esakal | बालक-पालक : शिस्त, संस्कार, वगैरे वगैरे...
sakal

बोलून बातमी शोधा

Balak Palak

बालक-पालक : शिस्त, संस्कार, वगैरे वगैरे...

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

आजी आठ दिवस घरी राहायला येणार, म्हणून मुलं जाम खूष होती. आजीसाठी काय काय काय करायचं, तिचं स्वागत कसं करायचं, तिच्याबरोबर काय खेळायचं, तिला कुठे कुठे फिरायला घेऊन जायचं, सगळं प्लॅनिंग फिक्स होतं.

‘मी आजीला आपल्या जवळपासची सगळी देवळं दाखवून आणणार आहे!’ मोठी म्हणाली.

‘पण तुलाही देवळात गेल्यावर देवाला नमस्कार करावा लागेल हं!’ बाबांनी सांगितलं.

‘हो हो...करेन ना!’ त्यानं उत्तर दिलं.

‘मी तिला आमचं ग्राउंड दाखवायला नेईन.’ धाकटा म्हणाला.

‘हो, पण तिला फुटबॉल टीममध्ये घेऊ नकोस हां...एवढ्या जोरात पळता नाही येणार तुझ्या आजीला!’ आईनं सांगितलं आणि सगळ्यांना हसू आलं.

‘आपण सगळ्यांनीच मिळून कुठेतरी ट्रिपला जाऊया एखाद्या दिवशी!’ बाबांनी सुचवलं आणि सगळ्यांनी ‘हुर्रे!’ करून त्याला दाद दिली.

पुन्हा नव्या प्लॅनिंगला सुरुवात झाली. वेगवेगळी ठिकाणं निघाली, मग कुठलं लांब, कुठलं जवळ, कुठलं बघितलंय, बघायचं राहिलंय, अमक्यांनी तमकं ठिकाण बघितलं होतं, त्याविषयी फेसबुकवर टाकलं होतं वगैरे चर्चा झाल्या. शेवटी एक ठिकाण फायनल झालं एकदाचं. आजीला ते आवडेल की नाही, याचाही अंदाज घेतला गेला आणि त्याबद्दलही एकमत झालं.

‘आजीच्या आवडीचं खायला काय काय करूया?’ आईनं विषय काढला. मुलांनी लगेच त्यांची यादी पुढे केली.

‘गुलाबजाम!’

‘बासुंदी!’

‘रसमलई!’

‘पुडिंग!’

‘पिझ्झा!’

‘बर्गर!’

‘पुडिंग? पिझ्झा? बर्गर??’ आईनं डोळे वटारून मुलांकडे बघितलं.

‘ही आजीच्या आवडीच्या पदार्थांची यादी आहे, की तुमच्या?’ ती म्हणाली. मुलांची चोरी पकडली गेली.

‘आणि हो. एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं. उद्यापासून सगळ्यांनी पानात वाढलेल्या सगळ्या भाज्या खायच्या. आज अमकीच भाजी का, तमकी भाजी अशीच का केली नाही, तशीच का केली, वगैरे तक्रारी चालणार नाहीत!’ आई फुल टू ‘आई’च्या भूमिकेत शिरली होती. हे सांगताना तिनं बाबांकडे रोखून का बघितलं, हे मात्र कुणाला कळलं नाही.

‘कळलं का रे, सगळ्या भाज्या खायच्या. तक्रारी नकोयंत!’ बाबांनीही सूचनेत भर घातली आणि ते कामाला निघून गेले.

हा धोका मुलांच्या लक्षातच आला नव्हता. आईनं मग तिच्या लहानपणीच्या आजीच्या शिस्तीच्या आठवणी सांगितल्या. तशा तिनं त्या आधीही सांगितल्या होत्या, पण यावेळी जरा जास्तच आग्रहाने सांगत होती.

‘पानात काही टाकलं, अन्नाला नावं ठेवली, तरी आम्हाला धपाटा मिळायचा. आम्ही सगळया भाज्या खायचो. आजीच्या शिस्तीत, संस्कारात असे वाढलोय आम्ही!’’ आईनं मुलांना ऐकवलं. मुलांनी निमूट ऐकून घेतलं.

दोन दिवसांनी आजी गावाहून आली आणि घरात एकदम चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. आजीबरोबर ठरलेले सगळे प्लॅन्स आनंदात, उत्साहात पार पडले. आजी आठ दिवस राहणार होती, त्याऐवजी चांगली पंधरा दिवस राहिली. मुलांनी खूप धमाल केली तिच्याबरोबर. जाण्याचा दिवस आला, तेव्हा आजी म्हणाली, ‘अंजली, चांगले संस्कार केलेस गं मुलांवर. गुणाची आहेत मुलं.’’ मुलांनी आनंदानं आईकडं बघितलं. आईलाही अभिमान वाटला.

‘मुख्य म्हणजे, खाण्यापिण्याच्या काही तक्रारी नाहीत त्यांच्या. सगळ्या भाज्या अगदी आवडीनं खातात.’ आजीनं मुलांकडं कौतुकानं बघितलं.

‘नाहीतर तू! सगळ्या भाज्यांना नाकं मुरडायचीस. नाकी नऊ आले होते माझ्या, तुला शिस्त लावता लावता!’ आजी म्हणाली आणि मुलांनी आणि आईनं एकमेकांकडे बघायला एकच गाठ पडली!