esakal | बालक-पालक : खरे सेलिब्रिटी!
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati idol

बालक-पालक : खरे सेलिब्रिटी!

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

सोसायटीच्या गणेशोत्सवात बक्षीस समारंभाला एखादा ‘सेलिब्रिटी’ बोलवावा, असा विषय सोसायटीच्या गणेशोत्सवात निघाला. त्याला येण्याजाण्याचा खर्च द्यावा, वाटल्यास मानधनही दिलं जावं, अशीही चर्चा झाली. गणेशोत्सव समितीकडं आधीची काही रक्कम शिल्लक होती, त्यातून हा खर्च भागेल, असा अंदाज काही सदस्यांनी व्यक्त केला. मग तीच कल्पना उचलून धरली गेली.

‘बाबा, सेलिब्रिटी म्हणजे काय?’’ घरात हा विषय कानावर पडल्यावर धाकटीनं बाबांना विचारलं.

‘सेलिब्रिटी म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती. ज्यांचं नाव नेहमी चर्चेत असतं, ज्यांना बरेच जण ओळखतात, असा माणूस.’’

‘मला पण सगळे ओळखतात सोसायटीत. म्हणजे मी पण सेलिब्रिटी का?’’ धाकटीनं निरागसपणे विचारलं आणि आई, बाबा दोघांनाही हसू आलं.

‘अगं वेडे, सेलिब्रिटी म्हणजे मोठे आर्टिस्ट. म्हणजे हिरो, हिरॉइन, सिंगर, स्पोर्टस् पर्सन अशी वेगवेगळ्या फील्डमधले फेमस माणसं.’’ स्वतःला थोडं मोठं समजायला लागलेल्या दादानं खुलासा केला.

‘ते आपल्या सोसायटीत येणार?’’ धाकटीला आश्चर्यच वाटत होतं.

‘हो, म्हणजे त्यांना वेळ असेल, त्यांना जमणार असेल, तर,’’ बाबांनी सांगितलं. मग त्यांना बोलावण्याची पद्धत कशी असते, ते काय बोलतात, ते आल्यावर काय काय तयारी करायला लागते वगैरे माहिती बाबांनी दिली. तो विषय तिथेच संपला.

सोसायटीच्या गणेशोत्सवासाठी मोठ्या माणसांची समिती असली, तरी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, स्पर्धा, खाऊ, फन फेअर अशा गोष्टींची जबाबदारी मुलांवर असायची. या समितीची बैठक भरली आणि जोरदार चर्चा सुरू झाली. धाकटीनं कुतुहलानं त्यात भाग घेतला. आपल्या सोसायटीत सेलिब्रिटी कोण येणार, याची तिलाच जास्त उत्सुकता होती. तिनं हल्लीच बघितलेल्या सिनेमांमधल्या काही कलाकारांची, तिला माहिती असलेल्या खेळांमधल्या काही प्रसिद्ध खेळाडूंची, गायक गायिकांची नावंही तिनं सांगून बघितली. पण ते ‘खूपच मोठे’ असल्यामुळं येऊ शकत नाहीत, हे ऐकल्यावर ती जरा हिरमुसली.

शेवटी बऱ्याच चर्चेतून मुलांनी एक नाव निश्चित केलं. बाबा त्यावर काय म्हणतात, याबद्दल मुलांना उत्सुकता होती. बाबांनी नाव वाचलं आणि मुलांकडं समाधानानं बघितलं.

बक्षीस समारंभाचा दिवस उजाडला. सेलिब्रिटी नक्की कोण, हे जाहीर झालेलं नसल्यामुळं सगळ्यांनाच उत्सुकता होती. सोसायटीच्या दारापाशी एक गाडी येऊन उभी राहिली, सोसायटीचे सेक्रेटरी काका त्यातून उतरले. त्यांनी मागचं दार उघडलं आणि दारातून एक वयस्कर आजोबा खाली उतरले. सगळे आश्चर्याने, उत्सुकतेने बघू लागले.

सेक्रेटरी काका त्यांना सन्मानानं स्टेजपाशी घेऊन गेले.

‘‘वेगवेगळ्या स्पर्धांच्या बक्षीस समारंभासाठी आणि आपल्याशी गप्पा मारण्यासाठी सेलिब्रिटी बोलवावेत, अशी कल्पना यावर्षी मांडण्यात आली होती. हे आपल्या सोसायटीच्या जवळच राहणारे सखारामकाका. गेले ५० वर्षं हे गणपतीच्या मूर्ती तयार करून गणरायाची सेवा करतात. आपणही त्यांच्याकडूनच मूर्ती घेतो. ते अनेक मुलांना, मोठ्यांनाही मूर्ती करायला शिकवतात. एवढ्या छान, सुबक आणि प्रसन्न मूर्ती घडवणारे काका हेच आपले सेलिब्रिटी. त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा आणि त्यांच्या कलेबद्दल भरपूर काही समजून घेता यावं, म्हणून आपण यंदा त्यांनाच इथे बोलावलंय,’’ असं बाबांनी सांगितल्यावर सगळ्यांनी आनंदानं टाळ्या वाजवल्या.

‘‘अशी माणसं आपले खरे सेलिब्रिटी. त्यांना बोलवायची कल्पना सुचवल्याबद्दल मी सगळ्या बाळगोपाळ चमूचं अभिनंदन करतो,’’ बाबांनी समाधानानं मुलांकडं बघितलं आणि टाळ्यांच्या गजरात मुलांच्या या अभिनव कल्पनेला दाद मिळाली.

loading image
go to top