School Assessment : मूल्यांकनात पुणे जिल्ह्यातील ७६ टक्के शाळा नापास

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने केलेल्या मूल्यांकनात तब्बल ७६.७२ टक्के शाळा ‘नापास’ झाल्या आहेत.
School
School sakal

पुणे - एरवी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता तपासून त्याची गुणवत्ता ठरविणाऱ्या शाळा मात्र त्यांच्या स्वतःच्या मूल्यांकन आणि गुणांकनात नापास झाल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने केलेल्या मूल्यांकनात तब्बल ७६.७२ टक्के शाळा ‘नापास’ झाल्या आहेत. केवळ २३.२७ टक्के शाळा उत्तीर्ण झाल्या आहेत.

शाळांचे मूल्यांकन करून त्याचे गुण टक्केवारीत दिले आहेत. यात केवळ सहा शाळांना ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यानुसार शाळांची स्तरनिश्चिती झाली असली, तरीही शाळांची एकूणच गुणवत्ता ढासळल्याचे वास्तव समोर आले आहे.

पुणे जिल्ह्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारे शाळांचे मूल्यांकन आणि स्तरनिश्चिती (२०२२-२३) करण्यात आली आहे. नुकताच या संदर्भातील अहवाल जाहीर झाला आहे. या अहवालावर जिल्हा परिषदेने हरकती, सूचना नोंदविण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर अंतिम अहवाल जाहीर करण्यात येणार आहे.

यात जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ७९९ शाळांचे मूल्यांकन केले आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या आधारे निकोप स्पर्धा होऊन शाळांचे मूल्यांकन आणि त्याच गुणवत्तेच्या आधारे शाळांची स्तरनिश्चित करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने राबविला.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिलेल्या निकषांनुसार शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी तालुका आणि क्लस्टरनिहाय समिती स्थापन केल्या होत्या. या समित्यांद्वारे शाळांनी केलेल्या स्वयंमूल्यमापनाची पडताळणी आणि गुणांकन करण्यात आले. या मूल्यांकनात शहरातील नामांकित अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांचा स्तर खालावल्याचे दिसून येत आहे.

‘नापास’ शाळा

  • एकूण संख्या : ६१३

  • १४ - १ ते ५.९९ टक्के गुण मिळालेल्या शाळा

  • ३४ - ६ ते १०.९९ टक्के गुण मिळालेल्या शाळा

हे होते मूल्यांकनाचे निकष

  • पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल

  • दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल

  • नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल

  • एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा

  • इन्स्पायर ॲवॉर्ड सहभाग आणि निवड

  • चित्रकला स्पर्धा (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट)

  • राज्य व राष्ट्रीय कला, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा सहभाग

शाळांचे योग्यप्रकारे मूल्यांकन होऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारे शाळांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. या मूल्यांकनाच्या आधारे शाळांची स्तरनिश्चितीचा अहवाल तयार केला आहे. या अहवालावर हरकती आणि सूचना मागविण्यात येणार असून, त्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात येईल. त्यानंतर अंतिम अहवाल जाहीर करण्यात येणार आहे. शाळांची स्तरनिश्चिती करण्यासाठी मूल्यांकनाची काठिण्य पातळी वाढविली होती. त्यामुळे मूल्यांकनात उत्तीर्ण होणाऱ्या शाळांची संख्या कमी दिसत आहे. परंतु, त्यावरून शाळांची गुणवत्ता ढासळली आहे, हे म्हणणे योग्य नाही.

- सुनंदा वाखारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), पुणे जिल्हा परिषद

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारे दरवर्षी शाळांचे मूल्यांकन आणि स्तरनिश्चिती झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी लाभ होईल. मूल्यांकन आणि स्तरनिश्चितीमुळे शाळांमध्ये निकोप स्पर्धा वाढेल आणि विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात यश येईल.

- संजय सोमवंशी, मुख्याध्यापक, सुंदरबाई मराठे विद्यालय, खराडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com