esakal | बालक-पालक : आम्ही चालवू हा, पुढे वारसा
sakal

बोलून बातमी शोधा

Balak Palak

बालक-पालक : आम्ही चालवू हा, पुढे वारसा

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

‘आई, गुरुपौर्णिमा कधी आहे गं?’ मोठ्यानं आईला विचारलं. आईनं दोन्ही मुलांना गुरुपौर्णिमा, तिचं महत्त्व सांगितलं.

‘आम्ही शाळेत असताना आमच्या घराजवळ खूप फुलझाडं होती. आमच्या शिक्षकांसाठी आम्ही वेगवेगळी फुलं घेऊन जायचो. शिक्षकांना वाकून नमस्कार करायचो. ते आशीर्वाद द्यायचे. त्यांनी आणलेला लाडू, किंवा पेढे किंवा कधीकधी साखरफुटाणे, चॉकलेट, असा ‘प्रसाद’ मिळायचा!’ आई जुन्या आठवणींमध्ये रमून गेली.

‘आम्ही तर घरीच एखादं शुभेच्छापत्र किंवा वस्तू तयार करून शिक्षकांना गिफ्ट करायचो.’ बाबांनी त्यांची आठवण सांगितली.

‘शुभेच्छापत्र म्हणजे?’ धाकटीनं निरागस शंका विचारली.

‘म्हणजे ग्रीटिंग, डंबो!’ मोठ्यानं तिला टपली मारली. दोघांची तिथेच जुंपणार होती, पण आईनं मध्यस्थी करून तो वाद सोडवला.

‘मलाही माझ्या टीचरना पत्र लिहायचंय, काहीतरी गिफ्ट द्यायचंय, पण कसं देणार? आम्हाला हल्ली टीचर भेटतच नाहीत!’ छोटीनं उदास चेहऱ्यानं तिची व्यथा मांडली. ऑनलाइन शाळेमुळं मुलं आधीपासून थोडीशी नाराज होती, त्यात आज पुन्हा भर पडली. आपणही उगाच जुन्या आठवणी काढल्या आणि मुलांना त्यावेळच्या गमतीजमती सांगितल्या, असं आईबाबांना वाटलं.

‘अरे, ऑनलाइन शाळेतही तुम्हाला गुरुपौर्णिमा सादर करता येईलच की!’ आईनं दुसऱ्या दिवशी मुलांना सुचवलं.

‘कसं? Hand raise करतात, तसं पाया पडायचंही एखादं फंक्शन आहे का ॲपमध्ये?’ मोठा म्हणाला.

‘अरे तसं नाही. पूर्वी आम्ही हातानं पत्र लिहायचो. आता तुम्ही ईमेल करू शकता ताईंना. तुम्हाला त्यांच्याबद्दल जे वाटतं, ते लिहू शकता. त्यांना छान वाटेल.’

आईची कल्पना दोघांनाही आवडली. पत्राबद्दल आई-बाबांनी मुलांशी चर्चा केली. त्यांना कुठलेही सल्ले न देता त्यांच्या मनासारखं लिहू दिलं.

मोठ्यानं पुढच्याच दिवशी त्याचं ई-मेल टाइप करून तयार केलं, पण छोटीची काही तयारी दिसेना. आईनं थेट काही विचारलं नाही. तिचा मूड नसेल, किंवा तिला कंटाळा आला असेल, असा समज करून घेऊन आईनं तो विषय सोडून दिला.

गुरुपौर्णिमेचा दिवस उजाडला आणि ऑनलाइन शाळा सुरू झाली. सगळ्या मुलांशी बोलण्यासाठी शाळेचा एकत्र कार्यक्रम सुरू होता. मुलांनी टीचरना शुभेच्छा दिल्या. टीचरनी त्या हसत स्वीकारल्या.

‘काही मुलांनी मला ई-मेल केलंय, ते वाचून छान वाटलं,’ असं सांगून ताईंनी मोठ्याचं नाव घेतलं, त्याचं कौतुक केलं. धाकटी सगळं ऐकत होती. तिनं काहीच पाठवलं नाही, याचं आईला राहून राहून आश्चर्य आणि वाईटही वाटत होतं.

तेवढ्यात टीचर म्हणाल्या, ‘सगळ्यात खास भेट मिळालीय एका छोट्या मुलीकडून. तिनं मला स्वतःच्या हातांनी लिहिलेलं एक छानसं पत्र पाठवलंय. अगदी प्रेमानं एकेक शब्द लिहिलाय आणि ते छान सजवलंही आहे,’ असं म्हणून ताईंनी ते पत्र सगळ्यांना वाचूनही दाखवलं. धाकटीचं नाव त्यांनी घेतलं, तेव्हा मात्र आईला धक्का बसला आणि तिनं कौतुकानं धाकटीकडे पाहिलं. आईच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले होते.

‘मला वाटलं, तू काहीच केलं नाहीस. पण एवढं पत्र लिहून, पोस्टात टाकून कधी पाठवलंस गं? कुणी मदत केली तुला?’ आईनं विचारलं, तेव्हा धाकटीनं आजीकडं बोट दाखवलं. गुरुपौर्णिमेचं अनोखं गिफ्ट देऊन धाकटीनं टीचरना आणि आईलाही खूश करून टाकलं होतं!

loading image