बालक-पालक : ‘काटा’ रुते कुणाला?

दिवाळी संपली आणि अख्ख्या घराला आलेली चैतन्याची झळाळी ओसरल्यासारखी झाली.
बालक-पालक : ‘काटा’ रुते कुणाला?

दिवाळी संपली आणि अख्ख्या घराला आलेली चैतन्याची झळाळी ओसरल्यासारखी झाली. दिवाळीत सगळ्यात आधी कोण उठतं, कोण पहिला फटाका लावतं, पहिली अंघोळ कुणाची, सगळ्यात आधी आवरून कोण तयार होतं, अशा वेगवेगळ्या बाबतीत घरात स्पर्धा लागत होती. दिवाळी संपली आणि हा सगळा उत्साह मावळला. आता लवकर उठायची स्पर्धा नव्हती, की सगळ्यात आधी आवरून तयार होण्याची. उत्साह दिवाळीपुरता होता आणि आता घरावर पुन्हा आळसाचं साम्राज्य पसरलं आहे, हे आईच्या लवकरच लक्षात आलं.

घराला पुन्हा चैतन्य मिळवून देण्याची गरज होती. त्यासाठी काय करावं, असा विचार आईच्या मनात डोकावत होता.

‘आई, बेसनाचे लाडू संपले का?’’ धाकटीनं एके सकाळी झोपेतून उठल्या उठल्या विचारलं.

‘हो बाळा, आता दिवाळी झाली ना! तुम्ही तर दिवाळीत रोज लाडू खात होतात! कधी ना कधी संपणारच ना ते?’ आई लेकीला प्रेमाने जवळ घेत म्हणाली.

‘अगं, पण तू भरपूर लाडू करणार होतीस ना?’’ एवढ्यात दादाही उठून आईपाशी तक्रार करायला आला होता.

‘हो, भरपूरच केले होते. पण तुम्ही रोज खाऊन ते संपवलेत! आठवतंय ना, की विसरलात?’’ आईनं आठवण करून दिली.

‘अगं असू दे, खाऊ देत. असं खाणं मोजू नये कुणाचं!’’ बाबांनी

मध्यस्थी केली.

‘सगळ्यात जास्त लाडू तर बाबांनीच खाल्ले. आम्हाला फार मिळालेच नाहीत!’’ धाकटीनं पुन्हा एक पुस्ती जोडली, तशी बाबा गडबडले.

‘असं काही नाहीये हं. तुम्ही येता जाता खात होतात लाडू. मी कधीतरी आठवण आल्यावरच खायचो.’’ बाबांनी लगेच येऊन खुलासा केला.

‘आणि अशी कधीतरी आठवण बाबांना दिवसातून दोन-तीनदा तरी व्हायची. कधी सकाळचा नाश्ता जरा तिखट लागला म्हणून, कधी दुपारी जेवणानंतर थोडं गोड खाल्लं तरी चालतं, म्हणून, कधी संध्याकाळी अगदीच पोटात खड्डा पडला म्हणून, तर कधी रात्रीचं जेवण मिळमिळीत वाटतंय, म्हणून! काय, बरोबर ना?’’ आईनं आठवण करून दिली. बाबांना यावर काही उत्तर देता आलं नाही.

‘असं खाणं मोजू नये कुणाचं!’’ दादानं लगेच बाबांचं वाक्य उचलून त्यांची बाजू घेतली.

‘मी मोजतच नाहीये. ते जाऊ दे, मी तुमच्यासाठी आणलेली दोन सरप्राईज दाखवणार आहे!’’ आई म्हणाली, तसं सगळ्यांनी चमकून बघितलं.

‘मावशी आणि तुमची मामी, दोघांनीही त्यांच्याकडचा फराळ कालच पाठवून दिलाय. लाडू, करंजी, चकली, सगळं आहे!’’

‘येsss!’’ मुलांनी एकच कल्ला केला. बाबांनाही टाळ्या दिल्या.

‘आणि आपल्याही घरातला थोडा फराळ शिल्लक आहेच!’’ हेही आईनं सांगितलं.

‘आणि दुसरं सरप्राईज?’’ धाकटीनं विचारलं.

‘ते सगळ्यांसाठीच आहे. विशेषतः बाबांसाठी!’’ आई बाबांकडे बघून उत्साहानं म्हणाली.

‘माझ्यासाठी? अरे वा, काय आहे?’’ बाबांनी कुतूहलानं विचारलं. यंदाच्या पाडव्याचा गोडवा फारच वाढलाय की काय, असं त्यांना वाटलं.

आई कपाटापाशी गेली आणि तिनं गिफ्ट रॅप केलेला एक छोटा खोका बाहेर काढला. बाबांकडे दिला. बाबांनी तो उत्सुकतेनं उघडला. मुलंही डोळे विस्फारून बघत होती. झाकण निघाल्यावर आतली वस्तू बाहेर काढताना मात्र बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बऱ्यापैकी मावळला होता.

‘वजनकाटा आणलाय! दिवाळीत कुणी किती आणि काय खाल्लं, ह्याच्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी आता त्याची!’’ आईनं सांगितलं आणि ती कामासाठी आत वळली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com