esakal | बालक-पालक : गोऽऽऽ विंदा रे गोपाळा!
sakal

बोलून बातमी शोधा

Dahihandi

बालक-पालक : गोऽऽऽ विंदा रे गोपाळा!

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

‘ह्या सोसायटीत दहीकाला जोरात असतो, बरं का!’’ नव्या सोसायटीची माहिती देताना बाबा मुलांना सांगत होते.

‘म्हणजे काय काय करतात?’’ मोठीनं विचारलं.

‘म्हणजे डीजे लावून नाचायचं ना, बाबा?’’ धाकटा उत्साहानं म्हणाला.

‘वेड्या, दहीकाला म्हणजे फक्त डीजे लावून नाचणं असतं का? दहीकाल्याच्या उत्सवाची धुंदीच अशी असते, की आपोआप त्यात मन रंगून जातं.’’ बाबा म्हणाले. मग त्यांनी श्रीकृष्णाष्टमी, दहीकाल्याची परंपरा मुलांना समजावून सांगितली.

‘त्याला जास्त काही रंगवून सांगू नका. उद्या तो हंडी फोडायला जायचा हट्ट करेल,’’ आईनं लगेच काळजी व्यक्त केली.

‘अगं फोडू दे की! सोसायटीतलीच हंडी आहे ना!’’ बाबांनी समजूत घातली.

‘नाही, सोसायटीतली असली, तरी धोका असतोच ना त्यात? चार-पाच थर लावणार, चिखल होणार, कुठे पडलाझडला तर उगाच पंचाईत.’’ तसा तो अधूनमधून पडतो-झडतोच, याची बाबांनी आठवण करून दिली, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.

पुढचे दोन दिवस घरात त्यावरून काही विषय निघाला नाही. दहीहंडीचा दिवस उजाडला. सकाळपासून वानरसेना धावपळीत होती. पोहे-चुरमुरे, लाह्या, फुगे, फळं, काल्याचे पदार्थ...सगळी जय्यत तयारी सुरू होती. सोसायटीला दहीहंडीचा रंग चढला होता.

‘मी नाही या चिखलात जाणार!’’ धाकट्यानं आधीच जाहीर करून टाकलं, तेव्हा आईला हुश्श झालं. संध्याकाळी सगळीच मंडळी सोसायटीच्या मैदानाभोवती जमली. मोठी मुलं आधीपासून तरबेज असल्यासारखी दिसत होती. खालचा थर कुणी लावायचा, पहिल्या थरात कोण असेल वगैरे तयारी सुरू होती. हंडी कुणी फोडायची, याचंही नियोजन झालेलं होतं. मुलं आनंदात होती. हंडी अगदीच उंचही नव्हती आणि अगदी सहज फोडता येईल, अशीही नव्हती. मुलं थर लावत होती, पुन्हा कोसळत होती. कोसळणाऱ्या मुलांना खाली पडायच्या आधीच धरायला आजूबाजूला सगळे सज्ज होते.

‘आपला मुलगा इथं जायला नको म्हणाला हे बरंच झालं. मला तर काळजीच वाटते अशा ठिकाणी!’’ लांब उभी असलेली आई शेजारी उभ्या असलेल्या बाबांना म्हणाली.

‘त्याला जरा धीट करायला हवा. त्याच्या वयाची मुलं आहेतच की इथं! त्यांना सांभाळायला मोठेही आहेत.’’ बाबांनी थोडी रुजवात घालायचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला.

‘तोच नाही म्हणतोय तर राहू दे ना!’’ हे आईचं पालुपद कायम राहिलं.

तेवढ्यात गलका झाला म्हणून त्यांनी पुन्हा मैदानाकडं नजर वळवली, तर कुणीतरी बारका तिसऱ्या थरावरच्या मुलांच्या खांद्यावरून वर चढत होता. काही समजायच्या आतच तो तोल सावरून नीट उभा राहिला आणि हंडीतला नारळ काढून त्यानं हंडी फोडली.

‘दहीकालाsss गोड झालाsss!’’ मुलांना काल्याची गाणी शिकवणाऱ्या आजोबांनी आरोळी ठोकली आणि मुलांनी एकच दंगा केला.

‘हंडी कुणी फोडली, हे दिसतंय ना तुला?’’ बाबांनी आईला नीट निरखून बघायला सांगितलं, तेव्हा कुठं आईचं तिकडं लक्ष गेलं. ती मैदानाकडं धावली, तोपर्यंत हंडी फोडून सगळी मुलांनी थर उतरवले होते आणि मडक्यातून हातात आलेला काला खाण्यात ती दंग झाली होती.

चिखलात माखलेला तिचा कान्हाही एका हातात कुठलंतरी फळ, दुसऱ्या हातात चॉकलेट, खिशात खापरीचा तुकडा घेऊन, गालाला लागलेलं दही जिभेनं चाटत तिच्याकडेच बघत उभा होता...!

loading image
go to top