
नव्या क्षेत्रात करिअर सुरु करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स
नवी दिल्ली- कोरोना महामारीने अनेकांचे जीवन बदलले आहे. अनेकांना आपले जॉब्स गमवावे लागले, तर अनेकांनी आपले जॉब्स बदलले आहेत. कोरोना महामारीमुळे अजूनही ट्रॅव्हल, सेवा क्षेत्रे पूर्णपणे सुरु झालेले नाहीत. तुम्हीही नव्या वर्षात नवी सुरुवात करु पाहात आहात, तर काही गोष्टी तुमच्या डोक्यात क्लिअर असायला हव्यात. करिअर क्षेत्रातील तज्ज्ञ Ariel Lopez आणि Latesha Byrd यांनी CNBC शी बोलताना नव्या क्षेत्रात करिअर सुरु करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
1. तुम्हाला काय हवंय याबाबत स्पष्टता हवी
कुठेही तुमचा सीव्ही (resume) पाठवण्यासाठी तुम्हला नेमकं काय हवंय याची स्पष्टता तुमच्याकडे असूद्या. कंपनीकडे सीव्ही पाठवण्याआधी आधी तुम्हाला काय हवंय आणि काय नाही याची खात्री करा. तुम्हाला कोणत्या गोष्टी टाळायच्यात किंवा पुन्हा त्या करायच्या नाहीत हे लक्षात असू द्या.
2. सोशल मीडिया बायो आणि सीव्ही
तुम्ही ज्या कंपनीत किंवा जॉब्ससाठी अप्लाय करणार आहात, त्यासाठी लागणारे कौशल्य तुमच्या सीव्हीमध्ये येऊ द्या. तुमचा सोशल मीडिया बायो आणि सीव्ही कसा आहे, यावरुन खूप काही अवलंबून आहे. तुम्ही एखादं काम करण्यासाठी सक्षम आहात, हे यातून दिसून येऊ द्या.
3. स्वत:शी प्रामाणिक संभाषण
नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याआधी योग्य रिसर्च करा. स्वत:शी प्रामाणिक संभाषण करा. एखादी कला आत्मसात करण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग किंवा अधिकच्या शिक्षणाची गरज आहे का, पडताळून पाहा. यासाठी तुमचा वेळ, शक्ती आणि पैसे खर्च करण्याची तयारी आहे का?
4. इफेक्टिव कम्युनिकेशन
नव्या क्षेत्रात पाय ठेवताना हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुम्ही आधीचे क्षेत्र का सोडत आहात. त्यावेळी तुम्हाला इफेक्टिव कम्युनिकेशनद्वारे ते पटवून देता यायला हवं. तसेच तुमचा जूना अनुभव नव्या कामासाठी कसा फायदेशीर ठरु शकतो, हे तुम्हाला सांगता येऊ शकतो. यामध्ये कम्युनिकेशन खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
5. नेटवर्क
कोणत्याही क्षेत्रात उतरल्यानंतर तुमचं स्ट्राँग नेटवर्क असलं पाहिजे. स्ट्राँग नेटवर्क तुम्हाला अनेक ठिकाणी फायद्याचं ठरु शकतं. ऑनलाईन नेटवर्किंगही आता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यात LinkedIn तुमच्या कामाला येऊ शकतं. दुसऱ्यांशी बोलायला कधीही घाबरु नका. ज्यांनी इतर क्षेत्रात मुशाफिरी केली आहे, अशा लोकांसोबत बोलल्याने तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो.