esakal | बालक-पालक : अदलाबदली
sakal

बोलून बातमी शोधा

Balak Palak

बालक-पालक : अदलाबदली

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

‘येत्या रविवारी घरातली सगळी रचना आपण बदलायची आहे!’ आईनं जाहीर केलं. ‘तुम्ही सगळ्यांनी मला मदत करायची आहे,’ असंही सांगितलं.

‘रविवारी ना? वेळ आहे अजून!’ असं म्हणून दोन्ही मुलांनी चक्क दुर्लक्ष केलं.

रात्री बाबा घरी आल्यावर दोघांनी त्यांचा ताबा घेतला आणि खुसपुसून आईचा संकल्प सांगितला.

‘बाबा, बरंच काही बदलायचा विचार आहे आईचा!’ धाकटी म्हणाली आणि बाबांनाही नीट लक्ष घातलं. काय बदल अपेक्षित असतील, यावर मग या त्रिकुटाचा खल झाला.

‘आईला ह्या शोकेसमधल्या वस्तू त्या शोकेसमध्ये ठेवायच्या असतील.’ धाकटी म्हणाली.

‘वेडी आहेस. आईला खुर्च्यांची रचना बदलायची असणार.’ दादा म्हणाला.

‘बहुतेक आईला सगळ्या फर्निचरचीच रचना बदलायची असणार!’ बाबांनी त्यांचं अभ्यासू मत प्रकट केलं.

‘म्हणजे सोफा आणि सेटीची आलटापालट, बेड इकडून तिकडे, असं?’ दादाला जरा काळजीच वाटली.

‘नुसतं तेवढंच नाही, कदाचित डायनिंग टेबल ह्याऐवजी त्या कोपऱ्यात, फ्रिज इकडून तिकडेसुद्धा!’ बाबांनी पूर्वीच्या अनुभवावरून सांगितलं.

‘बाबा, आई वॉशिंग मशिन किचनमध्ये आणि मायक्रोवेव्ह गॅलरीत ठेवूया, असं तर नाही ना सुचवणार?’ धाकटीनं आगाऊपणा केला आणि बाबांनी तिच्या पाठीत एक गोड फटका दिला.

‘पण मिळणार काय असे बदल करून?’ मोठ्याला अजूनही शंका पडल्या होत्या.

‘बदलाचं समाधान!’ तेवढ्यात खोलीत आलेली आई म्हणाली.

‘घरातल्या वस्तूंची जागा बदलली, तर आपल्यालाच जरा फ्रेश वाटतं, वेगळं वाटतं, हो की नाही?’ आई म्हणाली. हे मात्र सगळ्यांना अगदी मनापासून पटलं.

‘तुम्ही प्रत्येकानं आपापल्या सूचना मला द्या. आपण बहुमतानं निर्णय घेऊ!’ आईनं असं सांगितल्यावर दोन्ही मुलांनी आनंदानं उड्या मारल्या.

‘आई, खरंच?’’ त्यांनी विचारलं. आईनं होकार दिल्यावर दोघांनीही आपापल्या सूचनांची यादी करायला घेतली. मोठ्याला सोफ्यावर झोपून टीव्ही बघायचा होता, तशा दृष्टीनं सोफा असावा, असं त्याला वाटत होतं. धाकटीला खिडकीच्या कट्ट्यावर चढण्यासाठी खाली एक खुर्ची हवी होती. प्रत्येक खोलीच्या बाबतीत मुलांनी बारीकसारीक सूचना केल्या होत्या.

रविवारी बाबांना नेमकं ऑफिसला जादा कामासाठी जावं लागलं आणि मुलं सकाळीच खेळायला गेली. घरी आल्यावर बघतात तर काय, घराची सगळी रचना बदललेली! आईनं घरी कामाला येणाऱ्या मावशींना बरोबर घेऊन सगळं काम पूर्ण करून टाकलं होतं. विशेष म्हणजे, सगळी वेगळीच रचना होती. आईच्या पसंतीची.

‘बाबा, बघा ना, आईनं सगळं तिच्या मनासारखं केलं!’ बाबा घरी आल्यावर मुलांनी कुरकूर केली.

‘हे छान वाटतंय की नाही?’

‘हो, छान वाटतंय खरं, पण...’

‘मग झालं तर! ह्या बाबतीत आईलाच सगळ्यात जास्त चांगलं कळतं. आईनं काही चुकीची रचना केलेय का?’

मुलांनी नकारार्थी मान हलवली.

‘छानच आहे की मग! मस्त वाटतंय आता घर. एकदम फ्रेश, वेगळं!’ बाबांनी म्हटल्यावर मुलांनाही ते पटलं.

‘बाबा, तुम्ही काय सूचना केल्या होत्या?’ मोठ्यानं कुतूहलानं विचारलं.

‘नव्हत्या केल्या.’ बाबा शांतपणे म्हणाले.

‘का?’

‘काही उपयोग होता का त्यांचा?’ एवढं म्हणून बाबांनी मुलांकडे कोऱ्या चेहऱ्यानं बघितलं. दोन क्षणच शांततेत गेले आणि मग तिघं एकमेकांकडं बघून हसायला लागले.