. तुलनेत नसबंदी करणाऱ्या पुरुषांचे प्रमाण अर्ध्या टक्क्याहून कमी आहे. असे असले तरी संततीनियमनाच्या साधनांबाबत महिलांमध्ये जागरूकता वाढल्याचे हा अहवाल सांगतो. 

देशभरात याआधीचे कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०१६ मध्ये झाले होते. त्या तुलनेत यंदाच्या सर्वेक्षणात शालेयपूर्व शिक्षण, अपंगत्व, स्वच्छतागृहांची सोय, मृत्यू नोंदणी, मासिकपाळी दरम्यान स्नानाच्या सवयी, गर्भपाताची कारणे आणि त्यासाठी वापरली जाणारी पद्धत या सारख्या निर्देशकांचा समावेश करण्यात आला. रक्तदाब, रक्तात साखर असणाऱ्या रुग्णांचा वयोगट याचीही पाहणी करण्यात आली. मात्र एचआयव्ही चाचणीचा मुद्दा वगळण्यात आला.   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अन्य ठळक मुद्दे
- महाराष्ट्रात सरकारी वैद्यकीय सेवांतर्गत महिलांच्या प्रसुतीवर होणारा २०१६ मध्ये सरासरी खर्च ३५६८ रुपये आता २९६६ रुपये एवढा कमी झाला आहे. मात्र शहरातील प्रसुतीसाठी ३३९० रुपये मोजावे लागतात. तर ग्रामीण भागातला हा खर्च २६७५ रुपये आहे. 
- बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेही आणि रक्तदाबाचे विकार राज्यातील महिला आणि पुरुषांमध्ये वाढले आहेत. रक्तातील साखर नियंत्रणासाठी औषधांवर अवलंबून राहणाऱ्या १५ वर्षांहून अधिक वयाच्या महिलांचे प्रमाण १२.४ टक्के आहे. यात शहरी महिला १४.६ टक्के तर ग्रामीण महिला १०.७ टक्के आहे. तर अशाच साखरग्रस्त पुरुषांची टक्केवारी १३.६ टक्के आहे. यामध्ये शहरातील १५.३ टक्के तर, ग्रामीण भागातील १२.४ टक्के पुरुष या समस्येने त्रस्त आहेत. 
- उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी २३ टक्के महिला तर २४.४ टक्के पुरुष औषधांवर अवलंबून आहेत. यात शहरी महिलांचे प्रमाण २३.८ टक्के आणि पुरुषांचे प्रमाण २५.७ टक्के आहे. तर ग्रामीण भागातील २२.६ टक्के महिला आणि २३.५ टक्के पुरुष या समस्येसाठी औषधाचा वापर करतात. 
- कौटुंबिक हिंसाचाराला विशेषतः पतीकडून होणाऱ्या छळाला सामोरे जाणाऱ्या १८ ते ४९ वर्ष वयोगटातील महिलांचे प्रमाण २१.३ टक्क्यांवरून २५.२ टक्के असे वाढले आहे. यातही ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण २८.६ टक्के एवढे लक्षणीय आहे. तर या छळाला तोंड देणाऱ्या शहरी महिलांचे प्रमाण २१ टक्के आहे

मुलींच्या शिक्षणाच्या जागरुकतेत वाढ
महाराष्ट्रात १००० पुरुषांमागे महिलांचे प्रमाण २०१६ च्या सर्वेक्षणाच्या तुलनेत ९५२ वरून वाढून ९६६  झाले आहे. कन्या शिक्षणाचे प्रमाण ७७.४ टक्क्यांवरून ७९.६ टक्के असे वाढले आहे. राज्यात साक्षर महिलांचे प्रमाण ८४.६ टक्के तर, साक्षर पुरुषांचे प्रमाण ९३ टक्के आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक शिक्षण घेतलेल्या महिला ४२ टक्क्यांवरून ५०.४ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. इंटरनेट वापरातही महाराष्ट्रातील महिलांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातील २३.७ टक्के तर, शहरी भागातील ५४.३ टक्के महिला इंटरनेट वापरतात. तुलनेत राज्यातील  ६१.५ टक्के पुरुष इंटरनेट वापरणारे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com