बालक-पालक : परि तू जागा चुकलासी

‘यापुढे घरातल्या वस्तू जागच्या जागीच असायला हव्यात. इकडे तिकडे दिसता कामा नयेत,’ असं फर्मान आईनं काढल्यामुळं घरात गडबड उडाली होती.
Balak Palak
Balak PalakSakal

‘यापुढे घरातल्या वस्तू जागच्या जागीच असायला हव्यात. इकडे तिकडे दिसता कामा नयेत,’ असं फर्मान आईनं काढल्यामुळं घरात गडबड उडाली होती.

‘आई, पुस्तकं अशी टेबलावर मांडून ठेवल्यावरच नीट सापडतात!’’ धाकट्यानं कुरकूर केली.

‘तू माझं कपाट आवरू नकोस. मग मला वेळेवर कपडेही सापडत नाहीत,’’ थोरलीनंही बंडाचं निशाण रोवलं.

‘सगळ्या वस्तू जागच्या जागी नसल्या, तर मी त्या आवरायला लावणार. याच्यावर काही चर्चा नकोय.’’ आईनं फायनल आदेशच दिल्यामुळं घरात शांतता पसरली. मुलांनी धुसफुसत आपापल्या वस्तू आवरल्या.

रात्री बाबा आल्यावर त्यांना मध्ये घालून तहाची बोलणी करावीत, असा मुलांचा विचार होता. मात्र, मुलं बाबांशी बोलायला बेडरूममध्ये आली, तेव्हा स्वतः बाबाच कपाट नीट आवरताना दिसले आणि मुलं काय ते समजून चुकली.

पुढचा आठवडाभर हा ‘शिस्त सप्ताह’ सुरू होता. अगदी ब्रश झाल्यावर पेस्ट जागच्या जागी ठेवणं, वह्यापुस्तकं लगेच दप्तरात भरणं, मळलेले कपडे धुवायला टाकणं, वाळलेले कपडे घड्या करून लगेच कपाटात नीट मांडून ठेवणं वगैरे वगैरे.

‘बाबा, आपल्याला वस्तू जागच्या जागी ठेवायला एवढे कष्ट करावे लागतात. आईच्या सगळ्या वस्तू जागेवर असतात का? तिच्याकडून कधी कुठली चूक होत नाही?’’ शिस्त पाळताना थकून गेलेल्या थोरलीनं बाबांना विचारलं.

‘आईकडून कधी एखादी वस्तू चुकीच्या जागी ठेवलेली मी तरी बघितलेली नाही!’’ बाबांनी उत्तर दिलं आणि मुलांना बोलण्यासारखं काही राहिलंच नाही.

एके दिवशी आई एक प्रदर्शन बघायला गेली होती आणि येताना तिला उशीर होणार होता.

‘मला उशीर होतोय, रात्री फक्त मुगाच्या डाळीची खिचडी करायची आहे.’’ तिनं मेसेज करून निरोप दिला. खिचडी करायची म्हणजे दहा मिनिटांचं काम, हे बाबांना माहीत होतं. पण तांदूळ आणि मूगडाळ शोधायला ते गेले आणि डबेच सापडेनात! दोन डब्यांवर तशी पुसटशी नावं होती, पण त्यात गूळ आणि ज्वारी हाती लागली. शेंगदाण्याच्या डब्यात चुरमुरे आणि साखरेच्या डब्यात साबूदाणा सापडला. आईचा फोन ‘नॉट रीचेबल’ होता. शेवटी खिचडी काही झालीच नाही. आई अपेक्षेपेक्षा लवकर आली आणि खिचडी तयार नाही, हे तिला आल्या आल्या कळलं.

‘आम्हाला वस्तू जागच्या जागी ठेवण्यासाठी एवढं पळवलंस आणि तूच वस्तू कुठे ठेवल्यायंस?’’ थोरली बाबांच्या वतीनं म्हणाली.

आज आईला आपण बरोबर पकडलं, याचाच तिघांना आनंद झाला होता. यापुढं आपल्यालाही शिस्तीतून सवलत मिळेल, अशी आशाही वाटत होती.

‘हे काय, इथेच तर आहे!’’ असं म्हणून आईनं वरच्या कपाटातले दोन डबे लगेच काढून दाखवले.

‘काल सगळे डबे घासले म्हणून काही जिन्नस ह्या कपाटात ठेवले होते मी. तुम्हाला ते माहीत नाहीत, ही तुमची चूक. घरात लक्ष द्यावं जरा. कधीतरी स्वतः आईला मदत करावी, मग कुठे काय ठेवलंय हे लक्षात येईल!’’ आईनं तिघांनाही ऐकवलं.

आपण नक्की कुठल्या मुद्द्यावरून आईला प्रश्न विचारत होतो, या विचारात तिघं गुंतून गेले, तोपर्यंत आईनं डाळ तांदूळ भिजवून कुकर गॅसवर चढवला होता!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com