esakal | बालक-पालक : दूध है वंडरफुल! Milk
sakal

बोलून बातमी शोधा

Milk

बालक-पालक : दूध है वंडरफुल!

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

नवीन गॅस शेगडी घेतल्यापासून घरात दूध बरेचदा उतू जात होतं. आईची त्यावरून रोज चिडचिड होत होती. खरंतर घरातली कामं सगळ्यांनी वाटून घेतली होती, त्यात दूध तापवण्याचं काम एकदा मुलांकडं, एकदा बाबांकडं होतं. दोन्ही गटांनी वार समसमान वाटून घेतले होते, फक्त अडचण एकच होती, की कुठला वार कुणाचा, हे त्यांना आठवत नसे. त्यामुळं आज दूध तापवून ठेवण्याचं काम बाबा करतील, असं मुलांना वाटे आणि ते निश्चिंत राहत. दुसऱ्या दिवशी मुलांनी त्यांची जबाबदारी पार पाडली असेल असं बाबांना वाटे, ते निवांत राहत.

दूध उतू जाण्यापेक्षा नंतर कुणीतरी तापवेल, या कारणानंही ते तापवायचं राहून जात होतं. एकूण काय, दुधाला सध्या कुणी वाली नव्हता.

जबाबदारी वाटून दिल्यानंतरही घोळ कुठे होतोय, हे आईला समजायला थोडा वेळ लागला. शेवटी कुठल्या वारी कुणी जबाबदारी घ्यायची, हे तिनंच आखून दिलं. तसं नियोजनही कॅलेंडरवर लिहून ठेवलं. पुढचे दोन आठवडे बरे गेले.

महिना बदलला, तसं कॅलेंडरचं पानही. आता नव्या महिन्यात नव्या तारखांप्रमाणे नियोजन करायला आईला काही वेळ नव्हता. मुलं आणि बाबांनी दिलेली जबाबदारी पार पाडली नाही, की तो भार आईवरच पडत होता. अर्थात, ज्या दिवशी दूध तापवलं नाही, त्या दिवशी कपडे वाळत घालणं, झाडांना पाणी घालणं, कट्टे पुसून ठेवणं, रद्दी आवरणं, टेबलावरचा पसारा आवरून ठेवणं, भांडी लावणं यापैकी कुठलं ना कुठलं काम मंडळी करून ठेवायची, त्यामुळे आईला बोलायलाही काही वाव राहायचा नाही.

दिलेलं काम मात्र पार पडत नाही, याची आईच्या मनातली रुखरुख कायम राहत होती. शेवटी त्याही महिन्याचं नियोजन तिनं करून टाकलं. कॅलेंडर पुन्हा रंगलं.

‘अगं आम्ही करणारच होतो सगळं नियोजन!’’ बाबांनी उगाचच काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं, पण त्याला काही अर्थ नाही, हे त्यांनाही कळत होतं.

‘आता मी नियोजन केलंय, तर त्यानुसार वागा,’’ आईनं पुन्हा आठवण करून दिली.

पुन्हा काही दिवस छान गेले. हवा भरलेल्या फुग्यातली हवा हळूहळू कमी होत जाते आणि नंतर तो लोळागोळा होऊन खाली पडतो, तसंच घरातल्या कामांच्या नियोजनाचंही होत होतं.

आता मात्र काम न करणाऱ्यांना जास्तीची एखादी जबाबदारी द्यायचा आईनं चंगच बांधला. हळूहळू घराला शिस्त लागली आणि दूध नासणं किंवा उतू जाणं, दोन्ही बंद झालं.

मुलांनीही त्यासाठी पुढाकार घेतला होता. बाबांच्या कामाच्या दिवशी त्यांना आठवण करायची, कधी मुलं विसरली, तर बाबांनी त्यांना आठवण करायची, असा परस्पर सहमतीचा प्रवास सुरू झाला. त्या दिवशी आईनं चकाचक ओटा आवरून ठेवला आणि ती हॉलमध्ये येऊन बसली. मुलांना अचानक आठवलं, की आज दूध तापवण्याची जबाबदारी बाबांवर होती. त्यांनी बाबांना खूण केली आणि आईला कळायच्या आत दूध गॅसवर ठेवण्यासाठी बाबांनी किचनकडे मोर्चा वळवला. पातेलं गॅसवर चढवलं, दूध उतू जाऊ नये म्हणून तिथेच खडा पहारा केला, पण काही क्षणांत काय झालं कुणास ठाऊक. फर्रर्रर्र करून जोरात आवाज झाला. सगळ्यांनी धावून जाऊन बघितलं, तर ओटाभर दुधाचा अभिषेक झाला होता.

कामाच्या नियोजनावर दुर्दैवानं पुन्हा ‘विरजण’ पडलं होतं!

loading image
go to top