esakal | Balak Palak : शब्दांच्या पलीकडले... I
sakal

बोलून बातमी शोधा

Balak-Palak

बालक-पालक : शब्दांच्या पलीकडले...

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

बाबांनी सोसायटीची मीटिंग संपवून आल्या आल्या घरातला पसारा आवरायचं फर्मान काढलं आणि मुलं जरा कुरकुरायला लागली.

‘बाबा, आई यायला वेळ आहे ना अजून? तुम्ही एवढी घाई का करताय?’’ मोठीनं तक्रार केली.

‘हो ना, आणि एवढा काही पसारा नाहीच आहे घरात. मग कशाला आवरायचं?’’ धाकटीही चिरकली.

‘बाहेरून आलेल्या माणसाला घर टापटीप आणि व्यवस्थित दिसलं, की छान वाटतं. त्याचा मूड खराब होत नाही!’’ बाबा म्हणाले आणि मोठीचे डोळे चमकले.

‘सांगा ना बाबा, काय झालंय? आईशी भांडण झालंय का तुमचं?’’ मोठीनं पिच्छाच पुरवला. धाकटीही मग तिच्या जोडीनं काहीबाही प्रश्न विचारत राहिली.

‘हो.’’ आता बाबांना कबुली देण्याशिवाय पर्याय नव्हता.

‘म्हणून आई सकाळपासून गप्प गप्प आहे का?’’ मोठीनं तिच्या मनातली शंका विचारली.

‘हो. तसंच काहीसं.’’

‘अच्छा, आत्ता लक्षात आलं माझ्या. मी अभ्यास घे म्हणून सांगायला गेले, तरी ‘बाबांना सांग’ असं काहीतरी तुटक उत्तर दिलं तिनं,’’ मोठीनं जास्तीची माहिती दिली.

‘तुम्ही आता जास्त बडबड करू नका आणि प्रश्न विचारू नका. पटकन सगळं आवरून टाका, मग आपण कूकरही लावून टाकूया. पोळ्या मी बाहेरून आणल्यायंत,’’ बाबांनी सांगितलं.

‘बाबा, बटाट्याची भाजी करा ना! तुम्ही छान करता!’’ धाकटीनं लाडीगोडी लावल्यावर बाबांना तेही करावं लागलं. तिघांनी जोर लावल्यामुळं कामं पटापट पूर्ण झाली. घर आवरून झालं, स्वयंपाकही तयार झाला.

‘बाबा, एवढं सगळं करण्यापेक्षा आईला सॉरी म्हणून टाकायचं ना!’’ मोठी म्हणाली.

बाबा तिच्याकडं बघून किंचित हसले. तिला समोर बसवलं.

‘सॉरी म्हणण्यात काहीच कमीपणा नाही, पण एखाद्या वेळी आपली चूक असेल आणि ती कबूल करायची असेल, तर ‘सॉरी’च म्हणायला हवं, असं नाही. आपली चूक लक्षात आलेय, हे कधीकधी आपल्या वागण्यातूनही दाखवून देता येतं!’’ बाबांनी तिला समजावलं. तिला ते कितपत पटलं, हे बाबांना समजलं नाही.

आई आली. आवरलेलं घर बघून आणि मुख्य म्हणजे स्वयंपाक तयार असलेला बघून तिचा चेहरा खुलला. दिवसभराचा शीण निघून गेला. मग सगळ्यांनी छान गप्पा मारत एकत्र जेवण केलं.

दोन-चार दिवस गेले असतील. आई सकाळी उठली, तेव्हा तिला जाणवलं, की मोठी पहाटे लवकर उठून अभ्यासाला बसली आहे. टेबलवर तिला अभ्यासाच्या वह्याही दिसल्या. दिलेला होमवर्क तर तिनं केला होताच, पण त्यापेक्षा जास्त अभ्यास स्वतःहून केला होता. कविता दोनदा लिहायला सांगितली होती, तरी तिनं पाच वेळा लिहिली होती. आईनं त्याबद्दल विचारलंच.

‘काय झालं गं?’’ तिनं मुलीला विचारलं.

‘परवा होमवर्क न केल्याबद्दल सर मला ओरडले. तेव्हा मी काहीतरी खोटं कारण सांगितलं होतं. म्हणून मी...’’ मोठीला पुढं काही बोलवलं नाही.

आपली चूक लक्षात आल्यामुळं, दिलेल्या अभ्यासापेक्षा जास्त अभ्यास पूर्ण करून मुलीनं चूक सुधारली आहे, हे आईला लगेच समजलं. तोपर्यंत बाबाही उठून मागं येऊन उभे राहिले होते. त्यांच्याकडं बघून आईनं स्मित केलं. मुलगीही मग दोघांना मिठी मारून मुसमुसून रडायला लागली आणि आई तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवत राहिली.

loading image
go to top