बालक-पालक : तिमिरीतून तेजाकडं...

यंदाचा फराळ जास्तच वैशिष्ट्यपूर्ण वाटत होता. आजीनंही तिची गुडघेदुखी सांभाळत सगळ्या पदार्थांसाठी मदत केली होती. छोटी आणि तिच्या दादाची अधूनमधून लुडबूड सुरूच होती.
diwali faral
diwali faralsakal

दिवाळीच्या फराळाचा घरात आठवडाभर घमघमाट सुटला होता. सगळ्यात आधी चिवडा झाला, मग लाडू, मग करंज्या, शंकरपाळ्या, सगळ्यात शेवटी चकल्या, असा साग्रसंगीत कार्यक्रम झाला. चकल्या सगळ्यात शेवटी करण्यामागचं शास्त्र असं होतं, की निदान दिवाळी सुरू हाईपर्यंत तरी त्या टिकाव्यात. नाहीतर आत्ता चहाबरोबर, मग नाश्ता करताना, मग मध्येच कंटाळा आला म्हणून, असं करताना चकल्यांचा डबा दिवाळी सुरू व्हायच्या आधीच निम्म्यापर्यंत यायचा. यंदाचा फराळ जास्तच वैशिष्ट्यपूर्ण वाटत होता. आजीनंही तिची गुडघेदुखी सांभाळत सगळ्या पदार्थांसाठी मदत केली होती. छोटी आणि तिच्या दादाची अधूनमधून लुडबूड सुरूच होती.

‘‘आई, यंदा पहिल्या दिवशी आपल्याकडे दिवाळीला फराळाला कुणाला बोलावणार आहेस?’’ धाकटीनं मनातला प्रश्न विचारून टाकला. दरवर्षी आपल्या घरी कुणीतरी पाहुणे येतात, हे तिला माहीत होतं. कधी जवळचे नातेवाईक, कधी आईच्या मैत्रिणी, कधी बाबांच्या ऑफिसमधले कुणी, तर कधी सोसायटीतली काही ओळखीची माणसं. दिवाळीत एक दिवस तरी यापैकी कुणी फराळाला आलं नाही आणि घर भरून गेलं नाही, असं झालं नव्हतं.

‘‘यावेळी कुणाला बोलवायचं, ते माझं ठरलं नाहीये अजून,’’ आईनं सांगितलं होतं. नेहमीप्रमाणे दिवाळीच्या आधी आई-बाबांची कामांची धावपळ सुरूच होती. दिवाळीत सुटी घ्यायची आणि घरी वेळ द्यायचा, तर आधी सगळी कामं पूर्ण करणं गरजेचं होतं. त्यातून अध्येमध्ये दादाचे फटाके, धाकटीची आकाशकंदील कार्यशाळा आणि नंतर तसे प्रयोग करायची गडबड, घराची साफसफाई, नको त्या वस्तू काढून टाकणं, वापरातल्या वस्तू, भांडी लखलखीत करणं, सगळीच कामं एकामागोमाग एक सुरू होती. माळा आणि कपाट आवरताना तर आई आणि मुलांची घमासान लढाई अपेक्षितच होती. आईला सगळ्या वापरात नसलेल्या वस्तू काढून टाकायच्या होत्या. मग त्यात जुनी खेळणी, कपडे, कुठून कुठून जमवलेल्या, पण नंतर पडून राहिलेल्या वस्तू, असं सगळं होतं. कपडे आता होत नसले आणि खेळण्यांकडे ढुंकून कुणी बघत नसलं, तरी ती काढून टाकायला दोन्ही मुलांचा विरोध होता.

‘‘आम्ही खेळतो की!’’ हे पालूपद कायम होतं. शेवटी आईनं दिवसभर कधी कुठल्या वस्तूला कुणी हात लावला होता, ह्याचं कोष्टकच मांडल्यावर मुलांना बोलण्यासाठी वाव राहिला नाही. त्यांनी बाबांच्या मध्यस्थीचा काही उपयोग होईल का, याचा अंदाज घेतला, पण बाबा मुळातच आपल्या कपाटातल्या वस्तू वाचवण्याच्या खटपटीत होते, त्यामुळं त्यांनी फारसं काही लक्ष दिलं नाही.

आज-उद्या, इथं नको-तिथं जाऊ करत खरेदीचा मुहूर्तही पार पडला होता. सगळ्यांच्या मनासारखं सगळं घेऊन झालं होतं, आता कधी एकदा नवीन कपडे घालून आपण मिरवतो, असंही मुलांना आणि त्यांच्याबरोबरच मोठ्यांना वाटू लागलं होतं. पहिल्या दिवशीचा कार्यक्रम काय आहे, ते मात्र आईनं कुणाला सांगितलं नव्हतं.

दिवाळीची पहाट उजाडली. सोसायटीतला पहिला फटाका लावायचा मान मुलांनी पटकावला, कुरकूर न करता उटणं लावून घेऊन अभ्यंगस्नानही उरकलं. दिवाळी पहाट कार्यक्रमाला चक्कर, देवदर्शन, सगळं झालं. दारात थोडी गडबड ऐकू आली, म्हणून धाकटी दारापाशी धावली.

‘‘आई, आपल्या मावशी आल्यायंत!’’ तिनं वर्दी दिली. केर काढणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या, कचरा उचलून नेणाऱ्या, सगळ्याच मावशी, सोसायटीच्या बागेतले माळीकाका, वॉचमन काका, सगळेच एकदम कसे आले, हा तिला प्रश्न पडला. आई हसून पुढं झाली आणि तिनं सगळ्यांचं स्वागत केलं. बाबांनी सगळ्यांना आत बोलावलं. मुलांना काही अंदाजच येत नव्हता.

‘‘आपल्याकडं फराळाला यावेळी कुणाला बोलावलं आहेस, असं विचारत होतीस ना? यावेळी हे पाहुणे आलेत आपल्याकडं फराळाला. चल, आता पटापट मी आत तयार करून ठेवलेल्या डिश बाहेर आणून दे बघू!’’ आईनं छोटीला सांगितलं आणि छोटी आनंदानं उडी मारून दादाला बरोबर घेऊन पाहुण्यांची सरबराई करण्यासाठी स्वयंपाकघरात पळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com