10th & 12th Board Preparation: विद्यार्थ्यांनो, प्रश्नांची मोठी उत्तरं लक्षात राहत नाहीये? मग या पद्धतींचा करा वापर 

अथर्व महांकाळ 
Thursday, 4 March 2021

आता चिंता करू नका. कुठलीही पोपटपंची न करता मोठी उत्तरं लक्षात ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही पद्धती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.   

नागपूर :  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात कुठली अडचण येत असेल ती म्हणजे मोठी उत्तरं लक्षात ठेवणं. दहावीचे इतिहास, भूगोल, विज्ञान हे विषय असो की बारावीच्या कलाशाखेचे विषय प्रश्नांची उत्तरं मोठी असतात. यामुळे विद्यार्थ्यांना ही उत्तरं लक्षात राहत नाहीत. अनेकदा वाचूनसुद्धा त्यांना ही उत्तरं स्मरणात ठेवण्यास विद्यार्थ्यांना अडचणी येतात. याचं प्रमुख कारण म्हणजे पोपटपंची. मात्र आता चिंता करू नका. कुठलीही पोपटपंची न करता मोठी उत्तरं लक्षात ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही पद्धती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.   

हेही वाचा - 10th & 12th Board Preparation: विद्यार्थ्यांनो,...

पेन आणि कागद घेऊन अभ्यास करा 

नुसती पोपटपंची करून उत्तरं पाठ होत नाहीत. मोठी उत्तरं पाठ करण्यासाठी पेन आणि कागद घेऊन अभ्यास करणं महत्वाचं आहे. मोठी वाटणारी उत्तरं वाचून एका कागदावर लिहून बघितली तर ती लवकरात लवकर स्मरणात राहू शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वाचलेली उत्तरं दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी ती लिहून बघावीत. आपण स्वतःच्या हातानं लिहिलेली कुठलीही गोष्ट दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहते. 

उदाहरणांसह अभ्यास करा 

पेन आणि कागद या गोष्टींसोबतच अभ्यास करताना मोठी उत्तरं पाठ करण्यासाठी नेहमी त्या उत्तराची तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या दैनंदिन घटनांशी तुलना करा. याची दोन कारणं आहेत. उत्तर पाठ करताना काही उदाहरणं लक्षात ठेवली तर ते उत्तर तुम्ही कधीच विसरत नाही. आणि दुसरं म्हणजे उत्तराचा संदर्भ तुम्हाला मिळण्यास मदत होईल.  

मेमोनॉमिक्सचा वापर करा 

यासाठी मेमोनॉमिक्स म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. मेमोनॉमिक्स म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची एक विशेष पद्धत. यात तुम्ही कुठलंही उत्तर वाक्यरचनेत, फोटोमध्ये किंवा कुठल्या गाण्याच्या माध्यमातून लक्षात ठेऊ शकता. त्यामुळे मोठी 
उत्तरं लक्षात ठेवण्यासाठी या मेमोनॉमिक्सचा वापर करता येऊ शकतो. 

हेही वाचा - 10th & 12th Board Preparation: विद्यार्थ्यांनो 'या' पद्धतीनं अभ्यास कराल तर उत्तरं...

दररोज करा योग आणि मेडिटेशन 

जर तुम्हाला मोठी उत्तरं दीर्घकाळ स्मरणात ठेवायची असतील तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आरोग्य. तुमचं आरोग्य तुमची प्रकृती  उत्तम असेल तर तुमचा मेंदूही सक्षम असतो. त्यामुळे तुम्हाला मोठी उत्तरं पाठ करण्यास अडचण होत नाही. यासाठी दररोज योग करणं, मेडिटेशन करणं आणि व्यायाम करणं महत्वाचं आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10th & 12th Board Preparation know how to memorized big answers