मराठवाड्यासाठी दुष्काळात गोदावरीचे पाणी होणार उपलब्ध; पंपिंग स्टेशन कार्यान्वित

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 August 2019

कालेश्‍वम प्रकल्पातील लक्ष्मीपूर पंपिंग स्टेशन यशस्वीरीत्या कार्यान्वित 

नवी दिल्ली ः राज्याच्या दुष्काळी भागांसाठी वरदान ठरणाऱ्या तेलंगणातील कालेश्‍वरम लिप्ट सिंचन प्रकल्पातील महत्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूर भूमीगत पंपिंग स्टेशन यशस्वीरित्या काम करू लागले आहे. हा प्रकल्प साकारणाऱ्या मेघा इंजीनियरिंग एंड इंफ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडच्या (एमईआईएल) वतीने लक्ष्मीपूर पंपिंग स्टेशन यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आला आहे असे एमईआयएलचे संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितले.

कालेश्‍वमर व लक्ष्मीपूरसह तेलंगणातील चार सिंचन योजनांमुळे महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील किमान 50 हजार एकरच्या शेतीसाठी दुष्काळाच्या काळात गोदावरीचे पाणी उपलब्ध होणार आहे. दोन्ही भागांमध्ये गेली अनेक दशके सुरू असलेला जलविवाद संपविण्याच्या दृष्टीने कालेश्‍वरम व लक्ष्मीपूरसारखा टप्पा मैलाचा दगड मानला जातो. 

एकीकडे पश्‍चिम महाराष्ट्राला सध्या महापुराचा फटका बसला असतानाच मराठवाडा व विदर्भातील काही भागांत अजूनही पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. गोदावरीचे जे अतिरिक्त पाणी समुद्रात वाहून जाते त्याचा मोठा हिस्सा अडवून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी कालेश्‍वरम योजना वरदान ठरणार आहे. पैगांगा योजनेतून महाराष्ट्राला किमान 5 दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी यासंदर्भातील आंतरराज्य संयुक्त सिंचन योजना करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार कालेश्‍वरम अंतर्गत मेलेगड्डा आंतरराज्य कालव्याचे काम युध्दपातळीवर पूर्ण केले जाणार आहे. या कालव्यासाठी उपलब्ध होणाऱ्या गोदावरीच्या पाण्याचा मोठा हिस्सा मेलेगड्डा कालव्यातूनच येणार आहे. 

जगातील सर्वांत मोठा सिंचन प्रकल्प असे वर्णन होणाऱ्या कालेश्‍वरमच्या लक्ष्मीपूर प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळी भागांसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या लक्ष्मीपूर भूमीगत पंपिंग स्टेशनचे काम यशस्वीरीत्या सुरू झाल्यावर एमईआयएल अभियंत्यांनी आनंद साजरा केला. हे पंपिंग स्टेशन जमिनीखाली तब्बल 470 फूटांवर उभारण्यात आले आहे. लक्ष्मीपूर गाव करीमनगर जिल्ह्यात येते. 

लक्ष्मीपूर पंपिंग स्टेशनचे काम विक्रमी दोन वर्षांत पूर्ण करण्यात आल्याची माहिती रेड्डी यांनी दिली. त्यांनी सांगितले की जमिनीखाली 470 फूटांवर यासाठी दोन विशाल भूसुरूंग बनविण्यात आले आहेत. या प्रकल्पातील 139 मेगावॉट क्षमतेची 7 विद्युत जनित्रे व मोटारींद्वारे प्रतीदिन 3 दशलक्ष घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यातून उपसण्याची क्षमता आहे.कालेश्‍वरम प्रकल्पाची संपूर्ण विद्युत संरचना 3057 मेगावॉट क्षमतेची असून त्यात 400 किलोवॉट क्षमतेच्या 6 मोटारी, 2220 केव्ही क्षमतेचे सबस्टेशन व ट्रान्सफॉर्मर व 260 किलोमीटरची ट्रान्समिशन लाईन यांचा समावेश आहे असेही रेड्डी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World's largest water pump house begins operation in Telangana