राहुल हे पाकिस्तानच्या हातचे खेळणे : भाजप

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

जावडेकर, मुख्तार अब्बास नक्वी, गिरीराजसिंह आदी मंत्र्यांनी राहुल यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. गिरीराजसिंह यांनी तर राहुल गांधी हा पाकिस्तानचा अखेरचा आधार आहे, अशी भाषा वापरली.

नवी दिल्ली : कलम 370 रद्द केल्याने पिसाळलेल्या पाकिस्तानकडून रोजच्या रोज युद्दाच्या पोकळ वल्गना सुरू असताना देशातील दोन प्रमुख पक्षांत मात्र आरोप- प्रत्यारोपांचे युद्ध पेटले आहे. राहुल यांच्या पहिल्या ट्विटचा पाकिस्तानने राष्ट्रसंघात आधार घेतला. त्यांनी आज (बुधवार) पुन्हा केलेले ट्विट मनापासून नाही, तर दबावातून केल्याचा आरोप भाजपने केला. पाकिस्तानच्या हातचे खेळणे बनलेले राहुल यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते व  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

भाजपने राहुल यांच्या ताज्या कोलांटउडीवरून त्यांच्यावर चौफेर टीका केली आहे. काँग्रेस नेत्याने आज केलेले डॅमेज कंट्रोल उशिरा केले असून आठवडाभर आधीच राहुल यांना हे शहाणपण सुचले असते, तर पाकिस्तानच्या हाती कोलीत मिळाले नसते, असा भाजपचा दावा आहे. जावडेकर, मुख्तार अब्बास नक्वी, गिरीराजसिंह आदी मंत्र्यांनी राहुल यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. गिरीराजसिंह यांनी तर राहुल गांधी हा पाकिस्तानचा अखेरचा आधार आहे, अशी भाषा वापरली. 

जावडेकर म्हणाले की, राहुल गांधी हे पाकिस्तानच्या हातातलं खेळणं आहेत. त्यांच्या पहिल्या ट्विटनंतर देशातून जी संतप्त प्रतिक्रिया उमटली, त्यानंतर त्यांनी आज पुन्हा ट्विट केले. मात्र तोवर पाकिस्तान त्यांच्या ट्विटचा पुरावा घेऊन युनोमध्ये गेलेला होता. काश्मीरात जी परिस्थिती व वस्तुस्थिती नाही, ती राहुल यांना दिसत आहे. त्यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली पाहिजे.

राष्ट्रीय मुद्यांवर राजकारण करता कामा नये, असे सांगून नक्वी म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नादानीचे नवनवे पुरावे समोर येत आहेत. काश्मीरमध्ये विकासाला गती देण्यासाठी मोदी सरकार अथक प्रयत्न करत असताना राहुल यांनी देशासाठी नुकसानकारक व पाकसाठी फायद्याचे ठरणारे ट्विट करून गोंधळ वाढवायला नको होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The word war broke out between BJP and Congress party