esakal | बालक-पालक : वाळवणाय नम: ।
sakal

बोलून बातमी शोधा

Balak Palak

बालक-पालक : वाळवणाय नम: ।

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

‘काय मग, मजा आली की नाही? कुठे कुठे फिरून आलात?’ आजोबांनी मुलांना विचारलं, तशी मुलं उत्साहानं सांगायला लागली. मामानं सुटीसाठी आजोळी आलेल्या त्याच्या भाच्यांना दोन दिवस त्याच्या गाडीतून आसपासची सगळी प्रसिद्ध ठिकाणं दाखवली होती. त्यामुळं मुलांनी ‘कंटाळा’ हा शब्दही उच्चारला नव्हता. आंबे, फणस, जांभळं, करवंदं, पेरू, चिकू, बोरं, पपनस, अशा फळांची चंगळ तर होतीच!

‘पण उद्या काय करायचं?’ धाकटीनं प्रश्न विचारला.

‘हो ना, मामा म्हणालाय, उद्या त्याला खूप कामं आहेत. तो आम्हाला कुठं फिरायला नेणार नाहीये. मग काय करणार आम्ही?’’

‘आम्हाला कंटाळा येईल. तू आम्हाला घरी पाठवतेस का?’ धाकटी म्हणाली.

मोठ्यानंही तिचीच ‘री’ ओढली.

‘अरे थांबा! उद्यापासून वाळवण करायचंय आपल्याला,’ आजी म्हणाली.

‘वाळवण म्हणजे?’ धाकटीनं विचारलं.

‘म्हणजे पापड, पापड्या, साटं, वगैरे वगैरे.’

‘पापड करायचे म्हणजे काय करायचं? तळायचे का?’ मोठ्यानं विचारलं. आजी आणि आजोबांना हसू आलं.

‘पापड केल्याशिवाय तळून खाणारेस का, दगडोबा? आता उद्या कळेल तुम्हाला पापड कसे करतात ते,’ आजीनं खुलासा केला.

आजीनं रात्री सगळ्यांना लवकर झोपवलं. सकाळी मुलांना जाग आली, ती घरातल्या गडबडीनं. शेजारच्या सगळ्या काकू, मावश्या, माम्या आपापल्या घरून पोळपाट, लाटणं घेऊन आल्या होत्या. त्यांची मुलंही होती मदतीला. उडदाचे पापड, पोह्याचे पापड, अशी तयारी सुरू होती.

‘लाटी खाणार का गं?’ एका मावशीनं विचारलं, तेव्हा धाकटीनं स्पष्ट नकार दिला. मावशीनं आग्रह केल्यावर किंचित तेलात बुडवून नाखुशीनंच तिने ती लाटी तोंडाला लावली आणि तिला ती चव भलतीच आवडली. मग काय, सगळ्यांना लाडीगोडी लावून लाट्या लाटायचा उद्योग सुरू झाला. मोठा आणि धाकटी, दोघंही पापड लाटायलाही बसली. लाटून झालेले पापड बाहेर नेऊन उन्हात नीट वाळत घालायचे, योग्य वेळी परतायचे, दुपारनंतर सूर्याच्या दिशेप्रमाणं त्यांना उन्हात सरकवायचं, त्यांची राखण करायची, ही सगळी कामं मुलांनी उत्साहानं केली. दुपारी घरी आमटीभाताचा फर्मास बेतही रंगला.

दुसऱ्या दिवशी आजीनं साबूदाण्याच्या पापड्या (फेण्या) करायचा घाट घातला. तिसऱ्या दिवशी आंब्याची, फणसाची साटं. आंब्याच्या पोळीला कोकणात ‘साट’ म्हणतात, हे दोघांना पहिल्यांदाच कळलं. एके दिवशी सांडगी (भरलेल्या) मिरच्या, एके दिवशी दारातल्याच रातांब्यांचं कोकम सरबत, रस आटवणं, अशी खूप कामं मुलांना बघता, शिकता आली. कच्च्या फणसाचे गरे तळायचे, पिकलेले गरे वाळवायचे, कच्च्या कैरीच्या फोडी वाळवायच्या आणि त्याचं नंतर (आंबोशीचं) लोणचं करायचं...एक ना अनेक. फणसाचे पापड, मिरगुंड, तांदळाच्या पापड्या, बटाट्याचा कीस, असे कितीतरी नवीन प्रकारही मुलांनी बघितले.

आठ दिवस हा वाळवणाचा कार्यक्रम सुरू होता. दिवसभर धावपळ करून मुलं एवढी दमत होती, की जेवून रात्री साडेआठ-नऊलाच गाढ झोप लागत होती.

एके दिवशी आईचा फोन आला, ‘काय रे, परत यायचंय की नाही इकडे?’

खरंतर ‘नाही’, असंच मुलांना म्हणायचं होतं, पण परत जावं तर लागणार होतंच.

‘आम्ही येतो, पण एका अटीवर.’

`आता कुठली अट?` आईनं विचारलं.

‘तिकडे आल्यावर आपण एक दिवस सगळ्यांना बोलावून वाळवणाचा कार्यक्रम करायचा. आम्ही तुला शिकवतो. खूप मज्जा येईल तुला!’’ मुलं म्हणाली आणि आईनं ते लगेच मान्य करून टाकलं.

loading image