Balak Palak : ऐका, पिठलंभाताची कहाणी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pithalbhat
बालक-पालक : ऐका, पिठलंभाताची कहाणी!

बालक-पालक : ऐका, पिठलंभाताची कहाणी!

‘आमची अक्का अस्सा पिठलंभात करायची ना...! नुसती बोटं चाटत राहावीत!’’ गावच्या मधूमामाकडून हे वर्णन मुलांनी कितीतरी वेळा ऐकलं होतं.

मुळात ‘अक्का’ या नावाचीच मुलांना खूप गंमत वाटायची. अक्का म्हणजे आजी, हे त्यांना उशिरानं समजलं. मधूमामालाही आई कधीतरी लाडानं नानू म्हणते आणि तो तिला तायडे म्हणतो, हेही मुलांना फार मस्त वाटायचं. एकूणच या भावाबहिणींचं एकमेकांवर भरपूर प्रेम होतं. त्यांच्या प्रेमाची उदाहरणंही दिली जायची.

‘आम्ही तुमच्यासारखे भांडत नव्हतो. कायम एकमेकांना सांभाळून घ्यायचो. एकत्र खेळायचो, बाहेर कुठे गेलो, तर शांत बसायचो, दंगा करून घर डोक्यावर घेत नव्हतो,’’ वगैरे वगैरे.

मग एखादं दिवशी आजी म्हणजे ‘अक्का’ घरी आली, की मुलं त्यांना विचारून घ्यायची. ‘‘आजी, खरंच आई आणि मामा काही दंगा करायचे नाहीत?’’ आजी मग त्या दोघांनी केलेल्या खोड्यांच्या आठवणी सांगायची आणि आई, मामा दोघांचीही बोलती बंद व्हायची.

‘तुमच्या आईच्या हातालासुद्धा अक्काच्या हातासारखीच चव आहे, बरं का!’’ असंही मामा नेहमी आठवणीनं सांगायचा. ‘‘तिनं पिठलंभात केला, की दुसरं काहीही नसलं तरी चालतं. नुसते पिठल्याचे भुरके मारावेत!’’ याची तो नेहमी आठवण करून द्यायचा आणि मुलांना विचारायचा, तुम्हाला आवडतो की नाही पिठलंभात? पिठलंभात आवडत असला, तरी रोज काही बोटं चाटून खाण्याएवढा त्यांना आवडत नव्हता. कधीतरी ठीक आहे, पण मामा खरंच एवढा आवडीनं खातो, याचंच त्यांना कौतुक वाटायचं.

‘अरे, तुझ्या आईनं वाढला ना, तर रोज फक्त पिठलंभात खाईन मी!’’ हे मामानं ऐकवलं, तेव्हा मात्र मुलांना खरंच गंमत वाटायला लागली. त्यांनी आईलाही त्याबद्दल तीनतीनदा विचारलं. आईनंही त्यासाठी होकार दिला आणि मुलांचा मामाबद्दलचा आदर आणखी वाढला.

मामा घरी कधी फारसा राहायला यायचा नाही. पण एकदा काहीतरी निमित्तानं त्याला शहरात काम होतं, त्यामुळे तो चार दिवस मुक्कामालाच येणार होता. मामानं ही बातमी कळवली, तेव्हा मुलांना आनंद तर वाटलाच, पण त्याच्या निमित्ताने आपल्यासाठीही आई रोजच पिठलंभात करणार की काय, अशी शंकाही मनात येऊन गेली.

मामाच्या स्वागताची मुलांनी जय्यत तयारी केली होती. त्याच्यासाठी आपल्या खोलीतला पसारा आवरला, त्याच्यासाठी साफसफाई केली, त्याच्या आवडीच्या वस्तू खोलीत दिसतील, अशी व्यवस्था केली.

‘आई, तू खरंच मामासाठी रोज पिठलंभात करणारेस? आणि आम्हीही रोज तेच खायचंय?’’ धाकटीनं हळूच एकदा आईला विचारलं.

‘नाही रे, रोज तोही खाणार नाही. आता तो येऊ दे, मग बघाच तुम्ही गंमत. मामाच्या सगळ्याच गोष्टी जास्त मनावर घ्यायच्या नसतात!’’ आईनं त्यांच्यातलं एक सिक्रेट सांगून टाकलं.

रात्री तो जेवायला घरी आला, तेव्हा पिठलंभाताच्या घमघमाटानं प्रसन्न झाला. मामाबरोबरच मुलांनीही मुकाट्यानं पिठलंभात खाल्ला.

‘वा, छान झालाय बरं का पिठलंभात, तायडे!’’ मामानं आईचं कौतुक केलं.

‘हो, उद्याही करू ना?’’ आईनं मुद्दामच मुलांकडे बघत विचारलं.

‘नाही गं, नको. म्हणजे, तू पिठलंभात छानच करतेस. पण रोजरोज कशाला ना? मुलांनाही काही वेगळं खायचं असेल, तर...!’’ मामा म्हणाला.

‘असं म्हणतोस? बरं, मग मुलांसाठी म्हणून उद्या पावभाजी करते. तुला चालेल ना थोडीशी?’’ आईनं मुलांकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहत विचारलं आणि मुलांबरोबर ती खो-खो हसू लागली.

loading image
go to top