esakal | बालक-पालक : शेवटचा आंबा
sakal

बोलून बातमी शोधा

Balak Palak

बालक-पालक : शेवटचा आंबा

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

‘आता हे या वर्षातले शेवटचे आंबे, बरं का!’ बाबांनी आंब्याची पेटी आणल्या आणल्या वर्दी दिली.

‘का? म्हणजे याच्यानंतर आंबे खायचे नाहीत?’ मुलं एकदम रडकुंडीलाच आली.

‘एवढी नाटकं करायची गरज नाहीये, हे आंबेसुद्धा पंधरा दिवस पुरतील. रोज बोटं चाटून पुसून रस खाल!’ आई कडाडली.

आंब्याची पेटी रीतसर फोडली गेली, पिके आंबे, काही दिवसांनी होणारे आंबे, यांचं वर्गीकरण झालं. यावेळचे आंबे जास्त छान होते. कदाचित आंब्यांचा हंगाम संपत आल्यामुळं ते जास्तच चविष्ट लागत होते.

संपूर्ण सुटीत काही कारणांनी राहून गेलेला आंबा आइस्क्रीमचा बेत यावेळी पूर्णत्वाला गेला.

‘तुम्ही मदत करणार असाल, तरच मी आइस्क्रीम करणार आहे!’ असं आईनं बजावलं होतं. मुलांनी नाइलाजानं का होईना, त्यासाठी मदत केली.

‘माझ्या लहानपणी आम्ही सगळे मिळून मुरांबा, आंब्याचा रस आटवणं, रस वाळवून त्याचं साट तयार करणं, अशी सगळी कामं करायचो. आईला मदत करायचो. आई पिक्या आंब्याचे खूप पदार्थ करून ठेवायची आणि मग पुढचं वर्षभर आंब्याची कमतरता जाणवायची नाही!’ असं बाबांनी फार कौतुकभरल्या नजरेनं मुलांना सांगून ठेवलं होतं. मुलांनाही उत्साह आला होता.

‘आई, तू करशील का हे सगळे पदार्थ?’ मुलांनी आईकडं भुणभूण लावली.

‘हो!! करेन की. फक्त नियम तोच.’

'कुठला?'

‘आइस्क्रीमसाठी तुम्ही मदत केली होतीत ना, तशी हे पदार्थ ज्यांनी सुचवलेत, त्यांनी सगळ्या कामांसाठी मदत करायची!’

बाबांची मदत करायची तयारी होती, पण त्यासाठी खूपच मेहनत लागते, हे त्यांना लवकरच लक्षात आलं आणि त्यांनी लगेचच त्यातून माघार घेतली.

‘आई, तसंही बाबांनी ही शेवटची पेटी म्हणून सांगितलंय. आपण आंबे खाऊन आणि रस काढूनच संपवूया. पदार्थ वगैरे मावशींकडून आणू की! त्या छान करतात!’ मुलांनी त्यांच्या सोयीचा पर्याय दिला, आईलाही तो पटला.

दिवस एकेक करून सरत गेले आणि आंबेही एकेक करून कमी कमी होत गेले.

‘आता हा शेवटचाच आंबा, बरं का!’ आईनं पेटीतला उरलेला एकमेव आंबा दाखवत जाहीर केलं, तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडले.

‘आई, हा आंबा कोण खाणार?’ धाकट्यानं काळजीनं विचारलं.

‘तूच जास्त आंबे खाल्लेस, त्यामुळं हा मी खाणार!’ ताईनं निकालच देऊन टाकला.

‘तुम्ही दोघं भांडत बसाल, त्यापेक्षा त्याचा रस काढ,’ बाबांनी सुचवलं.

‘एका आंब्याचा रस किती निघणार?’ आईनं शंका काढली.

कुणाचाच पर्याय मान्य होईना. उरलेल्या एका आंब्याचं काय करायचं, हा पेच काही सुटेना. शेवटचा आंबा नजरेसमोर कायम राहावा, तो कधीच संपू नये, म्हणून दोन दिवस कुणीच त्याच्याकडं बघितलं नाही. शेवटी आईनंच दोन दिवसांनी तो कापून त्याची एकेक फोड प्रत्येकाच्या ताटात वाढली. ती आवडीनं खाऊन झाल्यानंतर सगळ्यांना लक्षात आलं, की हाच तो घरातला शेवटचा आंबा.

आता पुढच्या वर्षापर्यंत आंबा नाही, या कल्पनेनं प्रत्येकाचा चेहरा पडला होता. शेवटचा आंबा असा नकळत पोटात जायला नको होता, असंही वाटत होतं.

‘बरं ऐका. एवढंही काही तोंड पाडून बसायची गरज नाहीये. आजच आपल्या भाजीवाल्या मावशींकडून तोतापुरी आंबे आणलेत मी. उद्यापर्यंत ते पिकतील. तोपर्यंत धीर धरा!’ आईनं सांगितलं आणि मुलांनी एकमेकांना हाय-फाय देत आनंद साजरा केला.

loading image