esakal | बालक-पालक : तस्मै श्री गुरवे नम:।
sakal

बोलून बातमी शोधा

Balak Palak

बालक-पालक : तस्मै श्री गुरवे नम:।

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

‘आई, इथे कुठे?’’ बाजारातून येता येता आईनं एका अनोळखी बिल्डिंगपाशी स्कूटर थांबवली, तेव्हा मुलीला आश्चर्य वाटलं.

‘अगं, इथे माझ्या शाळेतल्या बाई राहतात. त्यांना जरा भेटून यायचंय.’’ आईनं सांगितलं.

‘ए काय गं आई! आम्ही सगळे फ्रेंड्स रात्री आठ वाजता सोसायटीत भेटणार होतो. उशीर होईल ना आता!’’ मुलीनं कुरकूर केली.

‘मोजून दहा मिनिटांत निघूया गं!’’ असं म्हणून आई तिचं न ऐकता तिला त्या सोसायटीत घेऊन गेलीच.

‘तुझ्या शाळेतून फोन आला होता आज. टीचरशी भांडण केलंस तू?’ आईनं विचारलं.

‘भांडण नाही केलेलं. माझी चूक नसताना त्या मला बडबडत होत्या. मग मला राग आला.’ मुलीनं तिची बाजू मांडली.

‘म्हणून तू त्यांच्या अंगावर ओरडलीस?’

‘ओरडले नाही गं.’

‘हो, पण तुझा आवाज चढला होता ना?’

‘त्यांनी कंप्लेंट केली का तुझ्याकडं?’

‘त्यांनी फक्त माहिती दिली. शाळेत मुलांनी काही चुकीचं केलं, तर पालकांना कळायला हवंच ना?’

‘मला राग आला होता. उगाचच कशाला बोलणी खायची?’

‘असं नेहमी करतात का त्या टीचर?’

‘नाही. आजच केलं.’

‘तरीही तू रागावलीस?’

मुलगी पुढं काही बोलणार, एवढ्यात आईच्या बाईंचं घर आलं.

आईनं बेल वाजवली. एका म्हाताऱ्या आजींनी थरथरत्या हातांनी दार उघडलं.

‘येऊ ना बाई?’ आईनं विचारलं. भेटायला येत असल्याचं तिनं आधीच कळवून ठेवलं होतं. बाईंनी लाडक्या शिष्येचं उत्साहानं स्वागत केलं. आईनं त्यांच्या तब्येतीची आस्थेनं विचारपूस केली. बाईंचा स्वर आता थकलेला जाणवत होता. पहिल्यासारखा उत्साह राहिला नव्हता, तरीही त्यांनी चहा केला, छोटीला लाडू दिला. स्वयंपाकाला एक मावशी येतात. अधूनमधून पुतण्याही मदत करतो, असं बाईंनी स्वतःच सांगितलं.

‘मीसुद्धा येत जाईन कधीतरी मदतीला,’’ आई म्हणाली. शाळेतल्या आठवणी निघाल्या. कोण कसं दंगा करायचं, शाळेत कुणाला जास्त शिक्षा व्हायची, कुणाचे पाढे तोंडपाठ असायचे, कुणाचं अक्षर चांगलं होतं, असे भरपूर किस्से निघाले. छोटीही या गप्पांमध्ये रमून गेली. दहा मिनिटांचा अर्धा तास कधी होऊन गेला, तिघींनाही कळलं नाही. छोटीलाही आपल्याला मैत्रिणींना भेटण्याची अजिबात आठवण राहिली नाही.

बाजारातून खास बाईंसाठी आणलेली मोगऱ्याची फुलं आईनं त्यांना दिली. त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांना तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलं आणि निरोप घेऊन निघाली.

‘कंटाळली नाहीस ना?’ आईनं स्कूटरपाशी आल्यावर मुलीला विचारलं.

‘नाही गं. किती मस्त आहेत तुझ्या बाई! तू त्यांची आवडती स्टुडंट होतीस वाटतं!’’

‘हो. ह्या बाईंनीच मला घडवलं, मला चांगलं वाचायची सवय लावली. माझ्यावर छान संस्कार केले,’’ आईनं सांगितलं.

‘आई, तू एकदा म्हणाली होतीस, की कुठल्यातरी टीचरनी तुला खूप मोठी शिक्षा केली होती, तुझं एक वर्ष वाया गेलं होतं?’’

‘हो, गैरसमजातून. चुकीनं.’

‘त्या टीचर कोण होत्या गं?’ मुलीनं उत्सुकतेनं विचारलं.

आई काही क्षण गप्प राहिली. तिनं नजर फिरवली, डोळे पुसल्यासारखं केलं आणि ‘चल, उशीर होतोय!’ म्हणून स्कूटर स्टार्ट केली.

‘आई, तू आणलेली फुलं राहतील ना गं उद्यापर्यंत?’’ घरी पोहोचल्यावर मुलीनं विचारलं.

‘हो! का गं?’’

‘मला आमच्या टीचरना द्यायची आहेत. आणि ओरडल्याबद्दल सॉरीही म्हणणारेय मी त्यांना!’’ मुलीनं सांगितलं आणि दोघींचे डोळे भरून आले.

loading image