esakal | बालक-पालक : ‘भय’ इथले संपत नाही...
sakal

बोलून बातमी शोधा

Balak Palak

बालक-पालक : ‘भय’ इथले संपत नाही...

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

‘चला, आता शेवटचा एकच दिवस राहिला परीक्षेचा! तो पेपर झाला, की हुश्श!’’ दिवसभराच्या कामानंतर थकूनभागून गेलेली आई बाबांना म्हणाली.

‘हो, या वर्षी खूपच त्रासदायक होतं ना सगळं मुलांसाठी?’’

‘त्यांच्यासाठी तर होतंच, पण पालकांसाठी जास्त. मुलं शाळेत जातात, तेव्हा समोरासमोर चांगला अभ्यास तरी होतो. इथं ऑनलाइन शाळा सुरू असताना मुलं काय करतायंत इथपासून ते त्यांच्याकडून दिलेले प्रोजेक्ट्स, गृहपाठ, परीक्षेचा अभ्यास करून घेणं, ह्यात दुप्पट मेहनत घ्यावी लागली. त्यातून त्यांच्या वाढत्या स्क्रीनटाइमची चिंता आहेच!’’

‘यंदाच्या परिस्थितीला कुणाचाच इलाज नव्हता. कुठल्याही घरी यापेक्षा वेगळी स्थिती नाहीये!’’

‘हो, ते तर झालंच. अर्थात, घरच्या सगळ्यांनीच मदत केली, म्हणून व्यवस्थित निभावलं सगळं. शाळेनंही मुलांना समजून घेतलं. यंदाची ऑनलाइन परीक्षा फार काही अवघड नव्हती, म्हणून ठीक.’’

‘होय, आता एकदा उद्याचा पेपर झाला, की तू सुटलीस,’’ बाबा हसून म्हणाले.

‘मी नव्हे, सगळेच सुटणार.’’ आईलाही जरा हायसं वाटत होतं.

शेवटचा पेपर मात्र गणिताचा होता आणि तो होईपर्यंत आईच्या जिवाला स्वस्थता काही लाभणार नव्हती.

‘गणिताचाच पेपर आहे गं, टेन्शन कसलं घेतेस?’’ हातातले शेंगदाणे उडवून बरोबर तोंडात झेलत चिरंजीव म्हणाले.

‘गधड्या, तू टेन्शन घेत नाहीस, म्हणून मला घ्यावं लागतंय!’’ आईनं सुनावलं.

‘अगं, सगळा अभ्यास झालाय माझा. चिल यार!’’

‘चिलफिल काहीतरी म्हणालास, तर एक धपाटा देईन. काही अभ्यास वगैरे झालेला नाहीये तुझा. लवकर आवरून घे, आपण अभ्यासाला बसूया. काही गणितं देते तुला. ती बरोबर आली, तर...’’

‘तर मी खेळायला जाऊ ना?’’

‘तर पुढचा अभ्यास. नाहीतर पुन्हा तीच गणितं पक्की करायची!’’

‘ए काय गं आई...!!’’ चिरंजीव कुरकुरले.

‘आईबिई काही नाही. ताबडतोब आवरून ये. उद्या तुझा शेवटचा पेपर झाला, की मी सुटले एकदाची कटकटीतून!’’

‘मी पण!’’ जाता जाता चिरंजीव पुटपुटले.

‘आता कुठं चाललायंस?’’ आईचा प्रश्न आलाच.

‘अगं, अंघोळ करून घेतो. तूच म्हणालीस ना, लवकर आवरून घे म्हणून?’’

‘हो, पण जास्त वेळ काढू नकोस!’’ आईनं अंघोळीला जायच्या आधीही सूचना केल्या.

दिवसभर ही लपाछपी, पकडापकडी आणि आरडाओरडा सुरू राहिला. सकाळचा अभ्यास लांबून दुपारवर गेला. दुपारचा संध्याकाळवर आणि संध्याकाळचा रात्रीपर्यंत सरकला. तरी शेवटी आईच्या मनासारखा अभ्यास झाला नाहीच.

‘आता तू आणि तुझं नशीब!’’ असं म्हणून आईनं दिवसाची इतिश्री केली. तसंही परीक्षा नाममात्रच होती, पण त्यासाठी कुठंही कमी पडता कामा नये, हा आईचा आग्रह कायम होता.

दुसऱ्या दिवशी परीक्षा झाली, अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीनं चिरंजीवांनीही त्याची उत्तरं दिली. आईला समाधान वाटलं.

‘चला, आता दोघांच्याही परीक्षा झाल्या. तुझं सगळं टेन्शन गेलं असेल. आता खूष ना?’’ रात्री बाबांनी आईला विचारलं. आईच्या चेहऱ्यावर मात्र काळजी दिसत होती.

‘आता कसली काळजी आहे तुला? लागली ना सुटी?’’ त्यांनी आश्चर्यानं विचारलं.

‘परीक्षा झाल्या हो, पण आता उद्यापासून दोघं सकाळी उठल्यापासून दर पंधरा मिनिटांनी ‘आता काय करू’ म्हणून विचारत बसतील, त्याचं काय करू?’’

आईनं उत्तर दिलं आणि बाबांचा चेहरा बघण्यासारखा झाला.

loading image