युतीचा तीस वर्षांचा संसार मोडला

Shivsena-Bjp-Break
Shivsena-Bjp-Break

नवी दिल्ली - महाराष्ट्रात शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचे निश्‍चित करताच सेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारमधील मंत्रिपदाचा आज राजीनामा दिला. ‘शिवसेना केंद्रातूनही बाहेर पडल्यावर युती राहिली कोठे?’ असा प्रतिप्रश्‍न त्यांनी पत्रकारांना केला.

सावंत दुपारी दीडच्या सुमारास महाराष्ट्र सदनात आले व त्यांनी आपले राजीनामापत्र पत्रकारांना दाखविले. त्यापूर्वी सकाळी केलेल्या ट्‌विटमध्ये सावंत यांनी भाजपवर खोटारडेपणाचा आरोप करताना तीव्र शब्दांची मांडणी केली होती. त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीआधी जागावाटप व सत्तावाटपाचा (युतीमध्ये) एक फॉर्म्युला ठरला होता. तोच नाकारून शिवसेनेला खोटे ठरविण्याचा धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावण्याचा प्रकार घडला आहे. खोटेपणाचा कळस करीत महाराष्ट्रात भाजपने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे.

सावंत यांनी पत्रकारांना सांगितले की, भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्‍वासन पाळले नाही. असा स्थितीत मी केंद्रात राहणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरले नसते. त्यामुळे मी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना-भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुका युतीमध्ये लढविल्या. मी गेले सहा महिने केंद्रातील मंत्रिपद सांभाळले. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपच्या अध्यक्षांनी दिलेला शब्द पाळला नाही.

मुख्यमंत्रिपदासह विधानसभेच्या जागा व नंतर राज्यातील मंत्रिमंडळ यात ५०-५० टक्के समान वाटप, याबाबत शिवसेनेला दिलेला शब्द भाजपने फिरविला. युतीच्या इतिहासात असा खोटेपणा कधी झाला नव्हता. अशा वातावरणात शिवसेनेच्या केंद्रातील सत्तेला चिकटून राहण्यालाही काही अर्थ उरला नव्हता. त्यानुसार मी राजीनामा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com