esakal | बालक-पालक : भाजीत भाजी मेथीची
sakal

बोलून बातमी शोधा

Methi

बालक-पालक : भाजीत भाजी मेथीची

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

‘येताना भाजी घेऊन या हं!’ ऑफिसला निघालेल्या बाबांना आईनं निरोप दिला.

‘बाबा, दुधीभोपळा किंवा कारलं आणू नका हं.’ मोठी कुरकुरली.

‘आणि शेपू किंवा पडवळपण नको.’ धाकटी गुरगुरली.

‘आणि भेंडी पण नको. ई....बुळबुळीत!’

‘आणि तोंडली पण नको. ई...सुळसुळीत!’

दोघी नुसत्या सूचनाच करत सुटल्या. आईनं त्यांना गप्प केलं आणि बाबांना ‘मिळाली तर आणा, आग्रह नाही,’ असं सांगितलं. बाबा होकार देऊन निघून गेले.

थोड्या वेळानं आईसुद्धा तिचं आवरून ऑफिसला जायला निघाली.

‘आई, अगं त्या तनिषच्या आईनं तुला बोलावलंय बरं का संध्याकाळी. कालसुद्धा निरोप दिला होता त्यांनी. मी सांगायचं काम केलंय. बघ आता तू!’ मोठीनं तिची जबाबदारी पूर्ण केली.

‘हो, ऑफिसमधून येताना जाऊन येते.’ आईनं सांगितलं आणि ती बाहेर पडली.

सुटी असल्यामुळं दिवसभर मुलींची मजामस्ती झाली. संध्याकाळ व्हायला आली होती. आजी देवळात भजनाला गेली होती. तिकडून ती परत आली, ती हातात मेथीची जुडी घेऊनच.

‘आजी, तू भाजी कुठून घेऊन आलीस?’’ तिच्या हातातली मेथी बघूनच मोठीच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या.

‘अगं, त्या विमलआजी आहेत ना, त्यांनी येताना दोन जुड्या घेतल्या. म्हणाल्या, तुला एक घेऊन जा. म्हणून घेऊन आले!’

‘मेथीची भाजी बोअर असते गं. पराठे केले, तरी वास येत राहतो घरभर त्या मेथीचा.’ मोठीचं कुरकुरणं काही कमी होत नव्हतं.

‘काही नाही, उलट पौष्टिक असते. खात जा सगळ्या भाज्या.’ आजीनं दटावलं. ‘आता फक्त तुमचे बाबा नेमकी मेथीच घेऊन येऊ नयेत, म्हणजे झालं,’ ती काळजीनं म्हणाली.

‘आई, अगं मेथीच आणलेय मी. तू कसं काय ओळखलंस?’ तेवढ्यात दारातून आत आलेले बाबा म्हणाले आणि आजीनं कपाळाला हात लावला.

‘अरे देवा, आता दोन दोन जुड्या झाल्या की मेथीच्या!’

‘असू देत, एक दिवस भाजी, एक दिवस पराठे!’ बाबा म्हणाले आणि आवरायला आत गेले.

आजीला लक्षात आलं, घरात दूध नाहीये. अभ्यासाला बसलेल्या धाकटीकडं जाऊन ती म्हणाली, ‘चिंगे, तू खाली खेळायला जाशील, तेव्हा दूध घेऊन ये अर्धा लिटर. बाबांकडून पैसे घे.’

धाकटीनं होकार दिला आणि थोड्या वेळात अभ्यास गुंडाळून तीसुद्धा खेळायला पळाली. जाताना तिनं पिशवी आणि पैसे घेऊन ठेवले होते.

आईला यायला आज उशीरच झाला होता. बहुधा तनिषच्या आईकडं गप्पा रंगलेल्या दिसतायंत, असंच सगळ्यांना वाटलं. चिंगी पिशवी नाचवत परत आली.

‘हे घे आजी.’ तिनं दुधाची पिशवी काढून ठेवली.

‘आणि हे बघ, पाच रुपये सुट्टे नव्हते, म्हणून त्या मावशींनी ही मेथीची छोटी जुडी दिलेय.’ चिंगीनं हे वाक्य उच्चारलं मात्र, आजी आणि बाबांनी एकाचवेळी एकमेकांकडं बघितलं.

‘मेथी सप्ताहच करावा लागेल आता!’ आजी म्हणाली.

एवढ्यात आईसुद्धा घरी आली.

‘बघा, घरात नेमकी मेथीची चर्चा चाललेय. काय योगायोग आहे!’ ती म्हणाली आणि बाबांनी संशयानं बघितलं.

‘म्हणजे?’ बाबांनी बिचकत विचारलं.

‘काही नाही, दारावर भाजीवाला आला होता, मस्त ताज्या मेथीच्या जुड्या होत्या, म्हणून घेऊन आले दोन!’ आईनं सांगितलं आणि घरातल्या सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले.