धक्कादायक ! जमिनीच्या वादातून महिला तहसीलदाराला कार्यालयातच पेटविले

आर. एच. विद्या
Monday, 4 November 2019

तेलंगणमध्ये आज घडलेल्या भयंकर घटनेत एका महिला तहसीलदाराला कार्यालयातच भरदिवसा जिवंत जाळण्यात आले. रंगा रेड्डी जिल्ह्यातील अब्दुलपूरमेट येथे घडलेल्या या घटनेमागे जमिनीचा वाद असल्याचा पोलिसांचा संशय आहे. विजया रेड्डी (वय ३०) यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला, तर त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघे होरपळून जखमी झाले. हल्लेखोरही होरपळून जखमी झाला आहे.

हैदराबाद - तेलंगणमध्ये आज घडलेल्या भयंकर घटनेत एका महिला तहसीलदाराला कार्यालयातच भरदिवसा जिवंत जाळण्यात आले. रंगा रेड्डी जिल्ह्यातील अब्दुलपूरमेट येथे घडलेल्या या घटनेमागे जमिनीचा वाद असल्याचा पोलिसांचा संशय आहे. विजया रेड्डी (वय ३०) यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला, तर त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघे होरपळून जखमी झाले. हल्लेखोरही होरपळून जखमी झाला आहे.

कुरा सुरेश असे हल्लेखोराचे नाव असून, तो गोवेरेल्लीचा रहिवासी आहे. दुपारी दीडच्या सुमारास त्याने तहसील कार्यालयात येऊन विजया रेड्डी यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. सुरेश हा शेतकरी असल्याचे कळते. बाचेरान या गावात त्याची सात एकर जमीन असून, ती त्याच्या भावाबरोबर वादात आहे. या संदर्भात न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. त्यातून ही घटना घडल्याचा संशय राचेकोंडाचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांनी व्यक्त केला. या घटनेत सुरेशही भाजला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

विजया रेड्डी यांना जाळण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी धावले. तोपर्यंत तहसील कार्यालयातील एक कर्मचारीही पोलिस ठाण्यात आला होता. तोही भाजलेल्या स्थितीत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याने विजया रेड्डी यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवताच रेड्डी यांच्या मोटारीचा चालक आणि एक शिपाई त्यांच्या मदतीला धावले. मात्र, गंभीर स्वरूपात होरपळल्याने विजया रेड्डी जागीच मरण पावल्या. महसूलमंत्री पी. सविता इंद्र रेड्डी यांनी या घटनेचा निषेध केला असून, भविष्यात असे प्रकार घडू नयेत, म्हणून उपाय योजण्याचे आश्‍वासन दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women tahsildar death by burn crime