
सध्या जगाच्या अनेक भागांत राजकीयच नव्हे तर आर्थिक क्षितिजावरही निराशेचे मळभ दाटून आले आहे. खुद्द अमेरिकी महासत्तेचा आर्थिक विकासदर दीड टक्क्यांपर्यंत खाली येण्याची चिन्हे आहेत. त्या देशाने चीनबरोबर सुरू केलल्या व्यापारयुद्धामुळे जागतिक व्यापाराची घडी विस्कटणार असे दिसते. रशिया-युक्रेन युद्धाचा ज्वर ओसरेल, ही आशा पुन्हापुन्हा फोल ठरत आहे. पश्चिम आशियातही हीच स्थिती. अशी सर्वदूर अनिश्चिततेची परिस्थिती असतानादेखील रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात अर्ध्या टक्क्याची कपात करण्याचा निर्णय घेतला.